अखंडा – यतो धर्मस्ततो जय:

कर्नाटकच्या सीमेवर सैनिकांची एक तुकडी मोहिमेवर असते. त्यांचं लक्ष्य असतं नक्षलवादी गजेंद्र साहू. कर्मधर्मसंयोगाने साहू पळून जाण्यात यशस्वी होतो व एका हिंदू साधूच्या आश्रमात शरण घेतो. आश्रम, तेथील महंत आणि त्यांचा समाजावरील प्रभाव यांच्या प्रचंड ताकदीची जाणीव साहूला होते व ती ताकद हस्तगत करण्यासाठी तो महंतांचा खून करतो आणि त्यांची जागा घेतो. त्याच आसपास एका कुटूंबात प्रसुती होते. जुळी मुलं. पण एक जिवंत आणि दुसरा मृत. गावात वास्तव्यास असलेला अघोरी अनपेक्षितरित्या त्या घरी येतो आणि मृत बालकाची मागणी करतो. मुलाची आई अद्याप मूर्च्छेत असते. वडील तिच्या नकळत ते बाळ अघोरीला देऊन टाकतात. हस्ते परहस्ते त्या मृत बालकाचा प्रवास होऊ लागतो. या तसं बघितलं तर दोन वेगवेगळ्या घटना. पण त्यांना एकत्र आणण्याचं आणि त्यातून अत्यंत श्रीमंत व्यावसायिक मूल्यं असलेला ‘अखंडा’ बनवून दाखवण्याचं श्रेय जातं ते बोयापती श्रीनूला!

‘अखंडा’चा पूर्वार्ध कमालीचा संथ आहे. संथ आणि पूर्वानुमेय (प्रेडिक्टेबल) घटनांनी भरलेला! पण ते सहन करत असतानाही आपल्याला आतून वाटत राहातं की हे कोणत्या तरी मोठ्ठ्या यंत्राचे सांधे जुळवणं सुरू आहे. ते सांधे एकदा जुळले की सबंध चित्रपट फुलून येणार आहे. तसंच होतं. चित्रपट जरी मूळ संघर्ष अंथरायला वेळ घेत असला तरी एकदा तो त्या क्षेत्रात घुसला की स्फुल्लिंगातून अपरिमित तेजस्वी विस्फोट व्हावा तसा फुलून येतो!

नंदमुरी बाळकृष्ण अर्थात बालय्याला चित्रपटात दुहेरी भूमिका आहेत. एक म्हणजे रक्तपातावर विश्वास नसलेला मुरली आणि दुसरा म्हणजे दुर्जनांचा रक्तपात हेच उत्तर यावर ठाम विश्वास असलेला अखंड रुद्र सिकंदर अघोरा! पहिल्या भूमिकेतदेखील खूप सारे टाळ्या-शिट्ट्या वसूल करणारे क्षण असले तरी ते काही बालय्याचं नेहमीचं मैदान नाही. त्यामुळे त्या भूमिकेत तो काहीसा अडखळतो, काहीसा चाचपडतो. पण अंती आपल्या अनुभवाच्या जोरावर कथेचे सांधे जुळवण्याची भूमिका निभावून नेतो. आणि एकदा का ते सांधे जुळले की मग अखंडाच्या रुपात तो अक्षरशः तांडव घालतो तांडव! त्या पात्रात त्याचं रूप, त्याची देहबोली, त्याचं ठायीठायी संस्कृत बोलणं, सगळ्यांपासून तुटक व कोणत्याही सांसारिक पाशांपासून मुक्त असणं आणि कसलाही धरबंध न बाळगता थैमान घालणं साऱ्या साऱ्या गोष्टी वरच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणेच फुलून येतात!

बॉलिवूडची प्रथाच आहे धर्माचा शक्य तितका अपमान करणं, धर्मपरायण मंडळींना शक्य तितकं नीच लेखणं. बॉलिवूडमध्ये काम करणारे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सारेच विदेशी शिक्षणाची पैदास असल्यामुळे त्यांना ना या देशाची माती ठाऊक असते ना त्या मातीच्या भावना. त्यामुळेच त्यांचे चित्रपटही तसेच असतात – विसविशीत, उथळ आणि अगोचर! या देशाच्या वैविध्याला एका धाग्याने जोडणारा हिंदू धर्म तर त्यांना स्वप्नातही नकोसा असतो, उलट ते त्याचा आपापल्या अभिव्यक्तींतून शक्य तितका तिरस्कारच करत असतात. तेलुगू चित्रपटसृष्टी असल्या अंधश्रद्धांना थारा देत नाही. ‘अखंडा’मध्ये सबंध चित्रपटभर भगव्या संकेतांचा मुक्तहस्ते वापर केलाय. नुसत्या नायकाच्या वेशातच नाही तर गाड्या, पात्रांच्या ओळखपत्राची दोरी अशा नजरेला सहज न दिसणाऱ्या जागांवरही केसरी उधळण आहे. चित्रपटातील जोड्या विवाहसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत आणि कुटूंबे कुटूंबसंस्थेवर विश्वास ठेवणारी आहेत.

पण चित्रपटाचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखक-दिग्दर्शकांचा धर्माबद्दलचा अभ्यास अतिशय सूक्ष्म आहे. अघोरी पंथाचा वेश, त्यांची वर्तनाची पद्धत इ. गोष्टी तर त्यांना यथायोग्य साधल्या आहेतच. मंदिर का आवश्यक असते आणि मंदिराच्या उभारणीत धर्म किती खोलवरचा आध्यात्मिक विचार करतो हे सांगणारा प्रसंग अतिशय सुंदर झालाय. एका प्रसंगात नायक खलनायकाला मारत असताना त्याच्या शरीरावर प्रहार करताना कुंडलिनीच्या सात चक्रांची वर्णनं करतो. बॉलिवूडवाल्यांना मुळात कुंडलिनी नावाचं काही असतं हेच ठाऊक नसेल! पण सगळ्यांत जबरदस्त प्रसंग झालाय तो जिथे नायक ‘अहिंसा परमो धर्म:’च्या पुढे जात ‘धर्म: हिंसा तथैव च’ सांगतो, तसं वागतो पण तिथून निघून जात असताना पायाखाली चुकून येत असलेल्या निर्दोष मुंगळ्याचाही जीव घेत नाही!

पण या सगळ्या मारधाडीच्या आणि अभिनिवेशाच्या आत मला हा चित्रपट त्यातील सगळ्या गुणदोषांसह आवडण्याचं सगळ्यांत मोठं कारण सांगू? ते कारण आहे, अखंडा आणि मुरलीच्या लहान मुलीमधील हळवं नातं. त्यांच्यात सगळे मिळून पाच-दहा संवाद असतील. पण न बोलताच एक सन्यासी आणि अबोध बालिकेतील नात्याची घट्ट वीण बोयापती श्रीनूने जी सुरेख विणलीये आणि बालय्यानेही ती जितक्या अनपेक्षित संयतपणे चितारलीये तिला तोड नाही. जननी नाव दाखवलंय तिचं. अखंडा एकाच वेळी तिला लहान बालिका आणि जगज्जननी जगदंबा म्हणून लळा लावतो, ते अतिशय लाघवी आहे.

या नव्या वर्षात ‘पुष्पा’ने सबंध देशभर धुरळा उडवलाय. तुलनाच करायची झाली तर २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा’ने ३७० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दिडपट पैसे कमावले आहेत. त्याचवेळी ७० कोटींत बनलेल्या ‘अखंडा’ने १५० कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे. शुद्ध संख्याशास्त्रीय भाषेत बोलायला गेलं तर ‘अखंडा’ हा निर्मात्यांसाठी अधिक फायदेशीर ठरलाय. मी गेल्या जवळपास अर्ध्या दशकाहून अधिक काळ सांगतोय की ‘रीजनल इज द न्यू नॅशनल’. ‘अखंडा’ तसाच आहे. प्रादेशिक असूनही राष्ट्रीय स्तरावर धार्मिक अस्मितेला फुंकर घालणारा. भौतिकशास्त्राचे नियम पाळायला तो काही ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट नाही. त्याच्या पूर्वार्धातील संथपणा, अनावश्यक गाणे (जय बालय्या), पूर्वार्धात बालय्याचं अवघडलेपण सहन करू शकलात आणि मसालापट हे मसालापट म्हणून बघू शकण्याइतकी परिपक्वता तुमच्या ठायी असेल तर तुम्हाला तो आवडण्याची अखंड शक्यता आहे! सर्वोत्तम अनुभवासाठी मूळ तेलुगू भाषेतच पाहा.

*३.५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *