दुंदुभी निनादल्या.. नौबती कडाडल्या..!!

अगदी साधा हिशोब करुयात. महाराष्ट्राच्या राजकारणातील युती आणि आघाड्यांचे पर्व तर सध्या संपले. तेव्हा यावेळी पंचरंगी लढत होणार हे नि:संशय. यातून कोणतातरी एकच पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा ठरेल हेही निश्चित. मात्र समविचारी (‘विचारी’ शब्द लिहितानाही खरे तर लाज वाटतेय!) पक्ष एकमेकांची मते खाणार, त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. सध्याची काँग्रेस-आघाडीविरोधी लाट पाहाता त्यांच्यापैकी कोणताही पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार नाही, हेही नक्की. तेव्हा सर्वांत मोठा पक्ष एकतर शिवसेना तरी असणार वा भाजप तरी! मला वाटते, इथपर्यंत कुणाचेच दुमत नसेल.

क्षणभर गृहित धरू की, भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. अश्यावेळी भाजपला पुन्हा एकवार कुणासोबत तरी युती करणे भागच आहे. ती कुणाबरोबर? काँग्रेससोबत युती करण्याची तर सुतराम शक्यता नाही. कारण, ज्यांच्याविरोधात लढून केंद्रात सत्ता मिळवली, राज्यातील सत्तेच्या लालसेपोटी जर त्यांच्याच सोबत गेले तर लोक अक्षरशः शेण घालतील तोंडात. शिवाय असा भिन्नप्रवृत्तींचा बळजबरीचा विवाह फार काळ टिकणेही अशक्यच! मग भाजपवाले राष्ट्रवादीसोबत जातील का? तांत्रिकदृष्ट्या जाऊ शकतात. तसेही अलिकडच्या काही दिवसांत महाराष्ट्र भाजपमध्ये राष्ट्रवादीच्याच लोकांचा भरणा अधिक दिसतोय. शिवाय तत्त्व-बित्त्व बाजूला ठेवून भाजपवाले या ‘आयात’ मंडळींना तिकिटेही देतीलच! तेव्हा भाजपवाले राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतात. मात्र प्रश्न उरतो तो असा की, हे असं निष्ठावंतांना डावलून, तत्त्वाशी तडजोड करून केलेलं गठबंधन भाजपमधील पुढाऱ्यांना रुचेलही एकवेळ, परंतू तळागाळातील सामान्य-निष्ठावंत कार्यकर्त्याला चालणार आहे का? नाही चालणार! आणि त्यांना चालो न चालो, परंतू राज्यात काँग्रेसच्या बरोबरीने ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच जीवावर (किमानपक्षी त्यांच्यातील आयातांच्या जीवावर!) सत्तेचे सोपान चढणे यासाठी भाजपला किती किती आणि कुठे कुठे तडजोड करावी लागेल, याची कल्पनाच केलेली बरी! यात राष्ट्रवादीचे कणभरही नुकसान नाहीये. मात्र प्रतिमा खराब होणार, विश्वासार्हता उणावणार ती भाजपचीच! शिवाय काँग्रेस काय वा राष्ट्रवादी काय, यांच्यासोबत जाणे मोदींना शोभणारे आहे का, याचाही विचार व्हायला हवा! भाजपला हे नुकसान परवडणारे वाटत असेल, तर आनंदच आहे! अन्यथा आणखी एक पर्याय समोर आहे तो मनसेचा! तसेही लोकसभेच्या काळात मनसेसोबत मधुर संबंध प्रस्थापित करण्याचा महाराष्ट्र-भाजपने (केंद्रीय नव्हे!) प्रयत्न करून पाहिलाच होता. त्या संबंधांनाच विवाहात बदलता येणे शक्य आहे. मात्र प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर या निवडणुकीत मनसेच्या फार काही जागा निवडून येतील असे बिलकुल वाटत नाही. त्यामुळे या संबंधांचा भाजपला कितपत फायदा होईल याची शंकाच वाटते. दुसरा आणि सर्वात मोठा अडसर असा की, लवकरच बिहार आणि उत्तरप्रदेशात निवडणुका होऊ घातल्या आहेत. अश्यावेळी महाराष्ट्रात मनसेसोबत युती असेल, तर त्याचा हमखास फटका या दोन्ही राज्यांत बसणार, यात जराही शंका नाही. त्यातही सदर राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी फारशी समाधानकारक नसताना भाजपचे केंद्रीय पातळीवरील नेतृत्व मनसेसोबत युती करण्याची जोखीम पत्करेल असे निदान मला तरी वाटत नाही. अश्यावेळी उरते कोण, तर शिवसेना! ज्या उद्धव ठाकरेंनी जागावाटपाच्या वेळी भाजपला काडीमात्रही भाव दिला नव्हता, ते युतीसाठी पुन्हा एकवार सहजासहजी तयार होतील असा विचार करणेही बालिशपणाचे आहे. साहजिकच ते शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद आणि इतरही महत्वाची मंत्रिपदे मागणार. त्याशिवाय युती तर सोडाच, साधी बोलणीही करणार नाहीत. म्हणजेच, जी गोष्ट नको म्हणून युती तोडली, तीच गोष्ट मारून-मुटकून करण्याचे महाराष्ट्र-भाजपच्या नशिबी येणार! थोडक्यात काय, तर इथेही फरपटच!! किंबहूना हीच परिस्थिती यावी म्हणून शिवसेनेचे नेतृत्व शांतपणे दबा धरून वाट पाहातेय. अर्थात अजूनही एक पर्याय उरतो, तो म्हणजे विविध पक्षांचे विधायक फोडून जादुई आकडा गाठणे. सद्य परिस्थिती जर आहे तशीच कायम राहिली, तर हाच सगळ्यात सोप्पा मार्ग याक्षणी तरी वाटतो. मात्र या घोडेबाजारात भाजपला सतत जबर किंमत चुकवावी लागणार हे निश्चित! थोडक्यात काय, तर कमी प्रमाणात परंतू फरपटच!! महाराष्ट्र-भाजपला आगामी काळात, त्यांच्याच एका गाफील, अहंकारी आणि चुकीच्या निर्णयापोटी ‘न भूतो न भविष्यति’ तडजोडी कराव्या लागणार आहेत, असे जे मी परवा लिहिले होते ते या सर्व संदर्भांना धरून!

याउलट शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या तर काय होईल? त्यांना राष्ट्रीय पातळीवर कुणालाही उत्तर देण्याचे बंधन नसल्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणाशीही युती करण्यात काहीही अडचण नाही. मात्र इथे प्रश्न येतो तो तत्त्वांचा! जर या दोन्ही पक्षांपैकी कुणासोबत युती केली, तर शिवसेना या नावाभोवती असलेलं वलय आणि विश्वासार्हता कायमचे संपेल. मला वाटतं, सेनानेतृत्वालाही या गोष्टीची जाणीव असेल, त्यामुळे ते कदापिही हा बालिशपणा करणार नाहीत. शिवाय भाजपला लागू होणारा नियम यांनाही तितकाच लागू होतो — एकमेकांचे विचार न पटणाऱ्यांचा विवाह चालून चालून असा कितीसा चालणार? मग आणखी पर्याय कोणता? तर मनसे!! खरं सांगू, मनसेच्या किती का जागा निवडून येईनात, मात्र या दोन पक्षांची युती झाली आणि त्यानिमित्ताने जर का दोघा भावांचे मनोमिलन झाले, तर अवघा महाराष्ट्र आनंदाने नाचेल अक्षरशः!! तेव्हा हा एक हुकमी पर्याय आहेच. मात्र यासाठी दोघांनाही कल्पनेपलिकडच्या तडजोडी कराव्या लागतील. आणि याक्षणी तरी एकाचा अहंकार आणि दुसऱ्याचा खुनशीपणा पाहाता, हे मधुर-मिलन कितपत घडू शकेल, यात मला तरी शंकाच वाटते! परंतू काहीतरी चमत्कार घडावा आणि हे मनोमिलन व्हावे अशी माझ्याप्रमाणेच सर्व मराठीजनांची इच्छा आहे एवढं नक्की! त्या दोघांनीही या लोकभावनेचा विचार करावा. शिवसेना पुन्हा एकदा भाजपसोबत युती करू गेल्यास, भाजपला पूर्ण नमविल्याखेरीज सोडणार नाही, असेच याक्षणी तरी वाटतेय. किंबहूना आपल्याला सर्वाधिक जागा न मिळाल्यास, ही अशी परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्र-भाजपचे पानिपत करण्याचा सेनेचा खरा डाव असण्याचीच शक्यता याक्षणी वाटतेय! तेव्हा बोलणी तडजोडीच्या दिशेने नेण्यापेक्षा ‘येता की जाता’ अशीच करण्याकडे अश्यावेळी शिवसेनेचा कल राहाणार! आणि समजा अश्याप्रकारे केलेली बोलणी फिसकटलीच, तर विरोधी बाकावर बसताना शिवसेनेला काडीचेही दु:ख होणार नाही! कारण गमावण्यासारखे मुळात काही नव्हतेच. मग हाच विरोधी बाकावर बसण्याचा पर्याय भाजपकडेही खुला नाही का? तर आहे. मात्र त्यांच्या दृष्टीने तो सगळ्यात शेवटचा आणि नाईलाजास्तव स्वीकारलेला पर्याय असेल, एवढे नक्की! याचे कारण आहेत, अमित शहा! किंबहुना महाराष्ट्र-भाजपला युती तुटायला नको होती, त्यासाठी ते पडती बाजू घ्यायलाही तयार होते, मात्र युती तुटली ती अमित शहांनी आणलेला दबाव, दिल्लीदरबारच्य कुणा हुजऱ्याला राज्यात मुख्यमंत्रीपदी बसवून राज्यावर अंकुश ठेवण्याची – विदर्भ आणि प्रसंगी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची महत्वाकांक्षा, उत्तरप्रदेशात लोकसभेमध्ये मिळालेल्या यशामुळे आलेली बेफिकीरी, जात्याच कणखर स्वभाव आणि त्यात आता तर थेट नरेंद्र मोदींचा वरदहस्त लाभल्यामुळे आलेली निर्ममता, आणि अहंकारामुळे; असेच प्रथमदर्शनी तरी दिसतेय! अर्थात त्यांना असे करण्याचा पूर्ण अधिकारही आहे कारण, सध्यातरी तेच विजयी बाजूकडे आहेत; मात्र दुर्दैव म्हणा वा योगायोग, हा महाराष्ट्र आहे – उत्तरप्रदेश नव्हे!!

थोडक्यात सांगायला गेलं तर, येत्या महिनाभरात महाराष्ट्रात राजकीय धूळवड होणे अटळ आहे. यात कोण तावून-सुलाखून बाहेर पडतो आणि कुणाच्या गळ्यात महाराष्ट्रलक्ष्मी माळ घालते (की तिच्या नशीबी राष्ट्रपती राजवटीतले आश्रिताचे जिणे येते!), हे बघणे निश्चितच औत्सुक्याचे ठरेल. खऱ्या नेतृत्वाची हीच परीक्षा आहे; किंबहूना ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यालाच महाराष्ट्राचा नेता म्हणवून घ्यायचा अधिकार असणार आहे! सध्यातरी, ‘दुंदुभी निनादल्या.. नौबती कडाडल्या’!!

— © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने ऐकण्यात/डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा : www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *