एकट्या ‘भाजप’चीच खिल्ली का उडवली जाते?

मित्रांना प्रश्न पडतो की केवळ ‘महाराष्ट्र भाजप’चीच (महाराष्ट्र हा शब्द महत्वाचा!) खिल्ली का उडवली जातेय सगळीकडे? अहो साधी गोष्ट आहे. लोकांच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी इतका काही प्रचंड राग आहे की, त्यांच्याबद्दल बोलायची सुद्धा लोकांची इच्छा नाहीये. त्यांना साफ झोपवायचं, हे तर पक्कंच ठरलंय! उरले कोण, तर शिवसेना आणि भाजप. त्यांपैकी ज्या शिवसेनेशी भाजपने २५ वर्षे घरोबा केला, ती शिवसेना म्हणजे ‘गुंडांचा पक्ष’ असल्याचा महाराष्ट्र-भाजपला अचानकच साक्षात्कार झालाय. त्यांच्याबद्दल काय बोलायचं मग?

उरला भाजप!! त्यांना ना महाराष्ट्रात चेहरा ना व्हिजन. बहुमत मिळालं तर मुख्यमंत्रीपदासाठी खुर्चीच्या ऐवजी सोफा ठेवावा लागतो की काय असे वाटण्याइतपत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक. असेना का. राजकारणात पदाची इच्छा अवश्य असावी. ते योग्यच आहे. परंतू महाराष्ट्र-भाजप लोकसभेतील मोदीलाटेच्या विजयात इतका काही वाहावत गेलाय की, त्यांनी अतिशय नकारात्मक प्रचार सुरू केलाय. पाहा – लोकसभेत त्यांची घोषणा होती, ‘अच्छे दिन आनेवाले है’. यात कशी सकारात्मकता आहे. काहीतरी काम करून दाखवण्याचा ऊर्मी आहे. तेच विधानसभेतील घोषवाक्य पाहा. ते म्हणतात, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’. यातून केवळ एकच संदेश मिळतो की महाराष्ट्राची वाताहत झाली आहे. बाबांनो, ते तुम्हीच कश्याला सांगितलं पाहिजे? आम्हाला समजतं की ते! यावर उपाय म्हणून तुम्ही काय करणार? की नुसतेच प्रश्न उपस्थित करणार? याचं उत्तर या घोषवाक्यातून मिळत नाही. घोषवाक्य कसं हवं, तर भाजपच्याच लोकसभेतील घोषवाक्यासारखं! एका वाक्यात व्हिजन समजलं पाहिजे, सकारात्मक वाटलं पाहिजे. हा विज्ञापनशास्त्राचा नियम आहे. तुम्ही जर तोच पाळणार नसाल, तर तुमच्या ढिलाईची आणि त्यातून जन्मलेल्या वाक्याची खिल्ली उडवली जाणारच. कारण, आम्ही तुमचे डोळस समर्थक आहोत, तुमच्या कोणत्याही गोष्टीची स्तुती करणारे अंधभक्त नव्हेत.

हीच ढिलाई मोदींच्या सभांच्या वेळापत्रकातही दिसून येते. अहो, मोदी तुमचा हुकमाचा एक्का आहे. तो जर तुम्ही असा कुठेही उधळणार असाल, तर कसं चालायचं? उदाहरणार्थ-  श्रीमती पंकजा मुंडे-पालवेंच्या मागे याक्षणी सहानुभूतीची प्रचंड लाट आहे. त्या निवडून येणार हे तर पक्कंच आहे. मग त्यांच्यावर मोदींची सभा का वाया घालवलीत? तेही आदल्याच दिवशी स्वत: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्यासाठी सभा घेतलेली असताना? त्याऐवजी एखाद्या दुर्बळ उमेदवारावर ती सभा खर्च केली असती, तर आणखी एक जागा निवडून नसती का आली? खरं तर मोदींना एवढ्या साऱ्या सभा घ्यायला लावणं हेच मुळात प्रादेशिक नेतृत्वात आत्मविश्वासाची कमतरता असल्याचं सिद्ध करणारं आहे. चला सभाच घ्यायच्या तर मोदींनीच दिलेल्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेनुसार घ्यायला नकोत? जिथं-जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उभे असतील (जशी तासगावात सभा घेतली!) तिथे सभा घ्यायला हव्या होत्या, म्हणजे तुमच्या हेतूंवरचा आमचा विश्वास दृढ झाला असता. परंतू तसे तर होताना दिसत नाहीये. ना सभास्थानांमध्ये काही क्रमवारी वगैरे दिसतेय. म्हणजे एकीकडे ‘आमचे शत्रू केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी आहेत, शिवसेना नाही’ असं तोंड वाजवत राहायचं आणि प्रत्यक्षात मात्र सभेच्या क्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही ‘वेगळे’ नुकसान होताना दिसतच नाहीये. शिवाय या सगळ्या प्रकारामुळे मोदींचीही किती गोची झालीये पाहा. त्या माणसाला आपण देशाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारभार हाकायला नेमलंय. ते सारं सोडून या माणसाला राज्यपातळीवर आणि गावागावांत जाऊन प्रचार करण्याची नामुष्की त्यांच्याच पक्षाच्या कर्तृत्वशून्य प्रादेशिक नेतृत्वाने आणलीये. प्रत्येक गावातली परिस्थिती वेगळी, तिथले प्रश्न वेगळे, बलाबल वेगळे. मोदींनी काय सारं काम-धाम सोडून तिथल्या प्रश्नांचा अभ्यास करत बसायचं आणि भाषणंच ठोकत राहायची? तो माणूस अभ्यासू आहे, त्यामुळे तो हे करेलही. पण मग राष्ट्रीय पातळीवर रखडलेली कामं करायला काय हे प्रदेश पातळीवरील कर्तृत्वशून्य लोक जाणार आहेत का? दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका असणार. म्हणजे काय प्रत्येक वर्षी मोदींनाच पळवणार का तुम्ही? यातून मोदींची प्रतिमा तर खालावतेच, शिवाय प्रादेशिक नेतृत्वाची निष्क्रियता अधोरेखित होते ती वेगळीच! अश्या निष्क्रिय पक्षाच्या नेतृत्वाला लोकांनी का म्हणून मत द्यावं? म्हणूनही भाजपची सध्या खिल्ली उडवली जातेय. आणि हे साहजिकच आहे. आजवर अनेक वर्षांत मोदींनी कधीच स्वत:च्या वैयक्तिक मोठेपणाचा डंका वाजवलेला नाही. त्यांचा तो स्वार्थी स्वभावच नाही. त्याच मोदींना आज गावोगावी जाऊन ‘मी अमेरिकेला जाऊन आलो’ असे सांगण्याची वेळ आलीये. ही नामुष्की कुणामुळे ओढवली? कर्तृत्वशून्य, बिनचेहऱ्याच्या प्रादेशिक नेतृत्वामुळेच ना? मग अश्या लोकांना का म्हणून मत द्यायचं आम्ही, हा रोकडा सवाल विचारला जाणारच. मोदींची मस्करी करणाऱ्यांची खिल्ली ही उडवली जाणारच!

आणखी एक गोष्ट सांगतो. मोदींना ही मंडळी नुसतं दामटवतच नाही आहेत, तर त्यांच्या नावाचा वापरही करून घेताहेत. घ्या ना. अवश्य करून घ्या. तुमचेच नेते आहेत ते. पण प्रादेशिक पातळीवरील निवडणुकांमध्येही केवळ आणि केवळ त्यांचाच चेहरा वापरायचा? त्यांनी अमेरिकेत केलेलं भाषण दाखवून ‘अमेरिकेत भाषण केलेला नेता’ अश्या चुकीच्या पायावर व्यक्तिनिष्ठ उदात्तीकरण करायचं? याचा दुसरा अर्थ प्रदेश-पातळीवरील तुमचे सारेच नेते स्वीकारार्ह नाहीत, असाच होत नाही का? स्वत: मोदींनीही मग अश्यावेळी ‘मुंडे असते तर मला यायचीसुद्धा गरज नसती पडली’ अशी आडवळणाने खिल्ली उडवून घेतल्यास त्यात नवल ते काय? लोकसभेत आम्ही मोदींच्या नावावर मत दिलं. कारण त्यावेळी मोदी पंतप्रधान होणार होते. आता विधानसभेत का द्यावं मोदींच्या नावावर मत? मोदी काय मुख्यमंत्री होणार आहेत का? मुख्यमंत्री तर कुणीतरी प्रादेशिक, ज्याचा चेहराही तुम्ही जाहिरातींमध्ये दाखवू धजत नाहीत, असाच कुणीतरी नेता होणार ना? मग अश्या बिनचेहऱ्याच्या पक्षाला का मत द्यावं आम्ही? कृपा करून ‘निवडणुका झाल्या की मुख्यमंत्री ठरवू’ असलं काँग्रेसी उत्तर देऊ नका. ही काँग्रेसी पद्धत आहे. तुमची नाही. लोकसभेत केला होता की नाही चेहरा जाहीर? मग इथेही करायला कसली भीती? आणि याउप्परही जर काँग्रेसी पद्धतीच वापरणार असाल, तर मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिला? ‘जनसंघाचीही उद्या काँग्रेसच होईल’ असं भाकीत करणारे स्वा. सावरकर अश्यावेळी अधिकच द्रष्ट्ये वाटू लागत नाहीत काय? सबब, एकट्या भाजपचीच का खिल्ली उडवली जाते? तर त्यांनी लोकसभेला मोठमोठी स्वप्ने दाखवून आशेचा फुगा फुगवला आणि प्रदेशपातळीवरील नेतृत्वाने त्या फुग्याची हवाच काढून घेत मोदींच्या कष्टावर पाणी फिरवले म्हणून! अश्यावेळी खिल्ली ही उडवली जाणारच! लोकसभेत ज्यांना मत द्यायला आम्ही आसुसलेले होतो, विधानसभेत त्यांच्याच चुकीच्या डावपेचांमुळे त्यांना अजिबातच मत द्यावेसे वाटत नाहीये; अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा??

— © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

image

3 thoughts on “एकट्या ‘भाजप’चीच खिल्ली का उडवली जाते?

Leave a Reply to रामदास पवार Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *