अंदमानातील मित्रमेळा

स्वा. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील शतावधी पैलूंपैकी एकच कोणता तरी सहज, सुगम पैलू निवडायला सांगितला, तर मी क्षणभराचाही विचार न करता उत्तर देईन की, सावरकरांचे व्यक्तिमत्त्व चुंबकासारखे होते! चुंबकाकडे जसे लोहकण आपसूकच आकर्षित होतात, तसे लोक सावरकरांच्या भोवती गोळा होत. म्हणजे अगदी लहानपणीदेखील तात्यांच्या भोवती परशुराम शिंपी, राजाराम शिंपी, पुढे देशभक्त म्हणून ख्याती प्राप्त केलेले गोपाळराव देसाई, वामनराव धोपावकर, भिकू वंजारी, त्र्यंबकराव वर्तक, वामनशास्त्री दातार वगैरे मित्रपरिवाराचा गराडा असायचा (स्वा. सावरकर चरित्र, लेखक शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. ५४). मित्रमेळा तथा अभिनव भारताचे अगदी सुरुवातीचे सदस्य असलेले त्रिंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्ण पागे हे मूळचे बाबारावांचे मित्र, परंतु ते देखील तात्यारावांच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहिले नाहीत (तत्रोक्त, पृ. ७१). सावरकर लहानपणापासूनच जातिगत भेदभावाच्या विरोधात होते, त्यामुळेच पुढे नाशिकला, तिथून पुण्याला आणि त्यानंतर लंडनला गेल्यावर हा मित्रपरिवार विस्तारतच गेला.

तीच गोष्ट अंदमानची! लक्षात घ्या, सावरकर बॅरिस्टर होते. अंदमानात येण्याआधीच ‘इंडिया हाऊस’ आणि मार्सेतील समुद्रसाहसाच्या निमित्ताने त्रिखंड गाजवलेले होते. त्यांना अंदमानातील जमादार वगैरे तर सोडाच पण बारीही वचकून असे. साहजिकच सावरकरांना अर्थात ‘बडे बाबूं’ना बंदीवानांमध्ये विशेष मान होता. या योगे आणि सावरकरांच्या मूळच्याच चुंबकीय स्वभावामुळे बंदीगृहाच्या निर्बंधातही त्यांच्याकडे राजकीय व सामान्य बंदीच नव्हे तर अगदी वॉर्डरदेखील खेचले जात. सावरकरांचा कोठडीतील पहिलाच आठवडा होता, तेव्हाची गोष्ट आहे (माझी जन्मठेप, परचुरे प्रकाशन मंदिर, आ. २००७, पृ. ७८-७९). एके दिवशी एका वॉर्डरने सावरकरांच्या कोठडीतील गजांमधून एक दगड फेकला. निरखून पाहिले तर त्यासोबत एक चिठ्ठी होती. ती फेकताना नेमके एका पठाण वॉर्डरने पाहिले. त्याने आरडाओरडा केला. झडती सुरू झाली तशी सावरकरांनी ती चिठ्ठी अंगावरच बेमालूमपणे लपवली. सारे शांत झाल्यावर सावरकरांनी ती चिठ्ठी वाचली. काय होतं त्या चिठ्ठीत? तर त्यात अंदमानची परिस्थिती कथन केली होती. कोण कसं आहे, कुणावर विश्वास टाकावा वा टाकू नये वगैरे. मला सांगा, काय गरज होती त्या वॉर्डरला स्वतःची नोकरीच नव्हे तर अक्षरशः जीव धोक्यात घालून एका पन्नास वर्षांची शिक्षा झालेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणासाठी हे करायची? इंग्रजीत एक म्हण आहे, ‘Respect is commanded, not demanded’. त्या म्हणीचं चपखल उदाहरण, म्हणजेच ही घटना!

अंदमानात अनेक प्रकारचे बंदी होते. काही चोर होते, काही दरोडेखोर, लुटारू, खुनी, बलात्कारीदेखील होते. पण या नृशंस मंडळींपेक्षा सर्वस्वी भिन्न होते ते क्रांतिकारक! सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, पृ. ८७, ८८) तर त्यांच्यातही ‘बॉम्बगोळेवाले’ आणि ‘जीभवाले’ असे दोन प्रमुख प्रकार होते. स्वतः सावरकरांना अंदमानात ‘डी’ अर्थात ‘डेंजरस’ लिहिलेला बिल्ला दिला होता. या ‘डी’वाल्या मंडळींना बारी आणि त्याचे वॉर्डर्स विशेष जाच करत असत. त्यातही सावरकरांवर तर आणखीनच अवकृपा केली जात असे. कधी अंदमानला गेलात तर सावरकरांची कोठडी अवश्य पाहा, त्याच्या पुढे बसण्यापुरतीच एक विशेष जागा केलेली आहे. विशेष यासाठी की, तिथे थांबल्यास नजरेत एकच गोष्ट भरते ती म्हणजे अंदमानातील फाशीगृह! सावरकरांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी बारीने केलेला हा प्रकार अंगावर अक्षरशः शहारा आणतो. पण त्याही परिस्थितीत सावरकरांची अंतर्दृष्टी कशी तीक्ष्ण होती पाहा. एके दिवशी सावरकरांच्या समोरच बारी राजबंदीवानांस “इन की ×× फाड डालनी पडेगी” असे अश्लील बोलला (तत्रोक्त, पृ. १०८). तो निघून गेल्यावर सावरकरांनी त्या तरुणांना त्यांची नावे विचारली. त्यांची म्लानवदने पाहून सावरकर त्यांना म्हणाले, “एक दिवस क्वचित येईल की अंदमानच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील”! सावरकरांचे हे शब्द अक्षरशः सत्य ठरले. आज सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकाच्या उद्यानात विविध क्रांतिकारकांचे पूर्णाकृती पुतळे डौलाने उभे आहेत! सावरकरांना राजकीय बंदी असूनही मुद्दामहूनच सापत्न वागणूक दिली जाई, कोलूला जुंपले जाई. कोलू म्हणजे घाण्याला जुंपून काढण्याची शिक्षा. रोजचं पौंडांचं उद्दिष्ट गाठताना मी-मी म्हणणाऱ्या धटिंगणांसही नाकीनऊ येत असत, तिथे या फॉरेन-रिटर्न्ड बॅरीस्टरला त्रास न झाल्यासच नवल. अशा वेळी याच उपरोक्त राजबंद्यांपैकी काही जण येऊन गुपचूप सावरकरांना मदत करून जात. कित्येकांनी तर सावरकरांना कधी जेवणाची थाळीच घासू दिली नाही, ते परस्परच स्वच्छ करून टाकत. काही जण तर सावरकर नको नको म्हणत असतानाही त्यांचे कपडे धुवून टाकत. परतफेड म्हणून सावरकर कधीतरी गुपचूप त्यांचे कपडे धूत, तेव्हा त्या मंडळींच्या मनाला कोण वाईट वाटत असे! कारागृहाच्या वाळवंटातील अशा माणूसकीच्या दुर्मिळ झऱ्यांनीच सावरकरांची जिजीविषा अखेरपर्यंत ठाम राखली होती.

अंदमान आज सुद्धा दुर्गम आहे. त्या काळात तर अजूनच दुर्गम असलेल्या अंदमानातील त्या सेल्युलर जेलमध्ये बारी एखाद्या हुकूमशहासारखा अंमल चालवित असे. बारीचे हस्तक येता-जाता सहज म्हणून शिव्या देत असत. कारागृहातील त्या वेळच्या अमानुष शिक्षांचे आणि बेड्यांचे तर आज तेथील व्यवस्थापनानेच प्रदर्शन भरवले आहे, ते पाहून आजही थरकाप होतो. छिलका कुटणे, कोलू फिरवणे, जंगलकटाई वगैरे गुरांसारखी कामे करणाऱ्या बंद्यांना जेवणात काय मिळत असे? सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं झालं (तत्रोक्त, १६४) तर, ‘दुर्लक्षितपणे, घामटपणे, निष्काळजीपणे शिजवलेले आणि आरोग्यास हानिकारक’ असे हे अन्न असे. उदाहरणच द्यायचं झालं तर, बंद्यांना जी कांजी मिळे, त्यात अनेकदा घासलेट पडलेले असे. भाजीत गोम, साप तर प्रत्यही निघत. आपल्या तुलनेत अंदमान विषुववृत्ताच्या जवळ आहे. त्यामुळे तिथे पावसाळाही तसाच. बरेचदा त्याच पावसात उभे राहून भिजलेल्या पोळ्या, ओला भात खावा लागे. बरेचदा या जेवणातूनही गुलाम रसूल, मिर्ज़ाखान वगैरे पठाण जमादारांना वाटा द्यावा लागे, असे बारींद्रकुमार घोष यांनी लिहून ठेवले आहे (राजनैतिक कारस्थान, खंड २, पृ. १६०). शौचास अथवा मूत्रविसर्जनासाठी जाण्यापासूनही कैद्यांना रोखण्याचा पशूहूनही नीचतम प्रकार बारीच्या आशीर्वादाने जमादार करत असत. एकदा तत्कालीन गृहमंत्र्यांचा दौरा सुरू असताना नंदगोपाल नावाच्या एका पंजाबी राजबंद्यांनी हे गाऱ्हाणे मांडले. बारीने अर्थातच सारे काही मुळापासून नाकारले. त्यावर नंदगोपाल उसळून म्हणाले, “या बंदीगृहातील खोल्यांत तुम्ही एकदा प्रत्यक्ष हिंडा आणि तेथील भिंतींच्या कोपऱ्यांचा वास घ्या. तुमचे नाकच आमचे साक्षीदार” (माझी जन्मठेप, पृ. ९९).

हे सारे बाहेर कुणाला कळवायची सोय होती का? तर ते ही नाही. अंदमानातून बंद पाकिट पाठवताच येत नसे. जे काही टपाल जाई ते उघडेच, अर्थात अधिकाऱ्यांनी व्यवस्थित वाचल्यावरच. असेच एक गृहस्थ होते, होतीलाल. संयुक्त प्रांतातून राजद्रोहाच्या आरोपाखाली दहा वर्षांसाठी आलेले. शुद्ध हिंदी बोलणारे व ऊर्दू आणि इंग्रजीतही प्रवीण. बारा गावचेच नव्हे तर रशिया, चीन, जपान इ. बारा देशांचे पाणी प्यायलेले. हे होतीलाल म्हणजेच श्री. होतीलाल वर्मा असल्याचे काही ऑनलाईन ब्लॉग्सवर (zillion2dinnings इ.) दिसते तर अंदमान आणि निकोबार पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तसा उल्लेख आढळतो. त्यांनी हिकमत केली. पहारेकऱ्यांची नजर चुकवत चुकवत त्यांनी कसेबसे एक पत्र लिहून काढले. बाहेरकामास बंदीवान जात असत त्या धांदलीत त्यांनी ते एकाच्या हाती बाहेर धाडले. त्याने ते झडतीपासून मुक्त अशा एका सरकारी विश्वासास पात्र प्रवाशाकडे सोपवले. त्या पत्राचे पुढे काय झाले, ते भारतात पोहोचले की तत्पूर्वीच त्या प्रवाशाने समुद्रात फेकून दिले वगैरे बंद्यांना समजावयास काहीच मार्ग नाही. आणि एके दिवशी बारीचा भडका उडाला! त्यावरून समजले की, ते पत्र भारतात सुरेंद्रनाथ बॅनर्जींपर्यंत पोहोचले होते. त्यांनीही मोठेच धैर्य दाखवत ते आपल्या ‘द बंगाली’मध्ये (२७ एप्रिल १९१२) छापले होते. एवढेच नव्हे तर त्यावर एक स्फुटदेखील लिहिले होते. त्यावरून मोठ्ठा गदारोळ झाला होता. एकदा तर पंजाबमधील कुणा थोर पुरुषाच्या क्रांतिकारक पुत्राने (सावरकरांनी गोपनीयतेच्या कारणास्तव नावे दिलेली नाहीत) पंजाबमधील तुरुंगातून एक बंदी अंदमानात पाठवला जात असताना त्याच्या बिल्ल्यावर सावरकरांसाठी पत्र लिहून पाठवले (माझी जन्मठेप, पृ. १४४). त्या बंद्याची सर्वत्र कपडे काढून झडती झाली, पण गळ्यातला बिल्ला पाहावयाचे कुणासही सुचले नाही!

पण अशा कुरघोड्या विरळ आणि कारागृहातील जाच मात्र शाश्वत होता. इंदुभूषण रॉय नावाचे एक तरुण क्रांतिकारक होते. त्यांना माणिकतोळा खटल्यात दहा वर्षांसाठी काळे पाण्याची शिक्षा झाली होती. सामान्यतः बंद्यांना जेव्हा तुरुंगाबाहेरची कामे देत, तेव्हा ती तुलनेने आरामदायक असत. त्यातही कुणी बंदी आजारी पडलाच तर त्याला बाहेरच्या, तुलनेने चांगल्या इस्पितळात धाडले जाई. पण राजबंद्यांना ही सुविधा उपलब्ध होती का? सावरकर लिहितात, ‘राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे. कारण त्यास लगेच तापात वा रेच होत असता आपले अंथरुण डोक्यावर घेऊन, आपली थाळी हातात घेऊन दोन-चार-पाच मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषण दार पाहावे लागे आणि आत येताच कोठडीबंद होऊन पडावे लागे’ (तत्रोक्त, पृ. १७६). या छळाला इंदुभूषण कंटाळले. त्यांनी काम नाकारले. दंडाबेडी पत्करली, पण हे काम नको असा पवित्रा घेतला. ‘नॉस्टॅल्जिया कोलकाता’ (https://nostalgiakolkata.blogspot.com/2016/07/indu-bhusan-roy.html?m=1) ब्लॉगचे लेखक लिहितात, ‘He had been suffering from blisters caused by the juice of the rambash so much that it was even difficult for him to move his fingers freely. It became so painful that he could not get a wink of sleep during the whole night. The pain and the raw sores in his hands prevented him from eating with his hand. The touch of ‘dal’ caused him so much pain that tears would roll down from his cheeks and the food could not be touched at all. He pleaded that if the same state of affairs were allowed to continue, he would die of starvation’. त्यांनी बारीला सोपे काम मागितल्यावर बारीने काय केले? बारीने इंदुभूषण यांना कोलू फिरवायला सांगितला! केवढं हे क्रौर्य.

सावरकरांनी इंदुभूषणना धीर दिला की, ‘तुला तर दहाच वर्षे शिक्षा आहे. मला तर जन्मठेप! तेव्हा माझ्याकडे पाहून स्वतःला धीर दे. स्वदेशासाठी स्वार्थ, प्राण यांचा त्याग करणे हे जसे कर्तव्य तसेच बंधो, मनाचाही त्याग करणे कर्तव्यच आहे. तू अजून पंचविशीचे आतबाहेर माझ्यासारखाच आहेस. आणि माझ्याहून तुला सुटण्याची आशा पुष्कळ आहे. तर धीर धर. सध्या कष्ट सोसून जग की पुढे सुटताच पुन: देशमातेची सेवा करता यावी’ (माझी जन्मठेप, पृ. १७७). त्यानंतर दोन-चारच दिवस उलटले असतील. एके दिवशी सकाळी कोठड्या उघडण्याच्या वेळी एक वॉर्डर गुपचूपपणे सावरकरांपाशी आल व म्हणाला, ‘मी सांगितले म्हणून कुणास सांगू नका, पण इंदुभूषण काल फाशी खाऊन मेला’! दिनांक होता २९ एप्रिल १९१२ आणि इंदुभूषण यांचे वय होते अवघे बावीस वर्षांचे. बारीने सारे प्रकरण ‘इंदू वेड लागून मेला’ म्हणून दाबून टाकले. सावरकरांनी स्वतः व इतरांकरवी इंदुभूषणवरील अत्याचार सर्वांसमोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ!

असेच दुसरे क्रांतिकारक होते उल्लासकर दत्त (माझी जन्मठेप, पृ. १८०-१८७). त्यांनी लिहिलेली ‘द्वीपांतरेर कथा’ आणि ‘आमार काराजीबन’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचाही अंदमानात अतोनात छळ करण्यात आला. घाण्याला जुंपलेले बैल जिथे दिवसभरात १६ पौंड तेल काढतात, तिथे अंदमानात तीन माणसांना घाण्याला जुंपून ८० पौंड तेल काढावे लागत असे. तेही रेंगाळत नाही, तर दिवसभर पळत. एखादा जरासा रेंगाळला, तर दांडक्याने मारहाण होत असे. तरीही काम केले नाहीच तर त्याला घाण्याला बांधून इतरांना पळायला सांगत, म्हणजे हा फरपटत जाई, त्याचे डोके, तोंड आपटून फुटे. इतरांना सहा महिन्यांनंतर बाहेरचे काम देण्यात येई. पण इंग्रजांच्या दृष्टीने जहाल असलेल्यांना मात्र वर्षानुवर्षे आतच ठेवत. अखेर खूप वाट पाहिल्यानंतर उल्लासकरांना बाहेरचे काम देण्यात आले ते वीटांचे. ओल्या वीटा ने-आण करण्याचे काम बंद्यांनी करावे यासाठी त्यांना दुधाची लालूच देण्यात येई. पण त्या दुधावरही पेटी ऑफिसरचा डोळा असे. उल्लासकर आपले दूध त्याला देत नसत म्हणून रागाने त्यांची बदली बिनदुधाच्या कामावर केली गेली, ते काम म्हणजे उंच टेकडीवर असलेल्या साहेबाच्या बंगल्यावर कावडीने पाणी पोहोचवणे. जीव कासावीस व्हायचा. प्राण कंठाशी यायचे. शेवटी थकून जाऊन त्यांनी ते काम नाकारले. पण इंग्रजांना त्याचे ना सोयर ना सुतक. त्यांनी उल्लासकर दत्तांवर खटला भरला व त्यांना तुरुंगात नेऊन टाकले. तशा त्या मरणासन्न अवस्थेत उल्लासकर दत्तांना भास होऊ लागले की, बारी आपल्याला द्वंद्वयुद्ध खेळायला बोलावतो आहे व आपल्या बाजूने सावरकर लढताहेत. अखेरीस सावरकरांचा विजय होतो. उल्लासकर दत्तांना विलक्षण आनंद होतो, पण तेवढ्यात तो सारा देखावाच वितळून गेला. टळटळीत दुपारचे ऊन होते आणि उल्लासकर दत्तांच्या अंगात १०७ ताप होता! या मरणप्राय यातनांनी अखेर त्यांना उन्माद आला. तर उपचार म्हणून त्यांना वीजेचे झटके दिले गेले. तीन दिवस आणि तीन रात्र बेशुद्ध होते ते! काय अवस्था झाली असेल, फक्त एकदा विचार करून पाहा. त्यांनी फाशी घ्यायचाही प्रयत्न केला, पण नियतीला त्या क्षणी ते देखील सुख मिळू द्यायचे नव्हते त्यांना. अखेर एका पर्यवेक्षकाला त्यांची दया आली व त्याने त्यांना वेड्यांच्या इस्पितळात धाडले. दुष्ट बारी मात्र अखेरपर्यंत हेच म्हणत राहिला की, उल्लासकर ढोंग करतोय.

नानी गोपाळांना तर त्यांच्या असहकाराची शिक्षा म्हणून वेत मारण्याची शिक्षा दिली गेली. अशा निर्घृण शिक्षेची जबाबदारी तर अधिकाऱ्यांसही घेववेना. नानी गोपाळांनी अन्नत्याग केला, कुणाचेच ऐकेनात. हद्द पाहा, त्यांना नाकातून नळी टाकून दूध पाजण्यात आले. नाकातून! अखेरीस जेव्हा सावरकर त्यांना म्हणाले की, मी देखील अन्नत्याग करेन, तेव्हा त्या धाकाने त्यांनी अन्न ग्रहण केले. स्वतः सावरकरांचे मोठे बंधू बाबारावदेखील अंदमानातच होते. तरी जवळजवळ वर्षभर दोन सख्ख्या भावांना एकमेकांचे तोंडदेखील बघू दिले नव्हते इंग्रज सरकारने! अखेर या पाशवी अत्याचारांची परिणति कारागृहात संप होण्यामध्ये झाली. त्यातही पर्यवेक्षकांचे म्हणणे असे की, सावरकर संपाला उत्तेजन देतात. सावरकर ताडकन म्हणाले की, ‘इंदूस फाशी खाण्यास मी उत्तेजन दिले का? उल्लासकरास वेडे होण्यासही मीच शिकवले का? यातनाच संपास उत्तेजन देतात, मी नव्हे’. स्वतः सावरकरांनाही आत्महत्येचे विचार येऊन गेल्याचे त्यांनीच प्रांजळपणे लिहून ठेवलेय, पण प्रत्येक वेळी अतुल्य मनोबलाने त्यांनी त्या विचारांवर मात केली. १९१८ च्या सुमारास अखेर सावरकरांना अंदमानातील कष्ट व परिस्थिती सरकारी संमतीनेच कळवता आली. त्या पत्राच्या शेकडो प्रती करून नारायणराव सावरकरांनी त्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधींना वाटल्या. त्यातील उतारे इंग्रजी तसेच प्रादेशिक वृत्तपत्रांनीदेखील छापले. अमृतबझार पत्रिकेने तर आपल्या लेखाचा मथळाच ‘Outrageous treatment of a political prisoner’ (माझी जन्मठेप, पृ. ३४६) असा छापला होता.

या ही परिस्थितीत सावरकरांनी अंदमानात प्रचार आणि प्रसार केलाय. सोशल नेटवर्किंग नावाचा प्रकार उदित व्हायच्या किमान शंभर वर्षे आधी त्यांनी संघटनेचं घट्ट जाळं अंदमानात बारीच्या नाकावर टिच्चून विणून दाखवलंय. त्यांनी कैद्यांना लिहा-वाचायला शिकवलं. कित्येकांना वरच्या नोकऱ्या मिळवून दिल्या. कित्येकांची शुद्धिकरणे केली. जातीभेद मोडला. काव्ये-महाकाव्ये प्रसवली. हे संघटनेचे जाळे केवढे घट्ट विणले होते? ऑगस्ट १९२० ला लोकमान्य गेले. ही बातमी समजताच (माझी जन्मठेप, पृ. ४२२-४२३) सावरकरांनी ठरवले की, श्रद्धांजली म्हणून सर्व अंदमानात त्या दिवशी उपवास पाळला जावा. तत्काळ त्यांनी कारागृहातील जवळच्या मंडळींना हे कळवले. त्यांनी पुढच्यांस, त्यांनी पुढच्यांस करता करता बातमी गावोगाव पसरली. आणि एकाच वेळी सबंध अंदमानातील बंद्यांनी जेवण नाकारले! लक्षात घ्या, सेल्युलर जेलची रचनाच अशी आहे की, जेलच्या एका बाहूला दुसऱ्या बाहूची फक्त पाठ दिसते. शेजार-शेजारच्या खोल्याही एकमेकींपासून लांब आहेत, त्यामुळे बोलण्याची सोयच नाही. त्यातही कुणी बोलताना आढळला तर शिक्षा ठरलेलीच. त्या पार्श्वभूमीवर हा केवढा मोठा चमत्कार आहे, विचार करा.

सामान्य बंदीच नव्हे तर क्रांतिकारकदेखील सावरकरांकडे मार्गदर्शक म्हणून पाहात. इतकेच कशाला, महायुद्धाच्या काळात रशियन रणनौका त्या परिसरात आल्या असता त्यांचे कॅप्टनही सावरकरांना भेटून जात. एम्डेन या जर्मन युद्धनौकेची कथा तर प्रसिद्धच आहे. अखेर इंग्रजांनी सावरकर बंधूंना भारतात हलविण्याचे ठरवले. सावरकरांना पाहाण्यासाठी कारागृहाबाहेर लोकांची एकच गर्दी उसळली होती. कडेकोट बंदोबस्त होता. तो मोडून, शिक्षेची पर्वा न करता एक बंदीवान अचानक सावरकरांपाशी आला व त्याने एक साधीशीच परंतु भावनांनी ओथंबलेली चाफ्यांच्या फुलांची माळ सावरकरांच्या गळ्यात घातली. का केले असेल त्याने असे? किंबहूना का एवढा जीव लावला असेल सगळ्या बंद्यांनी सावरकरांना? अंदमान आजदेखील आपल्या मुख्यभूमीपासून सुमारे दिड हजार किलोमीटर लांब आहे. तेथे भलत्यांचीच संख्या वाढावी, त्यांचा वरचष्मा राहावा, यासाठी बारीच्या जमादारांनी काही एक कसर सोडली नव्हती. अंदमानचा पाकिस्तान झाला नाही, याचे श्रेय ज्या काही संघटनावादी मंडळींना जाते, त्यात सावरकरांचा वाटा सिंहाचा आहे! सावरकरांना भारतात जाऊन शिक्षाच भोगायची होती, मुक्तता होणार नव्हतीच त्यांची इतक्यात. पण सावरकर अंदमानातून परतले ते तेथेदेखील कर्तव्यपूर्ती केल्याच्या कृतार्थ भावनेने. यात अनेकानेक ज्ञात अज्ञात राजबंद्यांनी व सामान्य बंद्यांनीही त्यांची मदत केली. सावरकरांनी काहींची नावे दिली, काहींची नावे तत्कालीन परिस्थितीमुळे ‘माझी जन्मठेप’ छापून होईपर्यंतही नाही देऊ शकले. पण जरी इतिहासाच्या पानांवर काहीसा धूसर झालेला असला, तरीदेखील हा अंदमानातील मित्रमेळाच होता!

— © विक्रम श्रीराम एडके

(पूर्वप्रसिद्धी – ‘चैत्रपालवी सावरकर परिवार विशेषांक’ आणि ‘ग्राहकहित दिवाळी विशेषांक’)

* लेखक स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याचे अभ्यासक व आमंत्रणानुसार सर्वत्र फिरून व्याख्याने देणारे सुप्रसिद्ध वक्ते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *