पहिले ते ‘हरिकथानिरुपण’, दुसरे ते ‘राजकारण’!!

प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीतामाईचा परित्याग केला, तेव्हा त्या बिचाऱ्या ऋषी वाल्मिकींकडे आश्रयासाठी राहिल्या. वाल्मिकींनी जाणले की, राजाचे कर्तव्य म्हणून श्रीरामांना सीतेचा त्याग करणे आवश्यकच होते, परंतू त्यापोटी सीतेवर झालेला अन्यायही अस्वस्थ करून सोडणारा होता. वाल्मिकींनी सीतेला ठेवून घेतले. लव-कुशांचा जन्म झाला. त्यांचेही वाल्मिकींनी यथासांग संगोपन-शिक्षण केले. त्यांना ‘रामायण’ शिकवले. आणि योग्य वेळ येताच श्रीरामांच्या राज्यातील यज्ञाचे निमित्त करून दोन्हीही पोरांना तिकडे रामकथा गाण्यासाठी पाठवले. दोन गोजिरवाणी पोरं! अयोध्येत सगळीकडे फिरायची. चौका-चौकात, पारा-पारांवर अस्खलित संस्कृतमध्ये रामकथा गायची. लोक भावविभोर व्हायचे. मंत्रमुग्ध व्हायचे. नकळत ही दोन्ही पोरं कित्ती रामासारखी दिसतात, अशी तुलनाही सुरू व्हायची त्यांच्या मनांत! मात्र वाल्मिकींनी सक्त ताकीद दिली होती दोघांना की, कुणीही किती जरी खोदून-खोदून विचारले तरीही आपले वडील कोण ते सांगायचे नाही. फार-फार तर ‘आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत’, एवढेच सांगायचे! झाले!! पोरांची कीर्ती हळूहळू सर्व राज्यभर पसरली. यथावकाश स्वत: रामाकडून त्यांना बोलावणे आले. पोरं भर दरबारात प्रत्यक्ष प्रभू राम, लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नांसमोर रामकथा गायली. कथा ऐकताना, विशेषतः सीतात्यागाचा प्रसंग ऐकताना साऱ्या-साऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पोरांचे श्रीरामांच्या चेहऱ्याशी असलेले साम्य तर वादातीतच होते. रामाची मुलं असती, तर आज एवढीच असली असती – हाही विचार सर्व आप्तजनांना स्पर्शून जात होता. अखेरीस स्वत: रामरायांनीच विचारले की, तुम्ही कोण, कुणाची मुले? बास!! त्याचक्षणी तिथे ऋषी वाल्मिकी स्वत: आले आणि त्यांनी श्रीरामांना सांगितले की ही तुमचीच मुलं आहेत. वाल्मिकींनी सर्व दरबारास या मुलांची हकीकत सांगितली. सीतेची पवित्रता सांगितली! सर्वांची सहानुभूती सीतेच्या बाजूने झाली. श्रीरामांनाही तेच हवे होते. परंतू मनात कुठेतरी शंका होती. ती वाल्मिकींनी ओळखली आणि श्रीरामांना, साक्षात प्रभू श्रीरामांना दरडावून सांगितले की, ‘रामा, मी ऋषी वाल्मिकी, प्रचेताचा दहावा वंशज (म्हणजेच किमान दहा पिढ्यांची शुद्धता असलेला ब्राह्मण!) तुला सांगतोय की, सीता ही निष्कलंकच आहे”!! या निर्वाणीच्या सुरानंतर सारेच प्रश्न मिटले. राम-सीता दोघेही लव-कुशांसह पुन्हा एक झाले!

हा प्रसंग काय आहे हो? सीतेला आश्रय देणे, लव-कुशांचा जन्म होऊन ते मोठे होईपर्यंत वाट पाहाणे आणि योग्य वेळ येताच डाव टाकून रामाला सीतेचा स्वीकार करायला भाग पाडणे — या सर्व गोष्टींना एकच शब्द लागू पडतो – ‘राजकारण’!! होय हे राजकारण आहे. आणि वाल्मिकींनी हे राजकारण केलं म्हणूनच लव-कुशांना आश्रिताचं जिणं न जगता त्यांच्या अधिकाराचं राज्य मिळालं, सीतेवरचा खोटा कलंक दूर झाला. वाल्मिकी जर आश्रमाच्या दाराशी आलेल्या गर्भवती सीतेलाही पाहून ‘मी तर तपस्वी आहे, मला या राजकारणाशी काय देणं-घेणं’ असे म्हणून गप्प बसले असते तर? अन्याय करणाऱ्यापेक्षाही तो अन्याय मूकपणे पाहाणारा जास्त मोठा पापी असतो. या न्यायाने वाल्मिकीही त्यांच्या निष्क्रियतेमुळे पापाचे वाटेकरी बनले असते. परंतू वाल्मिकींकडे नीर-क्षीर-विवेक होता. त्यांनी योग्य निर्णय घेतला. राजकारणात भाग घेतला, मत व्यक्त केले. त्यासाठी प्रत्यक्ष रामचंद्रांनाही खडसवायला कमी केले नाही! हेच प्रत्येक विचारी मनुष्याचे कर्तव्य असते!

लोक मला विचारतात की, ‘विक्रमजी तुम्ही वक्ते आहात. इतिहासावर लिहिणे, व्याख्याने देणे हे तुमचे काम आहे. असे असताना तुम्ही या घाणेरड्या राजकारणावर का लिहिता’? लोक हा प्रश्न माझ्यावरील प्रेमापोटीच करतात, हे मी जाणतो. परंतू या प्रश्नाचे उत्तर उपरोक्त ऐतिहासिक घटनेत आहे मित्रांनो. खरे आहे की मी वक्ता आहे, लेखक आहे आणि तेच माझे कर्तव्यही आहे. मात्र या सगळ्याआधी मी एक ‘हिंदुत्ववादी’सुद्धा आहे! किंबहूना मी हिंदुत्ववादी आहे म्हणूनच वक्ता आणि लेखक आहे. आणि मी असे मानतो की, आजच्या काळात हिंदुत्व पसरवायचे तर त्यासाठी राजकीय सत्ता ही आवश्यकच आहे. त्यासाठी मीच कश्याला, प्रत्येक सच्च्या हिंदुत्ववाद्याने निवडणुकांच्या काळात हिंदुहितवादी माणसेच कशी सत्तास्थानी जातील, हे पाहायला हवे. आणि ती तशी गेल्यावर त्यांच्यावर सातत्याने अंकुशही ठेवायला हवा. म्हणूनच मी राजकारणावर लिहितो आणि लिहितच राहाणार. पक्षातीत विचार करून हिंदुहितास पाठिंबा देतच राहाणार. मग पक्ष भाजप असो वा शिवसेना वा अन्य कुणी! कुणाचीही अंधभक्ती नाही. बरोबर तर बरोबर. आणि चूक तर चूकच! जिथे समष्टीविचारांसाठी वाल्मिकींनी प्रत्यक्ष रामालाही खडसावले, तिथे आजचा तर कोणताही नेता रामाच्या योग्यतेचाही नाही. मग त्यांना जाब विचारण्यात कसली अडचण? कसली भक्ती? हो, एक मात्र निश्चित की, मी वाल्मिकींच्या पासंगालाही पुरणारा नाही. मात्र माझी सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलू शकतोच की! स्वत: समर्थांनीही ‘हरिकथानिरुपणा’नंतर दुसरे कर्तव्य ‘राजकारण’च सांगितलेय, नव्हे का? गरज पडली तेव्हा समर्थांनी राजकारणावर प्रभाव टाकणारे वर्तन केलेच ना? मग त्याच समर्थांना आदर्श मानणाऱ्या आपण सर्वांनीही त्यांच्याच मार्गावरून चालायला नको? तेव्हा समाजशिक्षणासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने सद्य राजकारणावर मते बाळगली आणि व्यक्त केलीच पाहिजे. शिवाय निवडणुका या काही दिवसांपुरत्याच असतात. त्यांची एकदा उत्तरपूजा झाली, की माझे नेहमीचे लेखन आहेच!! बाकी सत्ता कुणाची का येईना परंतू खान्ग्रेस आणि कास्टवादीची यायला नको. सेना किंवा भाजप यांच्यापैकी कुणाची जरी सत्ता आली तरीही मला सारखाच आनंद होईल. उलट सेना व भाजप या दोघांपैकी एक पक्ष सत्ताधारी आणि दुसरा विपक्ष झाला तर माझा आनंद द्विगुणितच होईल. हो, राज्यात सत्ताधारी आणि विपक्ष दोघेही हिंदुत्ववादी असतील, तर दुग्धशर्करा योगच नव्हे काय? तेव्हा उद्या होऊ घातलेल्या प्रत्यक्ष रणसंग्रामासाठी दोन्हीही पक्षांना मन:पूर्वक शुभेच्छा!!

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच लेखकाची व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

image

2 thoughts on “पहिले ते ‘हरिकथानिरुपण’, दुसरे ते ‘राजकारण’!!

  1. ‘रामा, मी ऋषी वाल्मिकी, प्रचेताचा दहावा वंशज (म्हणजेच किमान दहा पिढ्यांची शुद्धता असलेला ब्राह्मण!)

    आमच्या वाचण्यात आल आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला .
    त्या मुळे वरील वाक्य गोंधळात टाकणारे आहे .
    काही माहिती देता येईल का ?

    • ‘रामा, मी ऋषी वाल्मिकी, प्रचेताचा दहावा वंशज (म्हणजेच किमान दहा पिढ्यांची शुद्धता असलेला ब्राह्मण!)

      आमच्या वाचण्यात आल आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला .
      त्या मुळे वरील वाक्य गोंधळात टाकणारे आहे .
      काही माहिती देता येईल का ?

Leave a Reply to sanjay Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *