रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव
आज विजयादशमी. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी राक्षसराज रावणाचा संहार केला. पण हा संहार नेमका केला कसा? काय अस्त्र वापरलं? रावणाच्या मृत्यूच्या क्षणी नेमकं काय घडलं? समकालीन वाल्मिकींनी रामायणात या बद्दल सविस्तर लेखन केलं आहे.
वाल्मिकी लिहितात, राम आणि रावणामध्ये द्वैरथ युद्ध झाले (युद्धकांड, स. १०७, श्लो. १). दोन्ही बाजूचे सैन्य लढायचे सोडून त्यांचेच युद्ध पाहात बसले (तत्रोक्त २). राम आणि रावण दोघांनाही स्वतःच्या विजयावर पूर्ण विश्वास होता (७). रावणाने त्वेषाने रामाच्या रथावरील ध्वज तोडण्यासाठी बाण चालवले, पण तो असफल झाला (९). रामानेही उट्टे काढण्यासाठी महासर्पासारखा असह्य व ज्वलंत बाण रावणाच्या ध्वजावर सोडला. हा बाण नेमका रावणाचा ध्वज फोडून जमिनीत जाऊन रुतला (१२). या प्रकाराने चवताळलेला रावण रोषपूर्वक बाणांचा वर्षावच करू लागला. त्याने रामाच्या घोड्यांचा वेध घेतला. पण त्यांच्यावर विशेष काहीच परिणाम झाला नाही (१६). यानंतर तर रावणाने अजूनच चिडून जाऊन बाणांसोबतच गदा, चक्र, परिघ, मुसळ, पर्वतशिखर, वृक्ष, शूल, परशू यांचा वर्षाव करायला प्रारंभ केला (१७-१८). वाल्मिकी लिहितात, रावणाने अजिबातच न थकता (अश्रान्तह्रदयोद्यम:) सहस्रावधी बाण चालवले. याला उत्तर म्हणून रामानेही शतसहस्रावधी बाण सोडले (२२). दोन्हीकडून चाललेल्या या वर्षावाने सबंध आकाश भरून गेले होते, इतके की श्वास घ्यायलादेखील जागा शिल्लक राहिली नाही (२६). दोन्हीकडचे बाण एकमेकांवर आपटून जमिनीवर पडू लागले (२५). दोघांनीही एकमेकांचे घोडे जखमी करून टाकले (२७).
हा रोमहर्षक संग्राम सुरू असताना एक मुहूर्त (मुहूर्तमभवद्) म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटं उलटली (२८). दोघांचे सारथीदेखील निष्णात होते. ते कधी रथाला गोल फिरवित, तर कधी सरळ नेत, कधी पुढे जातोय असं दाखवून एकदम मागे आणत तर कधी माघार घेतोय असं दाखवून पुढे नेत (३१-३२). राम आणि रावण दोघेही एकमेकांवर वार करण्यात काही एक कसर सोडत नव्हते. दोघांचेही रथ आता जणू काही भरलेल्या मेघासम (जलदाविव) दिसू लागले होते (३३-३४). आता दोन्हीही रथांचे जू एकमेकांना भिडले होते, पताका एकमेकींना स्पर्शू लागल्या होत्या (३५-३६). रामाने चार बाण मारून रावणाच्या घोड्यांना मागे ढकलले (३६-३७). त्यामुळे तळतळलेल्या रावणाने अनेक बाण चालवून रामाला जखमी करून टाकले (३७-३८). रामाने चेहऱ्यावर कोणतीच पीडा दाखवली नाही. रावणाने ताबडतोब रामाचा सारथी मातलीला लक्ष्य केले, अर्थात मातलीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही (३९-४०). आता मात्र रामाच्या क्रोधाला पारावार राहिला नाही (४१-४२). राघवाने बाणांचे जाळेच (शरजालेन), अर्थात बाणांचा समूहच सोडून रावणाला माघार घ्यायला (विमुखं रिपुम्) लावली (४१-४२). रघुनाथाने रावणावर वीस, तीस, साठ, शेकडो, हजारो बाण सोडले. त्यावर रावणाने बाणांचा वर्षाव केला (४२-४४). पुन्हा एकवार भयंकर युद्ध सुरू झाले. त्या तुंबळ युद्धाला पाहून अप्सरा आणि गंधर्वदेखील म्हणू लागले, ‘रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव’! (५२).
त्यानंतर रघुकुळाची कीर्ती वाढवणाऱ्या रामाने धनुष्यावर एक विषारी बाण चढवला आणि रावणाचे मुंडकेच उडवून टाकले (५३-५४). पण काय आश्चर्य, त्या जागी ताबडतोब दुसरे मस्तक दिसू लागले. रामाने ते सुद्धा अविलंब धडावेगळे केले. हा प्रकार शंभरदा घडला. जणू काही या गोष्टीला काही अंतच नव्हता (५६-५८). हे असे महाभयंकर रणकंदन रात्र न् दिवस चालले (६५-६६). आता मात्र राम काळजीत पडला (५९).
रामाला काळजीत पडलेला पाहून मातली म्हणाला, ‘हे वीरवर तुम्ही काय त्याच्या हल्ल्यावर केवळ प्रतिहल्ला करत आहात? त्याच्यावर ब्रह्मास्त्र चालवा. रावणाच्या विनाशाची घडी समीप आलीये’ (युद्धकांड, स. १०८. श्लो. १-२). मातलीच्या या सांगण्यावरून रामाने फुत्कारणाऱ्या सापासारखा एक तेजस्वी शर हाती घेतला. हे तेच अमोघ ब्रह्मास्त्र होते जे ऋषींनी (गीताप्रेसच्या प्रतीनुसार अगस्त्य ऋषींनी) रामाला दिले होते. हे अस्त्र पूर्वी ब्रह्माने त्रिलोकजयकांक्षी इंद्राला अर्पण केले होते (तत्रोक्त ३-५).
तो बाण कसा होता? वाल्मिकी लिहितात, त्या बाणात वायूचा वेग, त्याच्या फाळात आग आणि सूर्य, त्याच्या रचनेत आकाश आणि त्याच्या जडपणात मेरू-मंदराचलांची प्रतिष्ठापना केली होती. तो सर्व भूतमात्रांच्या तेजाने बनलेला, सूर्यासारखा जाज्वल्य होता. तो स्वर्णभूषित, सुंदर पंखांचा, प्रलयाग्निच्या धूरासारखा भयंकर, दीप्तिमान, सापासारखा विषारी, माणसं, हत्ती व घोडे यांना भेदणारा व चपळ होता. दरवाजे, परिघच काय तर पर्वतांनाही भेदण्यास तो सक्षम होता. त्याचं सबंध शरीर रक्त, मेदात न्हायल्यासारखं सुदारुण होतं. तो वज्रासमान दिसणारा, मोठ्ठा आवाज करणारा व शत्रूंची झुंडच्या झुंड नष्ट करणारा होता. तो सगळ्यांना छळणाऱ्या, फुत्कारणाऱ्या सापासारखा भयंकर होता. कावळे, गिधाडं, बगळे व जंबुक इत्यादींना नित्य भक्ष्य प्रदान करणारा, साक्षात यमराजाचेच रूप होता! (६-११)
असा तो सायक महाबली रामाने वेदोक्त विधीपूर्वक धनुष्यावर चढवला. त्यासरशी सर्व प्राणी संत्रस्त झाले व धरती दोलायमान होऊ लागली. अत्यंत चिडलेल्या रामाने मोठ्या ताकदीने प्रत्यंचा खेचली व तो बाण रावणावर सोडला. वज्रधारी इंद्राच्या हातून सुटलेल्या दुर्धर्ष वज्रासारखा तो बाण रावणाच्या छातीवर जाऊन आदळला! त्याचा वेग एवढा प्रचंड होता की तो रावणाची छाती फोडून, ह्रदय भेदून, रुधिराक्त असा जमिनीत जाऊन रुतला!! रावणाच्या निष्प्राण हातांतून धनुष्य व बाण गळून पडले. त्या महावेगशाली, महातेजस्वी राक्षसराजाचे शरीर वज्राचा फटका खाल्लेल्या वृत्रासुरासारखे रथातून जमिनीवर आपटले. तो बाण मात्र काम संपवून सहजपणे रामाच्या भात्यात पुन्हा जाऊन बसला. इकडे आपला स्वामी मेल्याचे पाहाताच समस्त राक्षस भितीपोटी पळू लागले तर चेव चढलेले वानर त्या राक्षससैन्यावर तुटून पडले! रावणाचा मृत्यू घोषित होताच सर्वत्र दुंदुभी निनादू लागल्या आणि समग्र वातावरण रामाच्या जयजयकाराने भरून गेले!! (१४-२७)
रावणवध हा केवळ स्त्रीचे अपहरण करणाऱ्या एका राक्षसाचाच वध नव्हता, तर तो होता एका सार्वभौम सत्तेच्या अहंकाराचा एका राज्यविहिन वनवासीने वनवासींच्याच साह्याने केलेला पराभव! ही सामर्थ्य, बुद्धी व धोरणीपणाच्या जोरावर सत्याने असत्यावर विजय मिळवल्याची गाथा आहे. रामायण, ही भारताच्या इतिहासाची चिरंतन महागाथा आहे!!
— © विक्रम श्रीराम एडके
(रामायणाचे अभ्यासक आणि व्याख्याते. अधिक माहितीसाठी, तसेच रामायणावरील व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क करा, www.vikramedke.com)
टीप: येथे लेखनाच्या सोयीसाठी तसेच वाल्मिकी रामायणातील उल्लेखांच्या संदर्भानुसार रामाचा एकेरी उल्लेख केला आहे. या मागे श्रीराम या देवतेच्या अवमानाचा चुकूनदेखील उद्देश नाही. लेखकही अन्य कोट्यवधी भारतीयांसारखाच रामभक्त आहे. शिवाय आवडत्या देवतेचा एकेरी उल्लेख करण्याची आपली पिढ्यानपिढ्यांची पद्धत आहे.