रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

असं म्हणतात, जेव्हा प्रलयाची घडी आली तेव्हा वैवस्वत मनूने एक नौका उभारून सबंध जीवसृष्टी नव्याने वसवली. अशीच कथा थोड्याफार फरकाने अब्राहमिक पंथांत नोहाचीदेखील आहे. बायबलमधील अॅडम, ईव्ह आणि सापाची कथादेखील प्रसिद्धच आहे. या सगळ्या पौराणिक कथा. नव्या युगाचा आरंभ आपापल्या परीने सांगणाऱ्या. पण खरोखरीच जीवसृष्टीला अशी पैलतीरी नेण्याची जबाबदारी येऊन पडली तर, कुणी आधुनिक मनू ती कशी पेलेल? त्याची नौका अथवा आर्क कोणत्या स्वरुपाचे असेल? त्यातून निर्माण होणारी नवी सृष्टी तरी कशा प्रकारची असेल? धर्माच्या अभ्यासकांना पडणाऱ्या या प्रश्नांचं उत्तर वैज्ञानिक नाट्यातून शोधण्याचा प्रयत्न म्हणजे रिडली स्कॉटची एचबीओ मॅक्सवरील नवीकोरी मालिका, ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’!

बावीसावं शतक निम्मं सरलंय. पृथ्वीवर एक आगळाच संघर्ष सुरू आहे. हे महाभारत आहे आस्तिक आणि नास्तिकांच्या दरम्यानचं. आस्तिक आहेत ते मित्राईक पंथाचे अनुयायी. हे एका खरोखरीच्या प्राचीन इराणी पंथाचे नाव आहे. गंमतीची गोष्ट अशी की त्यांचे नाव ‘मित्र’ या संस्कृत शब्दाशी कमालीचे साधर्म्य साधणारे आहे. नावाप्रमाणे व संस्कृत अर्थाप्रमाणेच ते सूर्योपासक आहेत. वस्तुतः आता या पंथाचे कुणीच अनुयायी शिल्लक नाहीत. त्यामुळे अर्थातच मालिकेत या पंथाचे काल्पनिक रूप वापरण्यात आले आहे. कोणत्याही परमोच्च बिंदूशी पोचलेल्या संस्कृतीप्रमाणेच त्यांच्यातही सांस्कृतिक कट्टरता व सामरिक ढिलाई आलेली आहे. त्यांच्या विरुद्ध आहेत ते विज्ञाननादी नास्तिक. दोघांपैकी कुणीही सरळमार्गी नाही. दोघांकडेही एकापेक्षा एक भयकारी अस्त्रे आहेत. यातून एकच गोष्ट हाती लागते ती म्हणजे पृथ्वीचा विनाश!

विनाशातूनच नवी प्रभात होते. कुणाच्या तरी दूरदृष्टीने पृथ्वीवरील मानवांची काही बीजे आपल्यापासून सहाशे अडतीस प्रकाशवर्ष दूर असलेल्या केप्लर-२२बी ग्रहावर पोहोचवली जातात. धर्माच्या अट्टाहासामुळे पृथ्वीची दुरवस्था झाल्याचे मानून त्या बीजांचा ‘प्रेषित’ (कोटी हेतुत:!) त्यांना कोणत्याही धर्माच्या विरहित वाढवायचं ठरवतो. यासाठी दोन यंत्रमानवांची निवड केलेली आहे, मदर (अमँडा कॉलिन) आणि फादर (अबुबकर सलीम). हे दोघेही त्या मुलांना नास्तिकतेची घुटी पाजूनच वाढवतात. पण नवीन ग्रहावर वस्ती करणे एवढे सोपे असते का? लोक दिसतात तसेच प्रत्यक्षात असतात का? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, मनुष्य धर्माशिवाय राहू शकतो का? या सगळ्या गुंतागुंतीच्या, अस्तित्वाचा मागोवा घेत हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाणाऱ्या प्रश्नमालिकेत जेव्हा मार्कससारखे (ट्रॅव्हिस फिमल) बेभरवशी चलांक येऊन मिळतात, तेव्हा आपली ही प्रलयोत्तर नौका विज्ञानकथा, मानवी नाट्य, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा वगैरे अनेक लाटांवर हेलकावे खात खात, प्रवास सर्वार्थाने संस्मरणीय करून सोडते! इथेही उद्यान आहे, साप आहे, अॅडम आहे आणि ईव्हदेखील आहे, फक्त त्यांचे संदर्भ तेवढे कल्पनातीत बदलले आहेत.

मालिकेत काही आस्तिक पात्रे आहेत आणि काही नास्तिक पात्रे. परंतु या सगळ्याच पात्रांचा प्रवास अतिशय गहीरा, रंगीत आणि भरीव झालाय. किंबहूना पात्रे कशी लिहावीत याचा वस्तुपाठच या मालिकेला म्हणता येईल. एकूण एक पात्राच्या दृढ होत जाणाऱ्या, बदलत जाणाऱ्या श्रद्धा खरोखरीच मेंदू आणि मनावर शहारे आणतात. सश्रद्धांपैकी काहींच्या श्रद्धा डगमगतात तर अश्रद्धांपैकी ज्यांच्याकडून सर्वांत कमीहूनही कमी अपेक्षा होती, त्यांच्या मनात श्रद्धेचे अंकुर फुटतात. धार्मिक असणारे सहजच अधर्माचरण करून जातात तर काही धर्मच नाकारणारे आपल्याही नकळत एखादा धर्मच स्थापन करून पाळायला सुरुवात करतात. आस्तिकतेचा अतिरेक नास्तिकतेप्रत नेऊन, मूळ सांगाडाच मोडतो तर नास्तिकतेचाही अतिरेक नास्तिकतेबाबत आस्तिकतेचा अट्टाहास निर्माण करून मूळ सांगाडाच मोडतो. वाचायला किती जरी तात्त्विक वाटत असले तरी मालिकेत ही सगळीच स्थित्यंतरे अतिशय रोमहर्षक, मनोरंजक व तितक्याच सूचक संयतपणाने मांडली आहेत, हेच मला वाटते या मालिकेचे सर्वांत मोठे यश आहे!

अमांडा कॉलिनने इतके उत्कृष्ट काम केले आहे की, शब्दांत मांडताच येणार नाही. आई, रक्षक, भक्षक, नव्याच जाणीवांनी बिथरून गेलेले यंत्र अशा विस्तृत पटावर तिने लीलया संचार केला आहे. अबुबकर सलीमने यंत्रमानवाच्या रूपात संयतपणाची कमाल केली आहे. किंबहूना आपल्याकडे यंत्रमानव म्हटला की विनाकारण ब्रेकडान्ससारख्या हालचाली आणि विचित्र पद्धतीत बोलणे, एवढाच अर्थ ठाऊक असणाऱ्यांनी या दोघांचे काम पाहायलाच हवे! ‘रेज़्ड बाय वूल्व्ह्ज़’ नावातील कोटी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लहानग्या विण्टा मॅकग्राने मोगलीचे एक ताजे, प्रलयोत्तर (पोस्ट अपोकॅलिप्टिक) रूप साकारले आहे.

समान अथवा समांतर घटना नास्तिकासोबत व आस्तिकासोबत घडूनही त्यांचा परिणाम मात्र दोन्हीही विचारसरणींच्या पात्रांच्या वागणुकीमुळे केवढा भिन्न असू शकतो, हे दाखवण्याची मालिकेची पद्धत काहीच्या काही बेफाट सुंदर आहे. मालिकेची आणखी एक जमेची बाजू म्हणजे अत्यधिक नग्नता आणि शिव्या वेबमालिकांचा स्थायीभाव होऊ लागलेला असताना, या मालिकेत नग्नता अतिशय कमी आहे व शिव्या तर जवळजवळ नाहीतच (एका भागात फक्त ‘बिच्’ शब्द वापरलेला दिसतो!). या दोन्ही गोष्टी कमीत कमी ठेवूनही निव्वळ कल्पनाशक्ती व सशक्त कथानक यांच्या जोरावर चांगली मालिका बनवता येऊ शकते, हे आपल्याकडील वेबसीरीजकारांनी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’कडून आवर्जून शिकण्यासारखे आहे!

माझा आक्षेप आहे तो ट्रॅव्हिस फिमलबद्दल. त्याने साकारलेल्या राग्नार लोथब्रोकच्या (‘व्हायकिंग’, २०१३-२०१७) भूमिकेचा मी अतोनात पंखा आहे. ही मालिका मी पाहायला सुरुवात केली ती त्याच्याच साठी. आणि तिथेच माझा भ्रमनिरास झाला. भौगोलिक परिस्थिती वगळता त्याने साकारलेले मार्कसचे पात्र आणि राग्नार यांच्या लेखनात व परिपोषात काडीमात्र फरक नाही. ही लेखकाची त्रुटी आहे. त्याहून वाईट म्हणजे ज्या देहबोलीमुळे राग्नार प्रचंड लोकप्रिय झाला, ती देहबोली नव्या पात्रासाठी म्हणून बदलण्याचे ट्रॅव्हिसने किंचितदेखील कष्ट घेतलेले नाहीत. राग्नार पाहाताना मला वाटायचं की, काय ताकदीचा कायिक अभिनेता आहे. पण आता वाटतं की, याला एकतर एवढेच जमते किंवा त्याला काहीतरी आजार आहे की काय? कारण या दोन कारणांच्या शिवाय त्याचे राग्नारसारखेच सदोदित भिरभिरणारे डोळे, बोलताना गरजेपेक्षा जास्त हलणारे चेहऱ्याचे स्नायू यांचे स्पष्टीकरण देताच येत नाही. इथे एक लक्षात घ्या की, त्याने साकारलेले मार्कसचे पात्र या मालिकेच्या दृष्टीने चपखलच आहे, मात्र त्यात लेखनाच्या व अभिनयाच्या दृष्टीने काही एक नावीन्य नाही, एवढेच! शिवाय या मालिकेवर रिडली स्कॉटच्या आधीच्या फिल्मॉग्रफीचा खूपच जास्त प्रभाव जाणवतो, हे वेगळंच.

मालिकेच्या पहिल्या पर्वाचा अंतिम भाग आधीच्या नऊ भागांमध्ये निर्माण केलेल्या प्रश्नांपैकी काहींची उत्तरे देतो. काही भयंकर रहस्योद्घाटनेही करतो. पण त्याचवेळी अनेकपटींनी जास्त प्रश्न निर्माणसुद्धा करून पुढच्या पर्वासाठी सुयोग्य उत्कंठा निर्माण करतो! माझी एक कसोटी आहे. त्याला मी ‘दुसऱ्या पर्वाची कसोटी’ नाव दिलंय. बऱ्याच मालिका पहिले पर्व कमाल देतात. पण पहिल्या पर्वाच्या यशामुळे म्हणा वा कथेच्या कमतरतेमुळे म्हणा वा यशामुळे नको ते लोक मालिकेत रस घ्यायला लागल्यामुळे म्हणा, त्यांचे दुसरे पर्व गंडते! याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे राजकीय हव्यासापायी चुकलेले अमेझॉनच्या ‘द बॉईज़’चे दुसरे पर्व! माझे असे गृहितक आहे की, जी मालिका दुसरे पर्वदेखील पहिल्याइतकेच चांगले देते, ती नंतरचे किमान एक पर्व तरी गंडण्याची शक्यता कमी होऊन बसते. त्या अर्थी ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ पहिल्या जबरदस्त पर्वानंतर एका अवघड वळणाशी येऊन थांबलीये. राजकीयदृष्ट्या बरोबर (पॉलिटिकली करेक्ट) ठरण्याचा अट्टाहास, कथेपेक्षा प्रोपगण्डालाच अधिक महत्त्व देणे वगैरे भोवऱ्यांपायी भल्याभल्या मालिका श्रेष्ठतेप्रत जाण्याआधीच बुडाल्या आहेत. ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’ ही सुंदररित्या बांधलेली मनूची नौका किंवा नोहाज़् आर्क आता बुडते की तरते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *