बुद्धिमतां वरिष्ठम्

सुग्रीवाने फक्त सीता कुठे आहे, याचाच शोध लावायला सांगितले होते (किष्किंधा. सर्ग ४१). त्याप्रमाणे हनुमानाने सीतेचा शोध लावलादेखील (सुंदर १५). वास्तविक सुग्रीवाने सांगितलेले काम इथेच संपले होते. आता कुणी प्रश्न विचारेल, मग लंका जाळण्याची काय गरज होती, काम तर झाले होते ना? पण लक्षात घ्या, सांगितले तेवढेच काम करतो तो असतो सांगकाम्या! हनुमान काय सांगकाम्या होता का? वाल्मिकींनी जागोजागी हनुमानाचे वर्णन केलेले आहे. किष्किंधाकांड सर्ग २ येथे तो सुग्रीवाचा मंत्री आणि सचिव (श्लो. ५, १२) असल्याचे सांगितले आहे. त्याच सर्गात हनुमानाला उद्देशून वाक्यकोविद (श्लो. १३) अर्थात चर्चा आणि वाटाघाटी करण्यात कुशल, असे विशेषण वापरले आहे. पुढे सर्ग ३ येथे तर स्वतः राम हनुमानाला वेदज्ञ (श्लो. २८), व्याकरणपटू (श्लो. २९), देहबोलीचा जाणकार (श्लो. ३०) म्हणतो आणि हनुमाच्या भाषेची, वाणीची व स्पष्टपणे विषय मांडण्याची स्तुती (श्लो. ३१-३३) करतो. पुढे सर्ग ४४ येथे सुग्रीव स्वतः हनुमानाला नीतीशास्त्राचा पंडित म्हणतो आणि वर हेही सांगतो की, नीतीशास्त्र व देशकालपरिस्थितीचं भान ठेवून वागणारा असा तू एकमेव आहेस (श्लो. ७). अशी वर्णनं जागोजागी आहेत, फक्त विस्तारभयास्तव ती सारी देत नाही एवढंच. आता हे तर निश्चित झालं की, हनुमान केवळ सांगकाम्या दूत नव्हता तर राजकारण आणि पुढे वाढून ठेवलेलं युद्ध यांची व्यवस्थित जाणीव असलेला ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असा महाबली होता. त्याने खरोखर सीतेचा नुसता शोधच नाही लावला, तर त्या गोष्टीचा पुरावा म्हणून तिला रामाची अंगठी दिली आणि बदल्यात तिचा चूडामणिसुद्धा रामाला दाखवण्यासाठी घेतला (सुंदरकांड, सर्ग ३६, ३८). तिला पूर्णपणे आश्वस्त केलं (सर्ग ३९).

केवळ एवढेच करून हनुमान भारताच्या मुख्यभूमीवर परतत नाही. तर तो विचार करतो की (सर्ग ४१, श्लो. २-४), “सीता तर सापडली, आता फक्त थोडंसंच काम बाकी आहे. राक्षसांसोबत सामभाव वापरून फायदा नाही. पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे, त्यामुळे दान वापरूनही फायदा नाही. मुळातच गर्विष्ठ असल्यामुळे भेदनीती वापरण्यातही काही अर्थ नाही. तेव्हा यांच्यावर ताकदच वापरली पाहिजे”. पण थोडंसंच उरलेलं काम म्हणजे तरी कोणतं? हनुमान स्वत:शीच विचार करतोय (श्लो. ५-९), “जो माणूस मुख्य कामासोबतच इतर लहानसहान पण गरजेची कामं करतो, त्यानेच खरं कार्य पार पाडलं म्हणावं. जर का याच भेटीत मी राक्षसांच्या ताकदीचा अंदाज लावू शकलो, तरच भविष्यात होणाऱ्या युद्धाचं नियोजन नीट करता येईल. आणि असा अंदाज लावायचा तर रावणाचे मंत्री, सैन्य आणि सहाय्यकांसोबत काही तरी करून भांडण उकरून काढलं पाहिजे”! आणि म्हणून मग हनुमानाने राक्षसांना डिवचण्यासाठी प्रमदावनाचा विध्वंस केला, काही जणांना वाटतं त्याप्रमाणे माकडचाळा म्हणून नाही. एवढा बुद्धिमान होता हनुमान.

उद्यानाचा असा विध्वंस झाल्याचं समजल्याबरोब्बर रावणाच्या डोळ्यांत रागाने अश्रू उभे राहिले (सर्ग ४२, श्लो. २३). त्याने किंकर नावाचे ८० सहस्र राक्षस हनुमानाच्या नाशासाठी पाठवले (श्लो. २५). गदा, परीघ वगैरे शस्त्रांनी संपन्न असे ते राक्षस जसे हनुमानावर धावून आले (श्लो. २८), तशी महावीराग्रणी हनुमंताने गर्जना केली (श्लो. ३३-३६),
“राम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांचा विजय असो. सहजपणे पराक्रम करून जाणाऱ्या कोसलेंद्र श्रीरामाचा मी दास आहे. शत्रूसैन्याचा नाश करणारा मी मारुतात्मज हनुमान आहे. मी हजारो झाडे आणि दगडधोंडे फेकत जेव्हा युद्ध करेन, तेव्हा एकच काय तुमचे सहस्र रावण जरी आले तरी माझी बरोबरी करू शकणार नाहीत. तुमच्या डोळ्यांदेखत मी लंकेचा नाश करेन आणि सीतेला प्रणाम करून निघूनसुद्धा जाईन”!

ही नुसती रणगर्जना नव्हती, तर वाक्यज्ञ हनुमानाने जाणूनबुजून राक्षसांना डिवचण्यासाठी वापरलेले शब्द होते. थोड्याफार फरकाने हेच शब्द तो राक्षसांचा चैत्यप्रासाद तोडल्यावरही वापरतो (सर्ग ४३). हनुमानाने एक परीघ उचलला (सर्ग ४२, श्लो. ३९) आणि वीजेच्या चपळाईने तो त्या सैन्यात घुसला व रणमदाने न्हाऊन एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे राक्षसांचा संहार करू लागला. बघता बघता त्याने सारे किंकर संपवले. रावणाचा चैत्यप्रासाद उद्ध्वस्त केला. प्रहस्ताचा पुत्र जम्बुमालीची छाती फोडून त्याला मारले (सर्ग ४४). रावणाच्या मंत्र्याचे सातच्या सात पुत्र यमसदनी धाडले (सर्ग ४५). विरूपाक्ष, यूपाक्ष, दुर्धर, प्रघस, भासकर्ण असे रावणाचे ५ पराक्रमी सेनापतीसुद्धा एकहाती मारले (सर्ग ४६). एवढेच नव्हे, तर रावणाचा मुलगा अक्ष याला तर पार जमिनीवर आपटून मारलं (सर्ग ४७). रावणाचा मुलगा मेघनाद तथा इंद्रजित याने ब्रह्मपाशात हनुमानाला बांधलं खरं, पण तो ब्रह्मपाश नष्ट झाला तरी हनुमान सुटण्यासाठी काहीच करत नाहीये हे इंद्रजिताच्या लक्षात आलं (सर्ग ४८, श्लो. ४९-५०). का केलं हनुमानाने असं? कारण, हनुमानाला राक्षसांची ताकद पारखायची होती, ती पारखून झाली होती. आता त्याला रावणाला जोखायचं होतं (श्लो. ४७).

रावणाला पाहिल्यावर हनुमान मनातल्या मनात मनापासून त्याच्या रूप, बल आणि पराक्रमाची स्तुती करतो. रावण जर अधर्माच्या बाजूने नसता, तर इंद्रासह समस्त देवांचाही संरक्षक होऊ शकला असता, असाही विचार करतो (सर्ग ४९). पण म्हणून तो रावणाच्या व्यक्तिमत्त्वापुढे दबून जातो का? तर बिलकुल नाही! तो आधी रावणाला गोडीत समजावतो. मग राम मनुष्य आहे आणि तुझ्या वरदानात मनुष्यापासून भय नसल्याची अट नाही, हे सुद्धा सांगतो. हनुमान म्हणतो, मी एकटाच तुझ्या समस्त लंकेचा नाश करू शकतो, पण रामाची आज्ञा नाही म्हणून थांबलोय. आणि रामापुढे तर ब्रह्मा, रुद्र आणि इंद्रदेखील युद्धात टिकू शकत नाही, तेव्हा वेळीच सावध हो. थोडक्यात सांगायचं तर हनुमान रावणाला अत्यंत सभ्य भाषेत तू जे करतोय ते किती चुकीचं आहे आणि आता थांबला नाहीस तर बदल्यात राम तुझं काय करील हे सांगतो. हनुमानाचे हे सबंध भाषण मूळातूनच वाचण्यासारखे (सर्ग ५१) आणि डिप्लोमॅटिक चर्चा करताना एखाद्या राजदूताने कसे बोलावे व कसा आपल्याच देशाचा कार्यभाग रेटावा याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अर्थातच रावणाला ते पटले नाही. तो वास्तविक हनुमाला मारण्याचीच आज्ञा देणार होता, पण विभीषण मध्ये पडला व म्हणाला की, दूताला मारणं न्यायोचित नसतं (सर्ग ५२, श्लो. ५). ज्या हनुमानाने एकहाती सबंध रावणसैन्याचा धुव्वा उडवला होता त्याला मारू नका तर दुसरा दंड द्या असं विभीषण म्हणतोय. काय गंमत आहे ना, वरवर वाटतं की विभीषणाने हनुमानाला वाचवलं. प्रत्यक्षात त्याने रावणालाच मूर्खपणा करण्यापासून आणि हनुमानाच्या हातून मरण्यापासून वाचवलंय! रावणाने मग हनुमानाला मारण्यापेक्षा त्याचा न्यायोचित अंगभंग करायचं ठरवलं आणि त्याच्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा दिली (सर्ग ५३). पण याचा परिणाम उलटाच झाला. हनुमाला काही व्हायच्या ऐवजी त्याने त्या जळत्या शेपटीने सबंध लंकाच जाळली (सर्ग ५४). नंतर सीता ठिक आहे की नाही याची खात्री करून (सर्ग ५६) तो सहजपणे उत्तरेकडे झेपावला.

रामादिंची भेट झाल्यावर हनुमानाने त्यांना संपूर्ण वृत्तांत तर सांगितलाच, परंतु सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याने लंकेचं चक्षर्वैसत्यम् वर्णनसुद्धा केलं. लंकेत असलेले दुर्ग, दरवाजे, सैन्याचं बलाबल आणि त्यांची संख्या व मांडणी सारी सारी गोळा केलेली माहिती हनुमानाने सांगितली (युद्ध. सर्ग ३). किंबहूना रावण आणि विभीषण यांच्यात मतभेद आहेत हे बरोब्बर जोखून त्याने नंतर जेव्हा विभीषण आश्रय मागायला आला, तेव्हा रामाला योग्य सल्लासुद्धा दिला (युद्ध १६).

हे सारं मी का सांगतोय? कारण आज हनुमान जन्मोत्सव! हनुमानाला उगाचच आपल्याकडे फक्त बळाची देवता समजलं जातं. तो बुद्धिमानसुद्धा होता, हे ठाऊक तर असतं. पण बुद्धिमान होता म्हणजे नेमका काय, हे हल्ली फारसं कुणाला ठाऊक नसतं. त्यामुळेच हनुमानाची ही वेगळी, परंतु खोलात माहिती नसलेली बाजू दाखवणं मला कर्तव्य वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच. स्वा. सावरकर म्हणतात, देवाचे गुण भक्तात उतरतात. मग हनुमानाची पूजा करणाऱ्या आम्ही त्याच्याकडून फक्त शक्तीच का घ्यावी? फक्त बुद्धी तरी का घ्यावी? आम्ही हनुमंताची डोळस भक्ती करावी आणि त्याचं बुद्धी-बळ दोन्हीही अंगिकारावं, तरच तो मारुतीराया प्रसन्न होईल ना? तेव्हा हनुमानाची भक्ती करता करता त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याचीही योग्यता तो देवो, हीच सर्वांना हनुमान जन्मोत्सवाची शुभेच्छा!!

— © विक्रम श्रीराम एडके
(संपर्क: www.vikramedke.com)

3 thoughts on “बुद्धिमतां वरिष्ठम्

  1. हनुमान म्हणजे शक्ती आणि युक्ति चा महासागर..

  2. अगदी समर्पक उपदेश केला आहे.
    बल व बुद्धी चा दैवत असलेल्या हनुमंता कडे हेच मागणे.

Leave a Reply to Prasad Bapat Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *