होळी – विदेशी कापडांची आणि विदेशी अहंकाराचीही!

वंगभंगाच्या चळवळीने देश ढवळून निघाला होता. स्वदेशीची चळवळही फोफावू लागली होती. लो. टिळक आणि त्यांचे सहकारी सर्वत्र फिरून या विषयावर जागृती करत होते. दि. १ ऑक्टोबर १९०५ या दिवशी पुण्यातील सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात एका तरुण विद्यार्थ्याने विदेशी मालावरील बहिष्काराला ठसठशीत स्वरूप यावे म्हणून विदेशी कापडांची होळी करण्यात यावी (स्वा. सावरकर चरित्र, शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. १०६) अशी कल्पना मांडली. तो तरुण म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर!

केळकरांना काही ही कल्पना पसंत पडली नाही. ते विदेशी कपडे जाळून फुकट घालवण्यापेक्षा अंध, पंग, रोगग्रस्त अशा बांधवांना वाटून टाकणे योग्य, असे त्यांचे मत होते. धनंजय कीरांच्या शब्दांत सांगायचे तर, “यावर सावरकरांनी हळूच टोला दिला की, या होळीने जी ज्वाळा पेटेल ती नैतिक नि भौतिक दृष्टीनेही अधिक मोलाची नि चिरस्थायी ठरेल”. (स्वा. सावरकर चरित्र, धनंजय कीर, अनु. द. पां. खांबेटे, आ. २००८, पृ. २२-२३)

हा प्रकार झाला त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. ते परतल्यावर सावरकरादी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कानावर आपली कल्पना घातली. टिळकांना ती पसंत पडली, पण याचे काय परिणाम होतील हा ही विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी सावरकरप्रभृती विद्यार्थ्यांना नकार दिला नाही, पण त्यांचे कर्तृत्व व तळमळ यांची पारख करण्यासाठी ते म्हणाले (करंदीकर, पृ. १०६), “होळीच करावयाची तर ती पोरकट दिसता कामा नये, किमान अर्धी गाडीभर तरी कपडे गोळा कराल तर होळी करण्याला काही अर्थ आहे”.

सावरकरांनी हे आह्वान स्वीकारले व ते ताबडतोब विदेशी कापडे गोळा करण्याच्या उद्योगाला लागले (कीर, पृ. २३). या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी एक व्याख्यानही दिले (करंदीकर, पृ. १०६). त्याकाळी पुण्यात ‘महाराष्ट्र विद्यालय’ नावाची भोपटकर बंधूंनी चालवलेली एक राष्ट्रीय बाण्याची शिक्षणसंस्था होती. त्या संस्थेतील विद्यार्थ्यांचीही सावरकरांना मदत (तत्रोक्त) झाली. करंदीकर लिहितात की, टिळकांच्या मागणीप्रमाणे भरपूर कपडे उपलब्ध झाले होते (तत्रोक्त). कीर मात्र ‘कपड्यांनी भरलेली गाडी’ असा शब्द वापरतात. तेव्हा टिळकांची अपेक्षा अर्धी गाडीभरच असताना सावरकरांनी मात्र गाडीभर कपडे गोळा केले होते की काय, असा निष्कर्ष काढायला वाव आहे. कपडे किती का असेनात, ते एका महाविद्यालयीन युवकाने, फक्त ५-६ दिवसांत, कोणतीही आधुनिक माध्यमे पाठीशी नसताना केवळ तरुणांचे संघटन करून गोळा केले होते हे महत्त्वाचे!

आणि ७ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सायंकाळी ते सगळे कपडे एका गाड्यावर भरले गेले. त्यांचे बलिदान व्हावयाचे असल्यामुळे त्यांच्यावर खूप सारा गुलाल टाकण्यात आला. गाडीच्या आगेमागे नागरिकांचा प्रचंड घोळका (करंदीकर, पृ. १०६) अशा थाटात ही कपड्यांची मिरवणूक मंडईपासून निघाली! प्रा. शि. म. परांजपे, ‘भाला’कार भोपटकर वगैरे मंडळी त्यात सुरुवातीपासूनच सहभागी होती. मिरवणूक जसजशी लकडी पुलाच्या दिशेने निघाली तसतसे अजूनच लोक त्यात सहभागी होऊ लागले. ‘चित्रशाळे’च्या आसपास टिळकही त्यात सहभागी झाले. मिरवणूक लकडीपुलाच्या पलिकडे एका मैदानात थांबली. गाडीवरील कपडे एका शेतात रचण्यात आले. त्यावेळी टिळकांनी मुद्दा मांडला की (कीर, पृ. २३. करंदीकर, पृ. १०६), होळी एका जागी करावी आणि व्याख्याने दुसरीकडे द्यावीत. त्यावर सावरकरांनी कोटीक्रम मांडला की (कीर, पृ. २३), “मग ही मिरवणूक तरी कशाला हवी होती? आम्हाला कपडे इकडे पाठवून देता आले असते नि व्याख्याने रे मार्केटातच देता आली असती. वस्तुतः विलायती कपड्यांच्या जळत्या ढिगासमोर जळजळीत भाषणे करणे हेच युक्त! कारण, असे केले तरच लोकांच्या मनावर उमटणारा ठसा खोलवर जाईल नि कायम राहील”. लक्षात घ्या, सावरकर टिळकांना केवढे प्रचंड मानायचे याचे दाखले सावरकरांच्या चरित्रात अनेक सापडतात. सावरकरांनी टिळकांवर अनेक काव्ये लिहिली आहेत. टिळक गेले तेव्हा अंदमानात बंदी असलेल्या सावरकरांनी संपर्काची अभिनव साधने वापरून सेल्युलर जेलमध्येच नव्हे तर सबंध अंदमानात उपवास घडवून आणला होता (समग्र सावरकर, खंड २, आ. १९९३, माझी जन्मठेप, पृ. ४७४). परंतु तेच सावरकर, वय लहान असतानाही टिळकांच्या न पटलेल्या मुद्याला विरोध करताना डगमगले नाहीयेत. डोळस भक्ती या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या तारतम्यभावाचे केवढे उत्कृष्ट उदाहरण आहे हे! सभा होळीच्याच ठिकाणी झाली.

टिळकांचे या प्रसंगीचे भाषण अत्यंत तेजस्वी झाले. आपल्या भाषणाच्या ओघात ‘काळ’कर्ते परांजपेंनी जळत्या ढिगातला एक कोट काढून लोकांपुढे धरला. आणि त्या खिशाची झडती घेता घेता त्यांनी व्यापाराच्या मिषाने खिसे भरभरून हिंदुस्थानची संपत्ती लुटून नेणाऱ्या इंग्रजांची हजेरी घेतली आणि ‘असा हा पातकी कोट मी अग्निसमर्पण करतो’ असे म्हणून त्यांनी तो कोट धगधगलेल्या होळीत फेकला (करंदीकर, पृ. १०६-१०७). होळीच्या ज्वाळा गगनाला जाऊन भिडल्या तशाच त्या ब्रिटिश सिंहासनालाही झळ बसवून गेल्या! या होळीनेच देशभर ठसठसत असलेल्या ब्रिटीशविरोधी द्वेषाग्नीत तेल ओतले. ७ ऑक्टोबर १९०५ हा दिवस होता दसऱ्याचा! दसऱ्याच्या दिवशी होळी पेटविणारे आणि त्यातून इंग्रजी सत्तेचा अहंकार जाळून टाकणारे, सावरकरच!

कीर लिहितात (पृ. २३) की, त्या काळात सावरकरांनी केलेल्या भाषणांचा आपल्या स्मृतिपटलावर अनेक वर्षेपर्यंत खोल ठसा उमटून राहिला होता, असे आपल्या उत्तरायुष्यात केळकरांनी पुष्कळदा बोलून दाखवले होते. पुण्यातील सार्वजनिक सभेमध्ये सावरकरांनी केलेल्या भाषणाचे वर्णन करताना एक वार्ताहर म्हणाला होता (कीर, पृ. २४), ‘त्यांचे भाषण मनस्वी वक्तृत्वकुशल होते आणि कमालीचे ओजस्वी होते! त्यांचे वय जेमतेम बावीस वर्षांचे आहे, पण आताच त्यांनी एखाद्या कसलेल्या वक्त्याचे स्पृहणीय स्थान पटकावले आहे”.

अर्थात, सगळ्याच प्रतिक्रिया काही उत्साहवर्धक नव्हत्या. या होळीसाठी शिक्षा म्हणून (करंदीकर, पृ. १०७) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सावरकरांना दहा रुपये दंड ठोठावला व वसतिगृह सोडण्यास फर्मावले. सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि सावरकरांकडे सहानुभूतीचा व द्रव्याचा ओघच वाहू लागला (कीर, पृ. २४)! गंमत म्हणजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच सावरकरांच्या दंडासाठी स्वयंस्फूर्तीने निधी गोळा केला. एका विद्यार्थ्याने तर त्याला घरून आलेल्या मनिऑर्डरचे पैसे त्यासाठी देऊ केले. निधी दंडाच्या रकमेपेक्षाही अधिक गोळा झाला. सावरकरांनी लोकांच्या, मित्रांच्या भावनांचा मान म्हणून दंडापुरती रक्कम घेतली व उरलेले पैसे पैसाफंड व इतर काही संस्थांना देऊन टाकले. कीरांच्या मते मात्र (पृ. २४) सावरकरांनी दंड स्वतःच्या खिशातून भरला व लोकांनी आणि मित्रांनी गोळा केलेले पैसे पैसाफंड वगैरे संस्थांना देऊन टाकले. नेमके काहीही घडलेले असो, परंतु सावरकर जरी राजकारणात असले, तरीही त्यांनी हल्लीच्या काही राजकीय नेत्यांप्रमाणे तो पैसा हडप केला नाही, हे निश्चित!

या दंडाच्या घटनेमुळे साक्षात टिळकांनी ‘केसरी’त १७ ऑक्टोबर व २४ ऑक्टोबर अशा दोन भागांत महाविद्यालयाच्या वागणुकीचा समाचार घेणारा अग्रलेख लिहिला (करंदीकर, पृ. १०७). त्याचे शीर्षक होते, ‘हे आमचे गुरूच नव्हेत’!

— © विक्रम श्रीराम एडके

(सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *