एक डाव चाणक्याचा..!

image

जातीच्याच अनुषंगाने बोलायचं झालं, तर नरेंद्र मोदी मागासवर्गीय आहेत. ही गोष्ट मला खूप पूर्वीपासून माहिती होती. कदाचित आपल्यापैकीही बहुतेकांना माहिती असेल. परंतू स्वतः मोदींनी या बाबीचा कधीही जाहीरपणे उल्लेख केला नव्हता. मला गंमत वाटायची. या अनुल्लेखामागची खेळीही लक्षात यायची. ते वाट पाहात होते की, कधी आपल्या या मौनामुळे अस्वस्थ होऊन विरोधक स्वत:च ही बाब चर्चेत आणतील. परवा काँग्रेसच्या बैठकीत मोदींना या बाबतीत लहानसे सूत सापडले, आणि मोदींमधील कसलेल्या राजकारण्याने ते सूत घट्ट पकडत थेट स्वर्ग गाठला.

परिणाम? आज भाजपच्या बैठकीमध्ये इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मोदींनी स्वत:च्या मागासवर्गीय असल्याचा उल्लेख केला आणि मोठ्या खुबीने दाखवून दिलं की, ‘मी मागासवर्गीय आहे, खालच्या जातीतून आलोय म्हणून हे सत्तेच्या मदाने उन्मत्त राजघराणे माझ्याशी लढायला पुढे येत नाहीत – कमीपणा समजतात”!

मेंदूला अक्षरशः झिणझिण्या आल्या माझ्या! वाटलं, काय पोहोचलेला माणूस असेल हा की, विरोधकांनी चेंडू टाकण्याची सुतराम शक्यता नसताना त्यांना चेंडू टाकायला लावून, नव्हे नव्हे, तर आपल्याला पाहिजे तसाच आणि त्याच ठिकाणी टाकायला लावून या माणसाने खाड्कन षटकार ठोकला! ‘आम्ही मोदींना किंमत देत नाही’ हा जो काही आटापिटा विरोधकांनी गेले काही दिवस चालवलाय त्याचा मोदी असा अन्वयार्थ लावतील, एवढेच नव्हे तर तो जाहीरपणे मांडतील हे ना कुणा काँग्रेसी नेत्याच्या स्वप्नात आलं असेल ना पाचशे कोटी घेऊन पप्पूची आश्वासक छवी बनवायला निघालेल्या त्या पीआर कंपनीच्या! बरं, बोलायची सोय नाही – कारण स्वत:ला किती जरी धर्मनिरपेक्ष म्हणवलं तरीही या पाखंडी पक्षांचं राजकारण जाती आणि धर्माच्याच गणितांवर चालतं, हे उघड गुपित आहे. त्यामुळे आज मोदींनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीच राहाणार नाही – कारण, बोललो तर पुन्हा ‘ती’ मागासवर्गीय मतं जाण्याची भीती. दलित राजकारण करणाऱ्या पक्षांना मोदी अजिबातच मोजत नसले, तरी त्या ही पक्षांना मोदींच्या या विधानाचा फटका हमखास बसणार!

मुळात भारतीय जनमानसाने ‘जात’ किती जरी नाही म्हटलं तरी खोलवर कुठेतरी जपून ठेवलीये. प्रत्येकाच्या मनात आत कुठे ना कुठे ही जातीय अस्मिता तेवत असतेच. मोदींनी ही मानसिकता अश्या काही कौशल्याने वापरून घेतलीये की, मोदी कुणालाही थेटपणे जातीयवादी तर वाटणार नाहीतच, परंतू विरोधकांना मागासवर्गीय मतांचा फटका मात्र बरोब्बर बसेल!

मी मोदींची तुलना कायम रजनीकांतशी करतो. रजनीला जसे सिनेमाच्या पडद्यावर काहीच अशक्य नसते, तद्वतच मोदींना भारतीय राजकारणात काहीच अशक्य नाही. दोन्हीचे कारण एकच – भारतीय जनमानसाची नाडी माहिती असणे! हा सूक्ष्म अभ्यास आपोआपच अचूक टायमिंग पुरवतो. मात्र आज मला मोदींची तुलना आचार्य चाणक्यांशी करावीशी वाटतेय. चाणक्यांनी जो शत्रूची बलस्थानेच शत्रूविरुद्ध वापरण्याचा आणि आपली मर्मस्थानेच बलस्थानात परिवर्तित करण्याचा जो मंत्र दिला, त्याचे तंतोतंत अनुसरण मोदी करत आहेत – किंबहूना त्या मंत्रात सुधारणा करून ते हाती येईल ती प्रत्येक गोष्ट विरोधकांविरुद्ध वापरताहेत! हे अतिशय विजिगीषू लक्षण आहे. हे भारतीय समाजाला मनापासून आवडणाऱ्या ‘अचाट शक्तीचा महानायक’ या संकल्पनेचे लक्षण आहे! असा महानायक जो बोजड तांत्रिक गोष्टी सांगत बसत नाही, तर सर्वसामान्यांना समजतील अशी स्वप्ने दाखवतो – त्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवतो आणि एका क्षणानंतर तर ते स्वप्न आपलं स्वत:चंच आहे यावरही गाढ विश्वास बसवतो! कल्पना करा, जो माणूस एकहाती सव्वाशे वर्ष जुन्या संघटनेला धूळ चारू शकतो, तो माणूस जर उद्या देशाचा पंतप्रधान झाला तर देशाच्या शत्रूंची काय अवस्था करेल!! या कल्पनेतच “वोट फॉर इण्डिया”ची बीजे सामावलेली आहेत. आणि माझी खात्री आहे की, येत्या निवडणुकीत प्रत्येक तरुण मतदार याच कल्पनेला उराशी बाळगून मतदान करणार आहे. मोदींसाठी नव्हे, तर त्यांच्या आणि स्वत:च्या स्वप्नातल्या भारतासाठी!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *