कथा

जुनी गोष्ट आहे. त्याकाळी खूप फळं होते. परंतू सफरचंद सगळ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ होते. त्याचा रंग, आकार, चव सारे काही दैवी! लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे.

काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा! त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे! नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः! साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी!! परंतू यासोबतच आणखीही काही घटना घडल्या. ज्यांनी केवळ आणि केवळ सफरचंदालाच आपल्या ह्रदयसिंहासनी बसवले होते, ते केवळ सफरचंदाशीच निष्ठावान राहिले. त्यांच्या दृष्टीने आंबा मुळातच चुकीचा, निकृष्ट ठरला. त्यांनी त्याला नावे ठेवायलाही सुरुवात केली. नाही नाही ते बोलायला सुरुवात केली. काही रसिक मात्र दोन्हीही फळांचे सारखेच दिवाने झाले होते. त्यांना काय, चव चांगली असण्याशी मतलब. याखेरीज केवळ आंब्याशीच निष्ठावान असणाऱ्या रसिकांचाही एक गट हळुहळू तयार होऊ लागला होताच! त्याही मंडळींचे सफरचंद-निष्ठांसारखेच सूत्र होते — आंबा तेवढा श्रेष्ठ, बाकी सारेच निकृष्ट!!

दरम्यान आणखीही एक घटना घडली. इतर फळांना आंब्याला मिळालेले यश पाहून कमालीचा हेवा वाटू लागला होता. सफरचंदाची इतक्या वर्षांची मक्तेदारी आपल्याला लाख प्रयत्न करूनही मोडता आली नव्हती, पण या काल आलेल्या पोराने – या आंब्याने ती पहिल्या झटक्यातच मोडून काढली; नव्हे तर स्वत:चे अढळस्थानही स्थापित केले — हे त्यांच्या रागाचे मूळ कारण होते! अश्यातच कुणा एका फळाच्या मेंदूत कल्पना चमकली! त्याने थोडा अभ्यास केला, समजून घेतले आणि स्वत:ला आंब्याचा वेष घेतला. थोड्याफार प्रयत्नाने चवीचीही नक्कल जमवून आणली! मुळातच माल नकली असल्याने किंमतही कमीच होती. चव आणि इतर अनुभवही अगदी जसाच्या तसा नसला तरीदेखील जवळजवळ सारखाच होता. साहजिकच ज्यांना आंबा परवडत नव्हता वा ज्यांच्यात मोसम येईपर्यंत थांबण्याचा संयम नव्हता, असे सारेच लोक या नकली आंब्याकडे धाव घेऊ लागले! तुफान चालू लागला हा नकली आंबा. पण काही दिवसच. कारण ही क्लृप्ती आता इतरही फळांना समजली होती. हा हा म्हणता म्हणता बाजारात या नकली आंब्यांचे पेवच फुटले. सगळ्या फळांनी आंब्याच्या लोकप्रियतेच्या या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला सुरुवात केली. सगळी फळं आपली मूळची, खरीखुरी चव विसरून आंबा होण्याच्या पाठी लागले होते. अपवाद केवळ — सफरचंदाचा! कितीही नाही म्हटलं तरी तो एकेकाळचा राजा होता. काळ अनुकूल असला की स्वयंप्रज्ञा नसलेली मंडळी अशीच नकला करतात, हे त्यानेही पूर्वी कधीकाळी अनुभवलेले होते. एवढेच नव्हे, तर एकच एक चव सगळीकडून मिळत राहिली, तर लोक त्या चवीलाच कंटाळतात हे त्याला पक्के ठाऊक होते! त्यामुळे तो नेटाने त्याची मूळ चव संपूर्ण ताकदीनिशी देतच राहिला, रसिकांना तृप्त करतच राहिला!

इकडे खरा आंबा मात्र अतिशय हैराण झाला होता. सगळीकडे त्याचीच चव निर्माण झाल्यामुळे त्याची किंमत आपोआपच कमी झाली होती. शिवाय त्याची चव मुळची असल्यामुळे तिच्यासाठी एक विशेष अशी प्रक्रिया होती. तिला वेळ लागायचा. बाजारात आता तिच चव खूपच कमी वेळात उपलब्ध होऊ लागल्यामुळे आंब्याला आता कुणीच विचारेनासं झालं होतं; ना कुणाला त्याच्या मोसमाची अन् प्रक्रियेची वाट पाहायची इच्छा उरली होती. फळबाजारातून आपले चंबूगबाळे आवरण्याखेरीज आंब्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. की होता..?

आंब्याने निश्चय केला, अशी सहजासहजी हार मानायची नाही. कल्पनातीत कष्टांतून तावून-सुलाखून हे स्थान मिळवलं होतं त्याने. खरीखुरी, मूळची चव ही जमेची बाजू होती त्याची. गाभा होता त्याचा. त्याने खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. आपला खरेपणाचा आणि वेगळेपणाचा गाभा कायम ठेवला त्याने. आणि त्याभोवती एक स्वतंत्र शरीर गुंफू लागला तो. स्वतंत्र शरीर, नवे शरीर! आधीपेक्षाही जास्त मेहनत घेतली स्वत:वर. आधीपेक्षाही अधिक कष्टांतून गेला तो. पण अखेरिस त्याने यश मिळवलेच! आंब्याचे रुपांतर आता वेगळ्याच चवीच्या, वेगळ्याच रंगाच्या, वेगळ्याच सुगंधाच्या, कुणी स्वप्नातही ज्याची कधी कल्पना केली नसेल अश्या एका नव्याच फळात झाले — स्ट्रॉबेरी!!

स्ट्रॉबेरी पूर्ण दिमाखानिशी बाजारात उतरला. तो अनुभव जरी दैवी देत असला, तरीही त्याची अंतर्गत रचना इतकी काही गुंतागुंतीची होती की, कुणीच त्याची नक्कल करू शकत नव्हते. आणि आता नक्कल केली तरी त्याला फरक पडणार नव्हता! कारण, त्याला माहिती होते की, आपला खरेपणा हीच आपली ताकद आहे. याच खरेपणाच्या जोरावर तो जसा आंब्यातून स्ट्रॉबेरी बनला तसाच उद्या गरज पडली तर आणखीही काही वेगळे बनेल. फक्त हिंमत हारून थांबणार नव्हता तो आता!

लोक काय, सतत नवीन चवीच्या शोधात असतात. त्यामुळे बाजाराने या स्ट्रॉबेरीचेही जोशात स्वागत केले! शिवाय पूर्वीची आंबा असतानाची पुण्याईही होतीच की त्याच्यासोबत! अर्थात रसिकांमध्ये पुन्हा एकवार गट-तट पडले. काही रसिक ताबडतोब या नव्या स्ट्रॉबेरीचे दिवाने झाले, तर काही केवळ आंब्याशीच निष्ठावंत असल्याने त्यांनी स्ट्रॉबेरीला स्पर्श करणेही पाप मानले! तेच फळ, तेच रसिक — तरीही दृष्टीकोन मात्र वेगळाच. कुठे थोडा अहंकार, तर कुठे परिवर्तन नाकारण्याची वृत्ती! परंतू स्ट्रॉबेरीला आता कश्यानेच फरक पडणार नव्हता. त्याला अनुभवाने कळून चुकले होते की, चांगला अनुभव देणे एवढेच आपल्या हातात असते. बाकी सगळेच तात्पुरते! अपेक्षेप्रमाणेच हळुहळू केवळ स्ट्रॉबेरीच्या निष्ठावंतांचाही गट तयार झालाच! त्यांपैकी बहुतेकांना आंबाही मनापासून आवडत होता आणि स्ट्रॉबेरीही! स्ट्रॉबेरी आता सिद्ध होता — नवनवीन प्रयोग करण्यासाठी! त्यासोबतच सफरचंदही टिकून होता — आपली वैशिष्ट्यपूर्ण चव देत, रसिकांना सुखावत!!

मित्रहो, उपरोक्त कथेत सफरचंद आहे — संगीतशिरोमणी इलयराजा! आंबा आहे — १९९२ ते २००३ पर्यंतचा ए. आर. रहमान! नकली आंबे आहेत — १९९८ ते २००३ दरम्यानचे जवळजवळ सारेच संगीतकार! आणि स्ट्रॉबेरी आहे — २००३ नंतरचा ए. आर. रहमान!!

(‘ऑर्कुट’ भरात असण्याच्या काळात वाचलेल्या एका इंग्रजी रुपककथेचा स्मृतीच्या आधारे, स्वैर आणि भरपूर स्वातंत्र्य घेऊन केलेला अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख/कथा वाचण्यासाठी व व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *