एरर्समधून चालणारी ट्रायल – ट्रायल अँड एरर

डॉक्युमेंटरी अथवा माहितीपट हा प्रकार आपल्याला ऐकून आणि पाहून चांगलाच परिचित आहे. जेव्हा डॉक्युमेंटरी हा प्रकार कथाकथनाचे साधन म्हणून मांडला जातो, तेव्हा मात्र त्यातून फिल्ममेकिंगची एक वेगळीच शैली निर्माण होते, त्या प्रकाराला म्हणतात मॉक्युमेंटरी, अर्थातच मॉक-डॉक्युमेंटरी! तसं बघायला गेलं तर डॉक्युमेंटरी आणि मॉक्युमेंटरी यांच्यात फारसा फरक नसतोच. बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज या एखाद्या विशिष्ट विचारसरणीला वाहून घेतलेल्या, काय निष्कर्ष काढायचाय हे आधीपासूनच पक्के ठरवून असलेल्या आणि त्याच दृष्टीने सबंध मांडणी करणाऱ्या असतात, हे उघड गुपित आहे. फक्त त्या आपल्या झुकावाला निष्पक्षतेचा बेमालूम मुखवटा चढवतात. तर मॉक्युमेंटरीमध्ये कथावस्तूपासून पात्रांपर्यंत सगळेच नकली असते. त्या अनुषंगाने बघायला गेलं तर बऱ्याचशा मॉक्युमेंटरीज या डॉक्युमेंटरीजपेक्षा जास्त प्रामाणिक ठरतील!

मॉक्युमेंटरी हा प्रकार आपल्याला काही अगदीच अपरिचित आहे असंही नाही. ‘बोराट’ (२००६) सारख्या चित्रपटांतून आणि ‘द ऑफिस’सारख्या (२००१-०३) मालिकांमधून तो आपल्याला चांगलाच माहिती झालाय. याच मॉक्युमेंटरी नामक प्रकाराला दिलेली ‘फिश-आऊट-ऑफ-वॉटर’ जॉनरची फोडणी म्हणजे अमेझॉन प्राईमवर असलेली ठसकेबाज, खटकेबाज, खुमासदार चुरचुरीत आणि तुफान विनोदी मालिका, अर्थातच एरर्समधून चालणारी ट्रायल, “ट्रायल अँड एरर” (२०१७-१८)!

कायदा हा अत्यंत सूक्ष्म असतो. कायदा म्हणजे भावनेच्या पल्याड जाणारी वस्तुनिष्ठता आणि अत्यंत धारदार तर्कशास्त्र. परंतु जर एखाद्या न्यायप्रविष्ट केसमध्ये वरपासून खालपर्यंत सगळेच वस्तुनिष्ठतेपासून कोसो दूर आणि तर्कशास्त्र औषधालाही ठाऊक नसलेले असतील तर? या वाक्यानंतर जर तुम्हाला चटकन भारतातल्या काही केसेस आठवल्या, तर ते या उपहासगर्भ मालिकेचे यशच समजा!

जॉश सीगल (निकोलस डि’अगस्तो) हा अमेरिकेतील एका प्रतिष्ठित फर्ममध्ये काम करणारा तरुण, तडफदार वकील. त्याला त्याच्या आयुष्यातील पहिलीवहिली खुनाची केस एकट्याच्या बळावर चालवायची संधी मिळते. वाचायला सारं कसं मस्त वाटतं ना? पण ते तसं नसतं, म्हणूनच तर मालिका बनते! हा तथाकथित खून झालाय ईस्ट पेक या साऊथ कॅरोलिनातील एका छोट्याशा (आणि अर्थातच काल्पनिक!) गावात. या गावचे राहणीमान आणि जगण्याच्या पद्धती न्यूयॉर्कच्या तुलनेत आकाश-पाताळाचा फरक म्हणावा एवढ्या भिन्न आहेत. ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो जॉशचा अशिल लॅरी हेंडरसन (जॉन लिथ्गो) हा स्वतःला अजाणतेपणी दोषी दाखवायला कणभरही कसर सोडत नाहीये. त्याची अत्यंत क्यूट मुलगी समर (क्रिस्टा रॉड्रीग्ज) भलतीच बेभरवशी आहे. जॉशचा मुख्य तपास अधिकारी व भूतपूर्व पोलिस अधिकारी ड्वेन रीड (स्टिव्हन बॉयर) हा अव्वल नंबरचा मूर्ख आणि वेंधळा माणूस आहे. जॉशची मदतनिस अॅन फ्लॅच (शेरी शेफर्ड) हिला जगभरचे, सगळ्या प्रकारचे अत्यंत दुर्मिळ आजार आहेत आणि ती सुद्धा मंदच आहे. स्वतः जॉश सुद्धा त्याच्या अननुभवीपणामुळे मूर्खांतच गणना व्हावी असा आहे, फक्त त्या गावात तो जरासा वासरांत लंगडी गाय आहे, एवढंच. दुसऱ्या पर्वात नवीन केसमध्ये आरोपी म्हणून लॅरी हेंडरसनची जागा गावातील सर्वाधिक प्रतिष्ठित, सर्वांची लाडकी लविनिया पेक-फॉस्टर (क्रिस्टिन चेनोवेथ) घेते.

एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे या गटात न बसणाऱ्यांच्या गटाच्या विरोधात आहे असिस्टंट डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कॅरोल अॅन कीन (जेमा मेज). ही केस जिंकून डिस्ट्रिक्ट अॅटर्नी बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी आहे. वेळप्रसंगी ती तिची परिस्थिती, लिंग, वय, रूप यांच्यापैकी कशाचाही वापर करून व्हिक्टिम कार्ड खेळायलाही मागेपुढे पाहात नाही. तिला जॉशमध्ये भयंकर रस आहे, पण तो रस मान्य करायला एक तर तिचा अहंकार आडवा येतोय आणि दुसरे म्हणजे भावना-बिवनांसारख्या फालतू प्रकारांना ती आपल्या महत्त्वाकांक्षेच्या आड येऊ देऊ इच्छित नाही. थोडक्यात उपरोक्त गटाचा सामना एका अत्यंत धूर्त विरोधकाशी आहे. यातून शेवटी काय होते हे सर्वार्थाने उत्कंठा वाढविणारेच आहे! मी बिंज-वॉचिंगवर अजिबातच विश्वास ठेवत नाही, पण ही मालिका प्रत्येक भाग अशा काही मस्त वळणावर संपवते की, मी अक्षरशः दिवसाला एक सीझन उडवला!

सबंध कथा ही आपल्यासमोर माहितीपटाच्या स्वरूपात, विविध छोटेखानी प्रश्नोत्तरी, ऑफ द रेकॉर्ड विचार आणि ऑन द रेकॉर्ड कृती इ. माध्यमातून उलगडते. “ट्रायल अँड एरर”मध्ये मॉक्युमेंटरी हा प्रकार केवळ गिमिक म्हणून नाही, तर ते त्यांचे खऱ्या अर्थाने बलस्थान आहे. कारण, त्यातून निर्माण होणारा विनोद हा अत्यंत सहज, खळखळून हसवणारा आहे; आजकालच्या स्टँडअप कॉमेडीसारखा वांझोटा व फुसका नाही. दोनच सीझन्स आहेत या मालिकेचे परंतु त्यात इतके ट्विस्ट्स आहेत की जितके कदाचित सबंध “गेम ऑफ थ्रोन्स”मध्येदेखील (२०११-१९) नसतील. विशेषतः दुसऱ्या सीझनमध्ये तर निम्मा सीझन संपल्यानंतर सबंध केसच उलटी फिरते, तेव्हा ही बाब अजूनच जास्त जाणवते. गंमत म्हणजे मालिकेत जागोजागी भरपूर फोरशॅडोईंग आहे. एका सीझनमध्ये तर पहिल्याच भागात गंमती-गंमतीत ते खरा खुनी कोण हे सांगून टाकतात आणि तरीही अखेरच्या भागापर्यंत आपलं तिकडे लक्षही जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतात! कामंही सगळ्यांनी असली भारी केलीयेत की, काय सांगू! जॉन लिथ्गो हा तर आपले नाणे खणखणीत वाजवलेला अभिनेता आहेच, परंतु शेरी शेफर्ड या अभिनेत्रीने अशी काही खतरनाक धमाल केलीये की विचारता सोय नाही. त्या खालोखाल स्टिव्हन बॉयर भन्नाट मजा आणतो.

अशी सगळ्यांच बाजूंनी जमून आलेली भट्टी दोनच सीझनमध्ये थंड पडली कारण, चॅनेलची अवकृपा. एनबीसीने तिसऱ्या सीझनसाठी ऑप्शन रिन्यू केलाच नाही. वॉर्नर ब्रदर्स आता दुसऱ्या वाहिनीकडे प्रयत्न करताहेत असे समजते. ते होईल किंवा होणारही नाही, परंतु दरम्यान हे दोनच सीझन्स मालिकेने ज्या दणक्यात मांडलेयत त्याला तोड नाही. मालिका भारीच आहे, फक्त अजून काही काळ चालू शकली असती तर श्रेष्ठांच्या यादीत समाविष्ट होऊ शकली असती एवढंच. पण विचार करा ना, एक सीझन एक केस आणि त्या एका केसचं माहितीपटाच्या माध्यमातून मांडलेलं प्रहसन व त्यातून निर्माण केलेला सशक्त विनोद, हा प्रकारच भारतीय मालिकांच्या डबक्यासाठी केवढा आवाक्याबाहेरचा वाटतो. आमचे अजून वाहिन्यांवरील सासू-सून, कौटुंबिक वाद, विवाहबाह्य संबंध, हजारो एपिसोड्स ताणलेली पांचट कथा आणि वेबवरील कंटेंटच्या नावाखाली सॉफ्टपॉर्न, राजकीय अजेंडा असे दुहेरी ग्रहणच सुटलेले नाही व नजिकच्या भविष्यात सुटण्याची शक्यताही नाही. परंतु जगात असेही काहीतरी छान होते हा विचार पुन्हा पुन्हा पक्का करणारी, नवी आशा देणारी ‘ट्रायल अँड एरर’ मालिका, तिच्यात थोडेसे मांडणीच्या पातळीवर एरर्स असले तरीही आवर्जून ट्राय करावी अशीच आहे!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *