Category: कथा

  • मेरा रंगदे बसंती चोला…

    मेरा रंगदे बसंती चोला…

    मेरा रंगदे बसंती चोला
    मेरा रंगदे बसंती चोला

    तिघा वीरांना फाशी होणार हे आता नक्की झालं होतं. तीन वीर – भगतसिंह, राजगुरु अन् सुखदेव – भारतमातेच्या उद्धारासाठी जन्माला आलेली त्रिमूर्तीच जणू! अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती.
    जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय!” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला! हे धैर्य!!
    इकडे सबंध देश या तिघांसाठी आक्रंदत होता. आझादही अस्वस्थ होते. काय करावं? बाबाराव सावरकर तर सारे मतभेद विसरुन, मानापमान दृष्टीआड करून गांधींच्या भेटीसाठी वर्ध्यासही जाऊन आले. त्यांना विनंती केली, “बापू, लॉर्ड आयर्विनशी तुम्ही करत असलेल्या करारात क्रांतिकारकांच्या सुटकेचेही एक विधेय टाका”.
    “तसे केल्यास मी माझ्या अहिंसेच्या मार्गापासून ढळून हीन नाही का ठरणार”? गांधी उत्तरले.
    “असं कसं म्हणता बापू?”, सावरकरांचा प्रतिप्रश्न, “आणि जर तुम्ही हीन ठरणारच असाल, तर स्वामी श्रद्धानंदांचा खूनी असलेल्या अब्दुल रशीद या हिंसकासाठी रदबदली करून तुम्ही एकदा हीन ठरलाच आहात, तर मग यावेळी देशासाठी हीन ठरायला काय हरकत आहे?” यावर गांधींनी मौन बाळगले! त्या काळात गांधींच्या लॉर्ड आयर्विनशी तब्बल ८ भेटी झाल्या पण तिघा बाळांच्या सुटकेचा विषय काढून मौन सोडणे काही त्या महात्म्याच्या तत्त्वात बसले नाही.
    होता होता फाशीचा दिवस उजाडला. २३ मार्च! संध्याकाळी ७ ची अडनिडी वेळ ठरवण्यात आली होती. फाशी शक्यतो सकाळी होत असते, परंतू हे कृष्णकृत्य सकाळच्या मंगलप्रहरी करायचं धाडस सैतानी इंग्रज सरकारलाही झालं नसावं! सर्वत्र आणि सर्वांवरच एकप्रकारचा तणाव होता, तीन नायक सोडून. त्या तिघांचे हास्यविनोद चालू होते. अखेरच्या आंघोळीसाठी पाणी दिले तर त्यावेळीही तिघे मजेत गात होते, “मेरा रंगदे बसंती चोला… आई मला भगवी वस्त्रे परिधान करू दे..” अन्य बंद्यांच्या अंगावर सरसरून काटा आला नसता तरच नवल!
    त्रिदेवांना फाशीच्या तख्ताकडे चालवले. जातानाही तिघे मोठमोठ्याने घोषणा देत होते, “भारतमाता की जय!”, “लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन!” गुणगुणत होते,
    “मरके भी न निकलेगी दिलसे वतन की उल्फत ।
    मेरी मिट्टीसे भी खुशबु-ए-वतन आएगी ।।
    तिघांना फाशीघरात आणण्यात आले. तेथे एक काळा जल्लाद आणि गोरा मॅजिस्ट्रेट असे दोघे उपस्थित होते. त्यातही भगतसिंहांना लहर आली, ते त्या मॅजिस्ट्रेटला म्हणाले, “मॅजिस्ट्रेटसाहेब, तुम्ही मोठे भाग्यवान बरं का! आजवर तुम्ही अनेकांना फाशी जाताना पाहिले असेल, परंतू भारतमातेचे पुत्र तिच्यासाठी कसे हसत-हसत फाशी जातात, हे आज तुम्ही पहिल्यांदाच अनुभवाल! हा अनुपम सोहळा पाहणे सर्वांच्याच नशिबी नसते बरं!” तो मॅजिस्ट्रेट बिचारा काय बोलणार यावर?
    वेळ झाली. तिघांनी अभिमानभरल्या नजरांनी एकमेकांना अखेरचे पाहून घेतले. “वंदे मातरम्”चा जयघोष झाला. तिघांनाही फाशीच्या दोरांची चुंबने घेतली. चेहर्‍यावर मुखवटे चढले. जल्लादाने खटका ओढला. शरीरे थरथरली. यथावकाश खेळ संपला. तिघांपैकी कुणाच्याही माता-पित्यांस अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही इंग्रजांनी. तीन शरीरे संपली, तीन प्राण गेले. पण तीन आत्मे मात्र अमर झाले, कोट्यवधी भारतीयांच्या ह्रदयात…
    – © विक्रम श्रीराम एडके.

     

  • भिक

       मी शक्यतो रेल्वेनेच प्रवास करतो. याचं कारण म्हणजे एकतर हा प्रवास थोडा मोठा होत असल्याने यात एकप्रकारचा निवांतपणा असतो. त्यामुळे प्रवास माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने असेल तर मला शांत मनाने मी मांडणार असलेल्या मुद्द्यांवर विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. नवीन लोकांशी ओळखी होतात, नवनवे अनुभव येतात. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे, मोठ्या प्रवासात मला माझ्या आवडीचे संगीत भरपूर वेळ ऐकता येते.
       असाच एक नगर-पुणे रेल्वेप्रवास. मी माझ्या आवडीची “युवराज” चित्रपटातील गाणी ऐकत होतो. दौंडच्या आसपास काही हिजडे गाडीत शिरले. ओंगळ लाडिकपणा करत ते प्रत्येकाकडून पैसे मागत होते. १० रुपयांच्या खाली एक पैही घेत तर नव्हतेच, पण कमी पैसे देणार्याला अथवा द्यावयास टाळाटाळ करणार्याला गलिच्च शिव्या घालत होते, नको तिथे स्पर्श करून त्रास देत होते. मला हा प्रकार काही नवा नव्हता, त्यामुळे त्यांच्याशी घासाघीस करण्यात काहीच अर्थ नाही हेही ठाऊक होते! कटकट नको म्हणून मी इतरांप्रमाणेच पैसे दिले, ती “मंडळी” निघून गेली, मीही पुन्हा गाणी ऐकू लागलो.
       अचानक हेडफोन्सच्या आवाजावर ताण करणारा एक बायकी आवाज ऐकू येऊ लागला, “परदेसी परदेसी जाना नहीं...”
       पाहतो तो एक भिकारी स्त्री कडेवर एवढूस्से पोर घेऊन गाणे गात होती. तिच्याकडे लक्ष देण्याची कोणत्याही प्रकारे सक्ती नसल्याने, किंबहुना त्या बाईचे कोणतेही म्हणावे असे उपद्रवमूल्य नसल्याने जो तो आपापल्या कामात गढलेला होता.
       मघाशी ते हिजडेही भिकच मागत होते आणि आता ही बाईदेखील भिकच मागतेय. पण “ते” भिक जणू त्यांचा अधिकारच असल्याप्रमाणे सक्तीने वसूल करत होते. त्यांना पैसे देणं प्रत्येकालाच भाग होतं. पण या बाईला कुणी पैसे द्यायचे नाकारले तरीही ती कुणाचंच काही वाकडं करू शकणार नव्हती, हे प्रत्येक जण जाणून होता. आणि म्हणूनच कुणी तिच्याकडे साधं लक्ष द्यायलाही तयार नव्हतं. माझ्या मोबाईलवर गाणी चालूच होती, पण आता मी हेडफोन काढून ठेवल्यामुळे गाडीच्या धडधडाटात त्यांचा आवाज अतिशय मंद, दुरून कुठूनतरी येत असल्यासारखा ऐकू येत होता.
       बरं ती काय नुसतीच भिक मागत होती का, तर अजिबात नाही. त्याबदल्यात ती गाणी गात होती. फार सुरात नसेलही ती, पण एखादी गोष्ट फुकटात किंवा तोंड वेंगाडून न घेण्याचा स्वाभिमान तिच्यात निश्चितच दिसत होता. या विचाराने मला अस्वस्थ करून सोडले. मी खिशात हात घालून एक ५ रुपयांचं नाणं तिला देऊ केलं, तर या बाईने मला हातानेच गाणे संपेपर्यंत थांबण्याचा इशारा केला. म्हणजे तिला खरोखरच बदल्यात काहीतरी देऊ केल्याशिवाय एक पैसाही नको होता. मी थांबलो. गाणे संपल्यावर तिने एकेकापुढे पदर पसरायला सुरुवात केली. कुणी ५ कुणी १० रुपये, कुणी आणखी जमेल तितके पैसे देत होते. मीही पैसे दिले.
    खरी गम्मत तर पुढेच झाली, एका सरदारजींनी १०० ची नोट पुढे केली आणि म्हणाले, सुटे पैसे नाहीत. तिने ते पैसे घेतले, आणि पुढच्या बोगीत गेली. सुमारे १५ मिनिटानंतर ती पुन्हा आमच्या बोगीत आली आणि तिने त्या सरदारजींना ५-१० नोटा आणि नाण्यांच्या स्वरूपात ९० रुपये परत केले! बोगीतील आम्ही सारेच अवाक झालो. सरदारजीही “मला वाटलं नव्हतं तू परत येशील. सगळे पैसे ठेवले असतेस तरी चाललं असतं”, असं काहीतरी म्हणाले.
       यावर ती शांतपणे म्हणाली, “साहेब मला माहितीय माझी लायकी काय आहे. उगाच जास्त पैसे घेऊन मी काय करू..”?
       भिक मागणे या प्रकाराचं कुठल्याही प्रकारे उदात्तीकरण करायचा माझा अजिबात प्रयत्न नाही. पण त्याच दिवशी नगरच्या स्थानकावर एक खुरडत-खुरडत रांगणारा भिकारी दिसला होता. कुणालाही सहजच दया यावी अशी त्या म्हातार्याची अवस्था होती. लोक कणव येऊन त्याला पैसेही देत होते. पण पाचच मिनिटांनी तो भिकारी मला जेव्हा व्यवस्थित चालत पाण्याच्या नळावर पाणी पिताना दिसला, तेव्हा मला हसू आवरले नाही! त्यानंतर गाडीतील तो हिजड्यांचा उच्छाद! या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या बाईचे एकूणच वागणे मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले. गाडी पुढे जातच होती, आणि माझ्या मोबाईलमध्ये श्रीनिवास आपल्या मखमली आवाजात गात होता,
    “जिन्दगी जिन्दगी, क्या कमी रह गयी…
    आंख की कोर में, क्यू नमी रह गयी…
    जिन्दगी जिन्दगी…”

    गाडी पुढे जातच होती, जातच होती…

    © विक्रम श्रीराम एडके.
    (edkevikram@gmail.com)