Category: Hindutva

  • दोन भेटी

    बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात.

    घडले असे की, महाराणा जगतसिंहांनी (दुसरा) पेशव्यांचे ५ सहस्र रुपये नजराणा, मानाची वस्त्रे, घोडे आणि एक हत्ती देऊन यथोचित स्वागत केले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजदरबारात सन्मानपूर्वक बोलावण्यात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराणा सामोरे आले. दरबारात दोन आसने ठेवली होती. एक बाजीरावांसाठी आणि दुसरे साक्षात महाराणांसाठी. बाजीराव पुढे चालत गेले आणि आसनावर न बसता खाली जमिनीवर बसले. एवढेच नव्हे, तर तेथीलच एक चामर घेऊन ते महाराणांना वारासुद्धा घालू लागले. महाराणा अर्थातच भांबावून गेले. ते म्हणाले (Sardesai. E. Jaiwant Paul), “तुम्ही ब्राह्मण आहात, मी तुमची सेवा करायला हवी”. त्यावर बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले की, “मी इथे फक्त तुम्हालाच राजा मानतो कारण तुमच्या पदरी १६ उमराव आहेत”!

    काही दिवसांनी बाजीरावांनी जयपूरला प्रस्थान केले. तिथे त्यांची सवाई जयसिंहांशी भेट झाली. या ही भेटीबद्दल “वंशभास्कर”च्याच हवाल्याने कुलकर्णी (Pp 208, 209) लिहितात. सवाई जयसिंहांनी जगतसिंहांच्या इतकाच सन्मान बाजीरावांनी मलाही द्यावा अशी मागणी केली. बाजीरावांनी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, “(स्वैर अनुवाद)उदयपूरच्या महाराण्यांनी कधीच मुघलांची सत्ता मानली नाही, त्या संदर्भाने मी त्यांना आमच्या छत्रपतींसारखेच मानतो. तुम्ही लोक मात्र यवनांच्या चाकरीतच धन्यता मानत आलात. त्यामुळे तुम्ही खरे तर मला कनिष्ठ. पण तरीही मी तुम्हाला बरोबरीचा दर्जा देतोय (गुह्यर्थ – मी त्यांच्याकडे बसलो तसा तुमच्याकडेही खाली बसेन अशी स्वप्नं पाहू नका!). आपण बरोबरीच्या आसनांवर बसू. मी उजवीकडे बसेन आणि तुम्ही डावीकडे बसा”! या भेटीत बाजीरावांनी हुक्क्याची मागणी केली आणि सवाई जयसिंहांना त्रास होत असूनही मुद्दामच त्यांच्या तोंडावर (Paul. Pp 146) धूर सोडत राहिले (Kulkarni. Pp 209. with reference from Vansh Bhaskar)! अशी वागणुक देण्यामागे सवाई जयसिंहांच्या पूर्वजांनी स्वराज्याला दिलेल्या त्रासाची आठवण बाजीरावांना असल्यास नवल नाही!

    गंमत अशी की, बाजीरावांनी एकीकडे महाराणा जगतसिंहांना सन्मान दिला आणि दुसरीकडे सवाई जयसिंहांना त्यांची जागा दाखवून दिली, यात बाजीरावांचे चातुर्य आणि माणसांना जोखण्याचा स्वभाव तर दिसतोच. परंतु बाजीरावांचे खरे कर्तृत्व यात दिसते की, बाजीरावांनी जशी सवाई जयसिंहांकडून चौथाई व इतर रक्कम वसूल केली (Palsokar. Pp 183) तशीच जगतसिंहांकडूनही रक्कम वसूल केली (तत्रोक्त)! किंबहूना दिल्ली दरबाराकडून इतर मागण्याही मान्य करून घेतल्या. थोडक्यात, भावनिकता आपल्या जागी आणि राजकारण आपल्या जागी! अर्थातच बाजीरावांच्या सगळ्याच मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. त्याचीच परिणती पुढे दिल्लीवर धडक देण्यात (मार्च १७३७) आणि नंतर भोपाळमध्ये निज़ामाला मार देण्यात (डिसेंबर १७३७) झाली. कुलकर्णी (Pp 202) सरदेसाईंच्या हवाल्याने (Marathi Riyasat. Vol. 3. Pp 215) शाहूंचे एक वाक्य देतात त्यातच बाजीरावांचे महत्त्व आणि स्थान कळून येते. शाहू म्हणतात, “मला १ लाख सैन्य आणि बाजीराव यांच्यातून एक निवडायला सांगितले, तर मी बाजीरावांनाच निवडेन”!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (बाजीरावांचे चरित्र व युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते. अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • आत्मार्पण

    या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी त्यानंतरही आवाक्यात असलेले सारे काही करून झाले आहे, तेव्हा त्यांनी या धरेला देहाचा भार न ठेवता तो सोडण्याचा निर्णय घेतला. केवढी पराकोटीची नि:स्वार्थता ही?

    आपल्या ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ लेखात (जुलै १९६४) सावरकर लिहितात –
    “अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणीवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून अत्यंत अतृप्त अशा मन:स्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारण: आत्महत्या असे म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू संपूर्णपणे सफल झाला आहे अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास आत्मार्पण असे म्हणतात. यद्यपि या परिवर्तनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादवायचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपणहून आपले प्राण विसर्जित करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करून टाकतात. योगवासिष्ठात म्हटल्याप्रमाणे –
    अन्तर्रिक्तो बहिर्रिक्तो रिक्त कुम्भरिवाम्बरे ।
    अन्त:पूर्णो बहि:पूर्णो पूर्ण कुम्भरिवार्णवे ।।
    तथापि आपल्या या जीवनकार्याची सापेक्षत: परिपूर्णता झालेली आहे, अशी आत्मसंतुष्टता वाटल्यानंतर समाजाला किंवा स्वतःला जो देह वार्धक्याने म्हणा, व्याधीने म्हणा पण केवळ भारभूत असाच राहाणार आहे, त्या देहाचा गुहाप्रवेशाने, प्रायोपवेशनाने, अग्निदिव्याने, समुद्रसमाधी किंवा अंतिम योगसमाधी घेऊन किंवा अशाच कोणत्यातरी मार्गाने जे त्याग करतात, ते त्यांचे कृत्य उत्तान अर्थी बळाने जीव देणेच असताही त्याला आत्मसमर्पण म्हणून जे गौरविले जाते, ते यथार्थच आहे”.

    हे केवढेतरी सखोल चिंतन आहे सावरकरांचे. आपल्या देहाचा आता समाजाला, देशाला अथवा कुणालाच उपयोग नाही म्हणून तो देहच सोडून देणे ही एकाचवेळी स्वार्थत्याग आणि उपयोगितावाद अशा वरकरणी विरोधी वाटणाऱ्या दोन्ही गुणांची परिसीमा आहे. सावरकरांसाठी आपण काय केलं, हा विचार आत्ता कुठे आपण करू लागलो आहोत. सावरकरांच्या मनाला हा विचार दूरान्वयानेदेखील शिवलेला नव्हता. किंबहूना आजवरच्या योगदानाच्या बदल्यात काही मागायचे तर नाहीच, उलट आहे ते सारेच देऊन टाकायचे ही त्यांची सर्वोच्चातीलही सर्वोच्चतम भावना आहे. म्हणूनच सकल सुखांचा परित्याग करून हा प्रवाहाविरुद्धचा योगी फाल्गुन शुक्ल षष्ठी, शके १८८७ अर्थात २६ फेब्रुवारी १९६६ या दिनी प्रायोपवेशनाद्वारे अनंतब्रह्माच्या प्रवासास निघून गेला. जणू परमेश्वराने मानवजातीवर कृपावंत होऊन आपल्या तेजाचा एक अंश आमच्यात धाडला होता, तो लक्षावधी आयुष्यांना तेजस्वी स्पर्श करून पुन्हा एकवार अनंतात विलीन झाला. आणि त्याने स्पर्शलेली आयुष्येच नव्हे तर पिढ्यानपिढ्या उजळून निघाल्या, कायमच्या साठी!!

    — विक्रम श्रीराम एडके
    (लेखक सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com)

  • सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन

    सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा रत्नागिरीपर्व. चौथा सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत. आणि पाचवा स्वातंत्र्यापासून ते आत्मार्पणापर्यंत. ह्या कालखंडांपैकी रत्नागिरीपर्वात सावरकरांनी अतुल्य समाजकार्य केलेले दिसते. इतके की, डॉ. आंबेडकरांच्या “जनता”ने (एप्रिल, १९३३; संदर्भ: सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०८) सावरकरांच्या कार्याची तुलना थेट भगवान बुद्धांशी केली आहे. परंतु सावरकरांवर जे अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात प्रमुख आक्षेप हादेखील असतो की, सावरकरांनी रत्नागिरीतून सुटल्यानंतर अथवा रत्नागिरीत स्थलबद्ध होण्याआधी कोणतेही सामाजिक कार्य केलेच नाही. सदर आक्षेपाला सावरकरद्वेषाचे, जातीद्वेषाचे आणि राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. आपण त्यामध्ये न पडता केवळ ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे याचा वस्तुनिष्ठपणे विचार करु.

    सावरकरांना शिक्षा झाली ती वयाच्या २७व्या वर्षी! अवघ्या पंचविशीतल्या पोराने का बरं काही समाजकार्य केले नाही, असा प्रश्न जर कुणाला पडणार असेल तर ते हास्यास्पद व म्हणूनच उत्तर देण्याच्याही योग्यतेचे नाही. याकाळातच सावरकरांनी केलेले क्रांतिकार्य भल्याभल्यांना जन्मभर अभ्यासावयाला पुरेल एवढे मोठे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक सूक्ष्म पदर असलेले आहे. किंबहूना त्याच क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून ब्रिटीशांनी सावरकरांना फाशीहूनही कठोर अशी काळेपाण्याची शिक्षा सुनावली (१९१०). परंतु त्याही काळात सावरकरांचे विचार काय होते ते मुख्यतः त्यांच्या काव्यातून समजतात. वास्तविक अभिजन वर्गात जन्माला आलेला हा मुलगा. त्यांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न अजिबातच दिसला नसता, तरीदेखील तत्कालीन परिस्थितीला धरुनच असले असते ते. परंतु त्याही काळात सावरकर स्वदेश, स्वदेशी, स्वधर्म, स्वातंत्र्य इ. बाबत जागृत असल्याचे त्यांच्या लेखनातून पदोपदी दिसते. आपल्या “बालविधवा दु:स्थितीकथन” (१९०२) कवितेत अवघ्या १९ वर्षांचे सावरकर लिहितात —
    “ज्यांच्या गृहिणी जाती कालांतराने ते गृहस्थ होतात ।
    कन्यापुत्रही लाभती द्यायाला धीरही स्वस्थ हो तात ।।
    वृद्धाचा सुत गेला स्वांकी तो दत्तकासि घेईल ।
    स्वपिता मरता तद्विण सुत संसारी समर्थ होईल ।।
    सर्वांसि उपाय असे शास्त्राने वा सुरुढिने विहित ।
    परि न दया ये उभयान्वयी विधवांचे साधण्यास तेवि हित ।।
    शास्त्रे उपेक्षिल्या त्या छळिल्या रुढिने तयांत शतपट हो ।
    अबलांना विधवांना अजुनि तरी तारण्यास खटपट हो ।।
    आताहि जरी उपेक्षा दु:स्थितीतुनि त्यांसि उद्धारायाते ।
    तरि हा पातकपर्वत शक्त न होईल धरू धरा याते ।।
    वैदिक हो, भिक्षुक हो, उद्धारक हो, अहो सुधारक हो ।
    सदय मनाने कोणी अबलांना संकटात तारक हो ।।
    अवलोकिता न पतिचे वदनही वैधव्य मात्र अवलोकी ।
    क तत्पुनर्विवाहा प्राप्त असो संमती न तव लोकी? ।।”
    हा सावरकरांचा खडा सवाल आहे. सावरकर ह्यावर उपायही सांगतात —
    “सत्वर कडाड मोडा हानिद ह्या रुढिचा महा खोडा ।
    तोडा दु:स्थितीबेडी अबला तारोनि धवलयश जोडा ।।”

    किंबहुना सावरकरांच्या आयुष्याचा उद्देशच मुळी भारतभूमीचा सर्वंकष उद्धार करण्यासाठी शक्य होईल ते सारे काही करणे, हाच होता. हे जसे सावरकरांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी घेतलेल्या प्रतिज्ञेत दिसते. तसाच त्याचा पुनरुच्चार “सागरास”मध्येही (१९०९) आढळतो. सावरकर लिहितात —
    “जगदनुभवयोगे बनुनि मी, तव अधिकशक्त उद्धरणी मी”!

    परंतु हिंदु धर्मातील जातीव्यवस्था व त्यायोगे राष्ट्राची होत असलेली हानी यांचे दाहक वास्तव सावरकरांना सर्वाधिक जाणवले ते अंदमानात. संख्येने मुठभर असूनही मुसलमान वॉर्डर हिंदू कैद्यांवर कसे काय अत्याचार करु शकतात, याचे उत्तर त्यांना सापडले ते हिंदू पाळत असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेच्या घातक रुढीमध्ये! याविषयावर सावरकरांनी अंदमानात शक्य तेवढे कार्य केले. यातूनच जन्म झाला तो हिंदुसंघटनाचा. परंतु हिंदूंनी हिंदू म्हणून जगात एकत्र यायचे असेल तर जन्मजात जातीभेदाच्या बेड्या तोडल्या पाहिजेत, हे उघड होते. रत्नागिरीतील स्थलबद्धतेचा याकामी सावरकरांनी पुरेपूर वापर केला व जातीभेदावर सुसूत्रपणे हल्ला चढवला. एकप्रकारे स्थलबद्धता इष्टापत्तीच ठरली सावरकरांसाठी. जे कार्य डॉ. आंबेडकर विवर्ण स्तरातून करत होते तेच सावरकरांनी समाजाच्या सवर्ण स्तरातून केले. दोघांचेही कार्य परस्परपूरक होते. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता व तो त्यांनी वेळोवेळी व्यक्तदेखील केलेला दिसतो. रत्नागिरीतील कीर-मंदिर अखिल हिंदूंना खुले करण्यात येणार होते. ह्या मंदिराचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांच्या हस्ते व्हावे अशी सावरकरांची प्रामाणिक इच्छा होती. परंतु आधीच ठरलेल्या वेळापत्रकामुळे डॉ. आंबेडकरांना ते शक्य झाले नाही. याप्रसंगी त्यांनी सावरकरांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आंबेडकर व सावरकर दोघांचेही चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यांनी (सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०२) केला आहे —
    “सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे. जर अस्पृश्यवर्ग हिंदुसमाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल, तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही; चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे, त्यांपैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो”.
    दोघांच्याही अश्या परस्परपूरकतेमुळेच दोघांचाही उल्लेख कीरांनी “समाजक्रांतिकारक” असा केला असल्याचा संदर्भ शेषराव मोरेदेखील (सावरकरांच्या समाजक्रांतिचे अंतरंग, संक्षिप्त आ. २०१५, पृ. १) देतात.

    सावरकरांनी जर आपले कार्य सामाजिक क्रांतिपुरतेच मर्यादित ठेवले असते, तर अवघ्या ५ वर्षांच्या आतच त्यांनी सबंध हिंदुस्थानातून अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करुन दाखवले असते. हे मत आहे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे (कीर, २०८) यांचे! मग आता प्रश्न असा उभा राहातो की, सावरकरांनी बिनशर्त सुटकेनंतर हे कार्य का थांबवले? वरवर पाहाता सावरकरांनी खरोखरच कार्य थांबविल्याचे दिसते. याची कारणे २! एक म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणाचा व्याप अंगावर घेण्याची आवश्यकता. आणि दुसरे म्हणजे पाकिस्तानच्या रुपाने भारताचे तुकडे पडण्याची येऊन ठेपलेली वेळ. ह्या दोन्हीही गोष्टी तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने केव्हाही अधिक निकडीच्या होत्या. परंतु याचा अर्थ सावरकरांची समाजकार्याबाबतची आस्था संपली होती असे नव्हे. सावरकरांसाठी समाजकार्य हेच हिंदुसंघटन होते व हिंदुसंघटन हेच समाजकार्य होते. यामागचे साधेसोपे तर्कशास्त्र असे की, अस्पृश्यता नष्ट झाली तरच हिंदु संघटीत होऊ शकतील ना! त्यामुळे सावरकरांसाठी हिंदुसंघटनाचा अर्थ अस्पृश्यतानिर्मूलन हादेखील होताच. किंबहूना याच अर्थाने त्यांनी हिंदुमहासभेच्या ध्येयश्लोकात “अभ्युत्थानाय हिंदुनाम्” हे शब्द समाविष्ट करुन घेतले होते. “राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ही राष्ट्राच्या गाड्याची दोन चाके आहेत. यांतील कोणतीही सुधारणा मागे ठेवणे योग्य नाही. या दोन चाकांवर भारत देश पुढे न्यायचा आहे. कोणतेही चाक मागे राहून चालणार नाही” (समाजसुधारक सावरकर, केळकर, आ. १९८६, पृ. १२५). तसेच १९४३ मध्ये “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर तीन दिवससुद्धा टिकणार नाही” (स्वा. सावरकर – अखंड हिंदुस्थान पर्व, बाळाराव सावरकर, आ. १९७६, पृ. २०२) ही सावरकरांची ह्याविषयावरील मते आहेत.

    एवढेच नव्हे, तर १९४७ साली ‘हरिजन सेवक संघा’चे श्री. वि. न. बर्वे यांना पाठवलेल्या पत्रात सावरकरांनी प्रकृती ठिक झाली की अस्पृश्यतेच्या घातक रुढीवर आणखी एक अखिलभारतीय चढाई करण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे (तत्रोक्त, पृ. ३६९). दुर्दैवाने त्यानंतर वर्षभरातच गांधीहत्या झाली व स्वकीय सरकारच्या कारभारातही नाहक खटल्यात गोवले गेलेले सावरकर नवीन कार्य करण्याची उभारी कधीच धरु शकले नाहीत. अर्थातच वयाच्या १५व्या वर्षापासून जो देह सतत देशकार्यासाठी झिजला, त्यापायी नानाप्रकारचे त्रास व अपमान भोगले, त्याच्याकडून पुन्हा वार्धक्यातही नव्याने कार्य करण्याची अपेक्षा करणे हेच मुळी स्वार्थीपणाचे आहे. परंतु त्याही परिस्थितीत सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात हिंदुसंघटनासाठी तरतूद केल्याचे दिसून येते. यावरुनच सावरकरांना सामाजिक कार्याबाबत वाटत असलेली कळकळ लक्षात घ्यावी. सावरकरांचे मूल्यमापन द्वेषपूर्ण अथवा विरोधी भूमिकेतून न करता वस्तुनिष्ठपणे केल्यास, आजही भयाण असलेल्या सामाजिक वास्तवात सावरकरांचे कार्य व त्यासाठी त्यांनी वापरलेले अभिनव मार्ग दीपस्तंभ बनून मार्गदर्शन करताना दिसतील!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि सावरकरांवर व्याख्याने देणारे वक्ते. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com]

    image

  • हिंदू चैतन्याचे अवतार!!

    बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते? बाजीरावांना जाणीव होती की, सध्याचा काळ हा धर्म-धर्म करीत बसण्याचा नाही, तर त्या धर्माचं रक्षण करण्याचा आहे. खाणे-पिणे हे गौण आहे. ज्याला सबंध समाजाला आपलंसं करायचं असतं, त्याला आपल्या घरातल्या परंपरा बाहेरही लादण्याचा अट्टाहास करुन चालत नसतं. सतत फिरतीवर असणाऱ्याने, मुलुखगिरी-शिपाईगिरी करणाऱ्याने तर खाण्याचे चोचले करुच नयेत. तिथे सोवळेपणाची अपेक्षाही मूर्खपणाची आहे. जे मिळेल ते आणि जसे मिळेल तसे खाण्याची तयारी हवी, तरच मोहीमा साधतात.

    बाजीराव असेच होते. त्यांचे सैनिकच नव्हे तर ते स्वतःसुद्धा कधीच मोहीमांवर शिदोरी नेत नसत. काय करायचेय निष्कारण ओझे? भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी! सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार? हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता? रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा! त्यामुळेच सैन्याला ते जास्त आपल्यातले वाटायचे.

    स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), “..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये”! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही”! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.

    दुर्दैव असे की, बाजीरावांचे हे वेगळेपण, देशकालपरिस्थितीनुरुप आवश्यक असलेली वागणूक, सामाजिक स्तरावर किती जरी क्रांतिकारक असली, तरी वैयक्तिक स्तरावर त्यांना कधीच समजून घेतले गेले नाही. मित्र, सैन्य आणि मालक कायमच बाजीरावांच्या बाजूने असताना त्यांना तत्कालीन इतरांची फारशी साथ लाभल्याचे दिसून येत नाही. राऊंच्या अकाली जाण्यामागे हेदेखील कारण आहे, असे वाटते. नासिरजंगला हरवून पुण्यासही न परतता खरगोण प्रांतातील जहागिरीची व्यवस्था पाहायला बाजीराव निघाले होते. जाताना त्यांनी “मस्तानीस तिकडे पाठवून द्या” असेही चिमाजींना सांगितले होते. चिमाजींनी ते मान्य केले. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३३), “पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्य वारावे, त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे”. परंतु प्रत्यक्षात मात्र मस्तानीस न पाठवता काशीबाईंनाच रावेरखेडी पाठवण्यात आले. किचन-पॉलिटिक्सचे धागे हे असे गुंतागुंतीचे होते! काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले! इतरांचे माहिती नाही, परंतु स्वतः बाजीरावांच्या मनात अखेरपर्यंत कुणाबद्दलच किंतु नव्हता. २३ मार्च १७४० यादिवशी ते बुऱ्हाणपुराहून मातोश्री राधाबाईंना त्याच अप्पांबद्दलच्या काळजीपोटी लिहितात (रियासत, पृ. ३९५), “आपांस उष्णकाळामध्ये बाहेर जाऊ न द्यावे”.

    समकालीनांनी व उत्तरकालीनांनी बाजीरावांबद्दल काही का गैरसमज करुन घेतलेले असेनात, सर जदुनाथ सरकार मात्र दिघेंच्या “Peshwa Bajirao I & Maratha Expansion” च्या प्रस्तावनेत म्हणतात, “Bajirao was a heaven born cavalry leader. In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao was unequalled for the daring and originality of his genius and the volume and value of his achievements”! परंतु मला सर्वाधिक भावते ते इंग्रज इतिहासकार सर रिचर्ड कार्नॅक टेंपल यांचे मत. आपल्या “Shivaji & The Rise of Marathas” ग्रंथात ते बाजीरावांबद्दल लिहितात, “He died as he lived, in camp under canvas among his men, and he is remembered to this day among the Marathas as the fighting Peshwa and the incarnation of Hindu energy”! Incarnation of Hindu Energy, अर्थातच “हिंदुंच्या चैतन्याचा अवतार”! केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण!! खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते!! त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद!! खरोखर तो एक झंझावातच होता. आमच्या फाटक्या झोळीत कधीच न मावणारा झंझावात. म्हणूनच आम्ही त्याला कधीच गवसणी घालू शकलो नाही. तो आला, कर्तव्य केले आणि वै. शु. १३, अर्थात २८ एप्रिल १७४० यादिवशी निजधामी निघूनसुद्धा गेला, आज नाही तर काहीशे वर्षांनी तरी आपले कर्तृत्व ह्या निद्रिस्त हिंदुसमाजास समजेल, ह्या खात्रीने!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    *लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
    (लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

    image

  • सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

    नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे श्वास सोडायचा, ह्या द्राविडी प्राणायामाची निराळीच गंमत असते!!

    मुंबई ते चेन्नई प्रवासात फारच त्रास झाला मला. कारण असं काही होईल याची कल्पना होती, पण इतकं होईल असं कुणाला वाटतंय!! त्यातून हवाईसुंदरीला मी फारसा आवडलो नसावा, कारण तीनतीनदा बोलावल्यावर तिने शेवटी कापसाचे बोळे आणून दिले. तशी ती पण नुसती “हवाई”च होती मेली, “सुंदरी” तर औषधालाही नव्हती! शेवटी व्हायचा तो त्रास झालाच. पण तिथून पुढे चेन्नई ते पोर्टब्लेअर प्रवासाच्या वेळी मात्र मी मानसिक तयारी करुन ठेवली होती. त्याप्रवासात काही मला खिडकीजवळची जागा नव्हती मिळालेली. उजव्या रांगेतली पहिली जागा. दोन तमिळ ख्रिश्चन कुटूंबे बिचारी माझ्यामुळे निम्मी इकडं आणि निम्मी तिकडं झालेली. नवरे, बायका आणि चिल्लीपिल्ली! “तमिळ” म्हटलं की मुळातच माझे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. का कोण जाणे पण मला मी मागच्या जन्मीचा तमिळ वाटतो, इतकी ओढ वाटते मला त्या भाषा आणि संस्कृतीबद्दल. त्यामुळे मी त्या अण्णा-अम्मांशी मोडक्यातोडक्या तमिळमध्ये गप्पा सुरु केल्या!

    त्यांच्यातले एक अण्णा कोटक बँकेत कामाला होते. मग देशाची सध्याची अवस्था, मोदी-बिदी असले “लडकोंवाले” विषय बोलून झाल्यावर गाडी हळूच “अंदमानला कश्यासाठी?” ह्या प्रश्नाकडे वळली. ती कुटूंबं सप्ताहान्त साजरा करायला सहज म्हणून चालली होती. मला विचारलं तर मी सांगितलं की, “महाराष्ट्रातून आम्ही काही लोक चाललोय अंदमानला. सावरकरांसाठी! आम्ही नुसते फिरणारच नाही आहोत तर मी व्याख्याने देणार आहे तिथे सावरकरांवर. त्यासाठी वक्ता म्हणून चाललोय”, वगैरे वगैरे. यावर साहजिकपणे त्यांनी विचारलं की, “कोण सावरकर बुवा”? बास!! नाहीतरी महाविद्यालयीन काळात एका बिग्रेडी प्राध्यापकाला नडलो होतो त्यावेळी त्यांनी हताश आवाजात म्हटलेच होते, “तू जिथं-तिथं सावरकर घुसडतोस सतत”! इथे तर सरळ समोरुन प्रश्न आला होता, “कोण सावरकर”? माझ्या डोक्यात उलटी गणती सुरु झाली, “३.. २.. १.. सुरु”!! मी तासभर त्या चार-पाच जणांना इंग्लिश आणि तमिळमध्ये सावरकर समजावून सांगत होतो. त्यांची साहजिक प्रतिक्रिया होती, “देशासाठी आयुष्यभर एवढा त्रास भोगलेला हा माणूस आम्हाला माहितीच नव्हता”! त्यांच्यापैकी एकाने विचारले की, “सावरकर प्रत्यक्षात किती थोर होते”? तेवढ्यात घोषणा झाली, “कृपया कुर्सीकी पेटियाँ बाँध ले, हम कुछही मिनटोंमें पोर्टब्लेअरके वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपे उतरनेवाले है..”! मी म्हणालो, “अंदमानमधल्या एकमेव विमानतळाला एका मराठी माणसाचं नाव द्यावं लागलं, इतके थोर होते सावरकर”! यावर आम्ही सगळेच हसायला लागलो. बोलण्याच्या भाषा लाखों असतील जगात, पण हास्याची भाषा एकच असते!!

    हा काही अंदमानप्रवासातला असा एकमेव अनुभव नाही. तिकडे आमचा समन्वयक होता एक. विकास नाव त्याचं. वडील पंजाबी, आई तेलुगू, वाढला बंगाली बहुसंख्य असलेल्या अंदमानमध्ये. त्यामुळे ह्या तिन्ही भाषा तर तो अस्खलित बोलतोच. शिवाय अंदमानात राहून राहून तमिळ आणि हिंदीतसुद्धा पारंगत झालेला. इंग्रजीही अतिशय उत्तम. बाकीचे आमच्या ठरलेल्या गाड्यांमधून फिरायचे. मी म्हणालो, “मला नाही असं फिरायचं”! तर मला त्याच्या बाईकवरुन सबंध पोर्टब्लेअर फिरवायचा हा गडी. आमच्यासोबत राहून राहून मराठीसुद्धा शिकून घेतलं त्याने गरजेपुरतं. एके दिवशी मला म्हणाला, “यार तुम ये डेढ़-दो घण्टे क्या भाषण देते हो? मुझे सुनना है”! मी म्हणालो, “आ जाओ आज शामको”! आला. सगळ्यात मागे बसला. मराठी व्याख्यान. साहेबांना एक शब्दसुद्धा कळला नाही. पण शेवटपर्यंत बसला होता. व्याख्यान संपल्यावर म्हणाला, “विक्रमसर, मुझे समझमें तो कुछ नहीं आया, पर पूरा माहौल भावूकसा हो गया था. ज़रुर कुछ अच्छी बातेंही बताई होंगी! इतना मानते हो आप महाराष्ट्रीयन लोग वीर सावरकरको”? मी म्हणालो, “सावरकर अगर भगवान नहीं तो भगवानसे कम भी नहीं हमारे लिए”! तो विचारात पडला. जरा वेळाने म्हणाला, “हम आजतक सेल्युलर जेल किसी टुरिस्ट स्पॉटकी तरहही दिखाते आए है. आज पहली बार सोच रहा हूँ की, उसके साथ लोगोंकी कितनी भावनाएँ जुडी हो सकती है! आईंदासे मैं जेल ले जाते वक़्त ये ध्यान रखूँगा और लोगोंको बताऊँगा की जिस इन्सानके लिए आपलोग यह जेल देखने आए हो, वह भगवानसमान है महाराष्ट्रमें”!!

    मला वाटतं, आपण मराठी लोक आपल्याच महापुरुषांबद्दल न्यूनगंड बाळगतो ना, म्हणून आपल्या लोकांना कुणी फारसे ओळखत नाही बाहेर. आपण आपल्याच लोकांची सकारात्मक बाजू डंके की चोटपे सांगायला लाजतो. तिकडे हॅवेलॉक बेटावर एक “राधानगर बीच” नावाचा नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे. आशिया खंडातला तिसरा सगळ्यात सुंदर आणि भारतातला तर सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा. पार गळ्यापर्यंत पाण्यात गेलात तरीही खाली पाहिल्यास पावले स्पष्ट दिसतील, एवढा स्वच्छ! तिकडे आम्ही सगळे मनसोक्त खेळलो. खेळून झाल्यावर कपडे-बिपडे बदलले आणि तिथल्या बाकड्यांच्या समूहात सगळेजण अर्धवर्तुळाकार बसलो. आमच्या मंडळींचा अतरंगीपणा असा की, आजचे व्याख्यान इथेच करुया. मग काय! अतीवसुंदर, नादमय समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांची कीर्ती सांगणारा मी! एवढे सगळे लोक एकत्र जमून एकाच माणसाचं ऐकताहेत म्हटल्यावर कुठून कुठून आलेले पर्यटकसुद्धा जमून ऐकू लागले. पाहाता-पाहाता शे-दिडशे माणसं जमली. क्वचितच कुणाला मराठी समजत असावं त्यांच्यापैकी. मी मुद्दामच मराठीतून व्याख्यान सुरु ठेवलं. व्याख्यान संपल्यावर एक बंगाली काका हातात भेळेचा पुडा घेऊन बकाणे भरता-भरता आले, “ये जो आप ‘सावन.. सावन..’ कह रहे थे, वह क्या था?” मला हसू आले. मी त्यांना म्हणालो, “सावन नहीं, सावरकर”! मग मी त्यांना सावरकर समजावून सांगितले, ते कसे सेल्युलर जेलमध्ये होते हेही सांगितले. त्यावर ते बाबूमोशाय काय म्हणाले असतील? म्हणे, “फिर हमारे सुभाषबाबू कौनसे सेलमें थे”? मी म्हणालो, “वह यहाँ कभी कैद थे ही नहीं! अंदमान प्रसिद्ध है मात्र सावरकरजीकी वजहसे”! तर म्हणे, “क्या बात करते हो? क्या सावरकर हमारे सुभाषबाबूसेभी बडे थे”? मी म्हणालो, “जी बिल्कुल! बल्की, सुभाषबाबूको आज़ाद हिंद सेनाकी कल्पनाभी सावरकरजीनेही दी थी. गुरु मानते थे वह सावरकरजी को! उनकी पुस्तकें बंगालीमें प्रकाशितभी करते थे सुभाषबाबू”! बंगालीकाका आता चमकले, “अरे बापरे, यह तो हमें पताही नहीं था. धन्यवाद सर”!

    पाहिलंत? इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी क्रांतिकारक दिले. पण केवढा पूज्यभाव त्यांच्या मनात आपापल्या क्रांतिकारकांबद्दल! नाहीतर आपण!! नुसती मराठी क्रांतिकारकांची यादीच करायची म्हटलं तरी खंडांमागून खंड भरतील, पण आम्ही करंटे न्यूनगंडी, त्यांच्याबद्दल बोलायलादेखील लाजतो. मुळात आम्हालाच काही माहिती नसतं तर बोलणार तरी काय म्हणा! पण माहिती तर त्या बंगाली काकांनाही नव्हती. तरीदेखील रेटून विचारलंच ना त्यांनी सुभाषबाबूंबद्दल? आणि आम्ही आमच्याच गौरवबिंदूंपासून दूर दूर पळतो. मला नाही वाटत, पंजाबात शीखेतर भगतसिंहांचा द्वेष करत असतील. नाही! तो ब्रॅण्ड आहे त्यांच्या राज्याचा!! बंगालात कायस्थविरोधी चळवळ आहे की नाही कोण जाणे, पण असली तरी कुणीही बंगालीबाबू सुभाषबाबूंचा द्वेष करताना नाही आढळणार तुम्हाला. ब्रॅण्ड आहे तो त्यांच्या राज्याचा! पण त्याच भगतसिंहांच्या इतके, किंबहूना काकणभर जास्तच क्रांतिकार्य केलेले राजगुरु! केवळ त्यांच्या जातीपायी त्यांचा द्वेष करणारे किती मराठी दाखवू तुम्हाला, बोला! यांची तोंडं सदोदित वाकडीच!! यांना टिळक नको, चापेकर नको, सावरकर तर साताजन्मीसुद्धा नको. बरं बाबा, मग जे तुम्हाला गोड लागतात त्यांच्याबद्दल तरी बोला. छे!! परप्रांतीयांसमोर आपल्याच लोकांचे गुणगान गातानाही हातभर फाटते. मुळात माहितीच काही नसतं. आणि इतरांचा द्वेष करण्यातच सगळं आयुष्य गेल्यामुळे सर्वसमावेशक भाषेत आपला माणूस पटवून देण्याचं कौशल्य तर त्याहूनही नसतं. काय कप्पाळ ब्रॅण्ड निर्माण होणार महाराष्ट्राचा? मग बोंबलायचं, “त्या अमुक राज्यात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून शिकवलं जातंय होऽ”! अरे थुक्रटराव, तू जर कधी बाहेरच्या जगात शिवरायांची चांगली बाजू सांगितलीच नाही, तर ते त्यांना जे समोर दिसेल तेच खरं मानणार ना ते येडपटा!! पण तू तर “शिवाजी कसे हिंदू नव्हतेच” असला पागल फेसबुकीया शोध लावत किबोर्ड बडवत बसलायस नाहीतर व्हिएतनामचा तो कोणतातरी नेता कसा रायगड बघायला आला होता याच्या खोट्यानाट्या कथा पसरवत बसलायस. मग जग शिवरायांना असंच काहीतरी वाट्टेल ते संबोधणार!!

    टिळक असोत, सावरकर असोत, शिवराय-शंभूराय वा थोरले बाजीराव असोत, हे ब्रॅण्ड आहेत महाराष्ट्राचे. छातीठोकपणे अमराठी आणि अभारतीय लोकांना कर्तृत्व सांगा त्यांचं. सकारात्मक बोला आणि बघाच त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर कसा दुणावतो ते! एवढे मोठे मोदी, पण पटेल आणि गांधी किती जरी भिन्न विचारधारांचे असले तरीही त्यांचं कर्तृत्व सांगताना कधी थकत नाहीत. केवळ ते त्यांच्या गुजरातचे आहेत म्हणून. मग आपणच का कर्मदरिद्रीपणा करावा? बिनधास्तपणे सांगा. मी आजवर जेव्हा जेव्हा बाहेरच्या राज्यांत गेलोय, तिथे तिथे सावरकर नावाचा ब्रॅण्ड स्थापन करुन आलोय. ही तरी नुसती अंदमानातलीच उदाहरणं झाली. भाग्यनगरात (हैदराबाद) तर ठाकूर राजासिंह सावरकरांचं कर्तृत्व समजल्यावर केवळ रडायचेच बाकी होते!! येत्या फेब्रुवारीत पुन्हा चाललोय मी अंदमानला. सावरकरांबद्दल अजाण असणाऱ्यांना सावरकर सांगायला. या माझ्यासोबत. ‘फिरस्ती टूर्स’च्या श्री. Abhijeet Kulkarni (+917843011155) यांच्याकडे नोंदणी करा, आणि गर्जा जयजयकार!! आपल्याकडे सोनं आहे रे. उधळा बेभानपणे मित्रांनो! आज-उद्या आदराच्या रुपाने महाराष्ट्राकडेच परत येणार आहे ते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचायचे असल्यास पाहा www.vikramedke.com)

    image

  • द्वीपशिखा

    द्वीपशिखा

    पोर्टब्लेअरपासून अवघ्या ८-१० मिनिटांच्या अंतरावर ‘रॉस’ नावाचे बेट आहे. ब्रिटिश खलाशी डॅनिअल रॉसच्या नावावरुन या बेटाचे नाव ठेवलेय. ह्या बेटावर राहाते एक देवी! अनुराधा राव नाव तिचं. पण का तिची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला? काय एवढं विशेष आहेत तिच्यात? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, अंदमानातली सगळ्यात महत्त्वाची अगदी तिथल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्याइतकी आणि सेल्युलरजेलइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती! तुम्हाला खोटं वाटेल, पण माझ्या दौऱ्यात पहिल्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही तर तिसऱ्या दिवशी काही स्थळं पाहाणे रद्द केले मी, पण तिची भेट घेतलीच! यावरुनच तिच्या महत्तेची कल्पना यावी!!

    अनुराधाचे वडील रॉस बेटावरचे रहिवासी. ते वारल्यावर निव्वळ कुतुहलापोटी अनुराधा ह्या बेटावर आली. अवघं ३ वर्षाचं वय होतं तिचं. बेटावर ससे होते, हरणं होती, मोर होते, बुलबुल होते. पण सर्वत्र अनागोंदी माजलेली. सरकारी खलाशी वाट्टेल तेव्हा शिकार करत असत. झाडं तोडत असत. कुणी सांसद-विधायक येणार असला की त्याच्यासाठी हरणं मारुन नेत असत. असं होता होता आख्ख्या बेटावर केवळ ८-१०च प्राणी उरलेले. तेही जखमी. आजारी. भुकेलेले. लहानगी अनुराधा हे सगळं पाहात होती. तिने एकदा थांबवायचा प्रयत्न केला. वाईट मारले खलाश्यांनी तिला. बास! त्यादिवसापासूनच अनुराधा कुणाशीही बोलेनाशी झाली. एक कोळी तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून होता. लहानगं वय! उंची कमी!! त्या कोळ्याच्या खांद्यावर चढायची. झाडपाला तोडायची. आणि दिवसभर भटकून सगळ्या प्राण्यांना खाऊ घालायची. अगदी रोज! नित्यनेमाने!! खलाशी वेडी समजू लागले होते तिला. हीसुद्धा कुणी काही बोलले की दगड उगारुन मागे लागायची त्याच्या. तिच्या वेडेपणावर अजूनच शिक्कामोर्तब व्हायचे त्याने!!

    हा क्रम १-२ नव्हे, तर तब्बल २० वर्षे चालला. २० खडतर वर्षे! ह्याकाळात ती शेकडो वेळा पडली. हजारो वेळा धडपडली. बेदम मार तर कितीदा खाल्ला ह्याची गणतीच नाही! काय मिळवलं तिने त्या २० वर्षांत? ज्या बेटावर अवघे ८-१० प्राणी उरले होते, तिथल्या प्राण्यांची संख्या हजारावर गेली. एकट्या अनुराधाच्या तपश्चर्येमुळे!! १९८७ साली रॉस बेट सैन्याच्या ताब्यात गेले आणि अनुराधाच्या आयुष्यातला दुस्वासाचा भीषण काळ संपला. सैन्याने नुसत्या तिच्या कल्पना ऐकल्याच नाहीत तर त्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी सगळी मदतसुद्धा केली. तिच्यामुळे हे बेट टिकून राहिलंय. आज अनुराधाचे वय ५१ वर्षे आहे व ती तिथली अधिकृत स्थलदर्शी (गाईड) आहे. पण एवढ्यावरच तिची कहाणी संपत नाही.

    आम्ही अनुराधाला भेटलो आणि ती बेटाची माहिती देऊ लागली. तेवढ्यात तिथे एक हरिण दिसले. त्याला पाहाताच अनुराधाने हाक मारली,
    “ए राजूऽऽ इधर आ”!
    आणि काय आश्चर्य, ते हरिण चक्क आम्हां माणसांच्या घोळक्यात येऊन उभे राहिले. अनुराधा त्याच्याशी गप्पा मारु लागली. जसजसे आम्ही पुढे जात गेलो, तसतसा आमचा समूह वाढत होता. हरणं आली, मोर आले, लांडोरी आल्या, ससे आले, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी आले. अनुराधा सगळ्यांशी गप्पा मारत होती. त्या प्राण्यांपैकी एकेकाच्या सवयी आणि स्वभाव सांगत होती. अगदी जवळच्या मित्र-नातेवाईकांबद्दल बोलावं तस्सं! मग ती मध्येच एखाद्या लांडोरीला म्हणायची,
    “रेश्मा, तेरा बच्चा तो बीमार था ना? किधर है, दिखा”?
    आणि ती लांडोर ताबडतोब तिच्या पिल्लाला शोधून घेऊन आली.
    “अरे, यह तो ज़ख़्मी है! जा उसे वह वाले पेड ते पत्ते चूसके लगा”!
    आणि खरोखरच ती लांडोर पिल्लाला घेऊन त्या झाडापाशी गेली व उपचार करायला लागली! मग ती कधी सश्याशी बोलायची तर कधी हरणांशी. अचानक वरुन एक बुलबूल पक्ष्यांचा थवा उडत गेला. अनुराधाने पटकन हाक मारुन बोलावलं. त्याबरोब्बर ते शेकडो पक्षी खाली उतरले. तिने मोठ्ठ्याने ओरडून सांगितले,
    “जाओ जाके बाकीके दोस्तोंकोभी बुलाके लाओ. बोलो, अम्मा बुला रही है!”
    पटकन चार-दोन पक्षी उडाले आणि अजून शे-सव्वाशे दोस्तांना घेऊन आले. सगळे जमल्यावर अनुराधाने त्यांना सांगितलं की,
    “अभी यह नये लोग है ना, इन्होंने कभी तुमको नज़दिकसे देखा नहीं. तो यह तुम्हारे फोटो-वोटो लेंगे. डरना नहीं हां!”
    आणि काय आश्चर्य! सगळे प्राणी, पक्षी आम्हांला हात लावू देऊ लागले. फोटो काढू देऊ लागले!!

    अशी अनुराधा. यांच्यापैकी कोणत्याही जीवाला तिने प्रशिक्षण दिलेले नाही. ती त्यांच्याचसोबत वाढलीये. हे सारं गणगोत आहे तिचं. त्यांना तिची भाषा समजते आणि तिला त्यांची! त्सुनामीने सगळंच्या सगळं कुटूंब हिरावून घेतल्यानंतर तर ह्या मंडळींशिवाय अनुराधाचं आपलं असं कुणीच राहिलं नाही. जे कुणी आहेत ते हेच आहेत. कित्येकदा त्यांना वाचवताना जीव धोक्यात घातलाय अनुराधाने. एक-दोन नव्हे, तर चक्क २५ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झाल्यायत तिच्यावर. तरीही तिच्या दिनचर्येत एक दिवसही खाडा झालेला नाही. मी तिला विचारलं,
    “ऐसी खस्ता तबियतके बावजूद कैसे कर लेती है आप यह सब”?
    तर म्हणाली, “वह जो उपर बैठा है ना, बहोत बडा झगडा चल रहा है मेरा उसके साथ! मैंने उसको बोल दिया है की, अगर यह जानवर ज़िंदा रखने है तो मुझे अपने पैरोंपे खडा रख. वरना बेशक़ मार दे मुझे. मेरा क्या है! कोई नहीं आगेपीछे रोनेवाला. मगर इन लोगोंका मेरे सिवा कोई नहीं. बस, तबसे भगवान मुझे मारता नहीं और इन जानवरोंका सहारा छिनता नहीं!”
    मी पाया पडू लागलो तर पाय चटकन मागे घेतला आणि प्रेमाने माझ्या पाठित धपाटा घालून हसत-हसत म्हणाली,
    “हट सुव्वर”!!

    निघताना आमच्यातल्या एकाने पटकन पाचशेची नोट काढून दिली तिला. तिने ती घेतली आणि “थँक्यू” म्हणाली. कुणी काही कुणी काही रक्कम देऊ केली तिला तर घेईचना. म्हणाली,
    “इतने ज़्यादा पैसे मैं नहीं ले सकती. पाँचसौ बस हो गए मेरे लिए”.
    ऐकेचना. शेवटी बळजबरी कोंबले पैसे तिच्या हातात. ती सांगत होती,
    “टूरिस्ट लोगोंसे तो मैं कई-कई बार पैसे लेतीभी नहीं. हाँ, पर अगर कोई एम्पी-एमेले आए, तो छोडती नहीं सालेको. उससे मनमर्ज़ी पैसे वसूलती हूँ. क्यूँ छोडे? हरामी रोज़ लूटते है हमें. कहीं तो जेबें ढीली करना सीखो!”
    तिच्या ह्या मार्मिक तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. पण ते मनापासून पटतही होते! ती म्हणाली,
    “पीछले महिने वह तुम्हारे ठाकरेका बच्चा आया था ना? वह आनेवाला था मुझसे मिलने! उसके पहलेही उसका पीए आ धमका मेरे पास. कहने लगा, सुना है तुम किसीभी मिनिस्टर और पॉलिटिशियनको जो मनमें आए बोल देती हो? हमारे साहबके सामने ऐसा मत करना हाँ! मैं बोली, क्यूँ ना करु? अगर वह कुछ ग़लत बोलेगा तो मैं उसे नहीं छोडूँगी! बादमें जब उसका साहब आया तो मैंने उससे पूछा, तेरा पीए ऐसा बोल रहा था. तो वह बत्तीस दाँत दिखाके हँसने लगा! बोला, नहीं अम्मा जो तुमको ठीक लगे वहीं बोलो. छोडा नहीं मैंने उसकोभी! अच्छा आदमी लगता है पर वह!”

    भूतकाळातल्या कटू आठवणींमुळे अनुराधा सगळ्याच राजकारण्यांवर उखडून आहे. पण असं नाही की, ती नुसती फटकळच आहे. तिच्या मनात एका व्यक्तीविषयी अपरंपार भक्ती भरुन राहिलीये. महाराष्ट्राच्या जातीची ना गोताची अनुराधा आम्हांला सांगत होती –
    “जब दुनियाका अंत होता है ना, तब नई संस्कृती पनपती है. वह लोग ज़मीं खोदते है तो पीछली सभ्यताके कुछ बर्तन मिलते है, मूर्तीयाँ मिलती है. उन्हींको वह भगवान समझके पूजने लगते है. जब हमारी संस्कृती खत्म हो जाएगी ना, तबभी आनेवाली नस्ल ऐसीही खुदाई करेगी. उस मिट्टीसे पता है कौनसा भगवान निकलेगा? उस माटीसे निकलनेवाले भगवान होंगे, वीर विनायक दामोदर सावरकर..!”
    माझ्याच्याने पुढचे ऐकवलेच गेले नाही. कानांवर तिचे शब्द पडत होते केवळ. मेंदू त्यांचा अर्थच लावायचा बंद झाला होता. डोळ्यांतून अश्रूंचा श्रावण बरसत होता. ती म्हणाली,
    “..जब वह नस्ल सावरकरजीको भगवान मानना शुरु कर देगी, समझो बस तभीसे धरतीका स्वर्ग बनना शुुरु हो जाएगा!”
    सावरकरांच्या स्वतःच्या राज्यात त्यांची जात पाहून द्वेष करणारी डुकरं राहात असताना अडिच-तीन हजार किलोमीटर लांबवर सावरकरांना देव मानणारी ही बाई आम्हाला त्यांचा महीमा सांगत होती. डोळ्यांतून झरणारे पाणी आणि त्यात सूर्याचा प्रखर प्रकाश, यांमुळे अस्पष्ट दिसणारी अनुराधा त्याक्षणी मानवी वाटतच नव्हती, मानव राहिलीच नव्हती. ती झाली होती “द्वीपशिखा”! चमचमणारी तेजोमयी द्वीपशिखा!! इथून पुढचे माझे अंदमानातले सारे व्याख्यानदौरे केवळ आणि केवळ ह्या द्वीपशिखेच्या दर्शनानेच पूर्ण होणार आहेत!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी-पेस्ट करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com]

    image

  • आनंदवनभुवनी

    जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर, विशेषतः परधर्मीय देशावर आपला राजनैतिक आणि भौगोलिक अधिकार प्रस्थापित करतो; तेव्हा सगळ्यात आधी कोणते काम करत असेल, तर ते म्हणजे आपली जी कोणती संस्कृती असेल ती तिथे रुजवायचा प्रयत्न करतो. यातून काय साधतं? एकतर यामुळे तेथील लोकांना कमतर लेखून त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. आणि दुसरा व सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे कालांतराने तेथील जनतेला आक्रमकांची संस्कृती (मग ती कदाचित पाशवी असली तरीही!) हीच आपली संस्कृती वाटू लागते, जेणेकरुन भविष्यात आक्रमकांचं त्या भूभागावरील राजकीय वर्चस्व जरी संपलं तरीदेखील संस्कृती प्रदुषित करुन ठेवल्यामुळे पिढ्यानपिढ्या तो भूभाग आक्रमकांचा सांस्कृतिकदृष्ट्या दासच बनून राहातो! याचं सर्वांत सोपं उदाहरण म्हणजे इंग्रजी ही भाषा! जगभर हाताची सगळी बोटे भरतील इतकेसुद्धा देश इंग्रजीला किंमत देत नसताना, आपल्याकडे मात्र छातीठोकपणे इंग्रजी ही अवघ्या जगाची भाषा असल्याचे खोटेच सांगितले जाते. का? कारण गोऱ्या राज्यकर्त्यांनी तसे रुजवलेय ना! तीच गोष्ट ऊर्दूची! मुळात ऊर्दू नावाची कोणतीही स्वतंत्र भाषाच अस्तित्वात नसूनदेखील आम्ही मात्र अस्तित्वात नसलेल्या भाषेचे गोडवे गातो!! राईट बंधूंना मिळालेले पेटंट हे विमानाचा शोध लावण्यासाठी मिळालेले नसून ‘विमानात उपयोगी अश्या नव्या सुधारणा करण्यासाठी’ (पेटंट क्रमांक US 821393) मिळालेले असतानाही आमच्याकडे रेटून राईट बंधूंनीच विमानाचा शोध लावल्याचे शिकवले जाते. ही अवस्था! मग राईट बंधूंच्या हयातीतच त्या पेटंटवर शेकडो केसेस चालल्या आणि जर्मनीतल्या एका कोर्टाने तर राईट बंधूंच्याच विरोधात निकाल दिला होता, हे कुठले ठाऊक असायचे!! शोध न लावणाऱ्या राईट बंधूंना श्रेय द्यायला आमच्याकडचे तथाकथित विद्वान पळपळ पळतात, परंतु तोच शोध आमच्या प्राचीन ग्रंथांतरी कुणी दाखवून दिला, तर मात्र नाके मुरडतात! परंतु त्याचवेळी तोफांच्या निर्मितीचे श्रेय बाबराला, रॉकेटच्या निर्मितीचेचे श्रेय टिपूला देताना मात्र ही मंडळी थकणार नाहीत आणि कुणी जर ह्या शोधांची वर्णने आपल्याकडच्या परंपरांमध्ये दाखवून दिली तर डोळ्यांवर कातडे ओढण्यातही कसूर करणार नाहीत!! परकीय आक्रमकांच्या कौतुकात वाहावत जाण्याची अशी एक-दोन नव्हे तर अक्षरशः सहस्रावधी उदाहरणे सांगता येतील. विवेकपिसाट फेक्युलर मंडळी किती जरी उरस्फोड करुन ह्या प्रकाराला ‘गंगाजमनी तहज़ीब’सारखे गोंडस नाव देत असली, तरीही ह्या प्रत्यक्षात मानसिक दास्यत्वाच्या रुपाने शिल्लक उरलेल्या राजकीय आणि धार्मिक दास्यत्वाच्या खुणा आहेत. मग ती आमच्या पवित्र वास्तूंची केलेली तोडफोड असो, परकीयांचे ते पाशवी आक्रमक असूनदेखील केलेले उदात्तीकरण असो, अट्टाहासाने त्यांचाच इतिहास शिकायला लावणे असो, रस्ते-वास्तू इ. ना त्यांची नावे देणे असो; थोडक्यात सांगायचे तर आपल्या देशात शत्रू म्हणून आलेल्या व इथले खऱ्या अर्थाने भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक नुकसानच केलेल्या कुणाच्याही नावाने इथले काहीही ओळखले जाणे हा सच्च्या राष्ट्रभक्तांसाठी एक सल असतो आणि असा सल मुळासकट नष्ट करणारा कुणीही नायकच ठरतो. दिल्लीतील ‘औरंगज़ेब मार्गा’चे नाव बदलून ‘एपीजे अब्दुल कलाम मार्ग’ करण्याच्या घटनेकडे ह्याही दृष्टीकोनातून पाहायला हवे. सवयीचा नसल्यामुळे थोडा जड जाईल हा दृष्टीकोन, पण अस्सल प्रामाणिक दृष्टीकोन आहे हा – परकीयांचे लांगूलचालन करणारा स्वार्थी नज़रीया नव्हे!!

    अनेक दिवसांपासूनच्या नामांतर मागणीस अखेरीस शासकीय ठप्पा मिळालाय. ह्यानिमित्ताने हिंदुस्थानात येऊन लुटालूट, जिहाद व चैन करणाऱ्या मुघलांच्या नावे असलेले एक प्रतीक तरी कमी झाले!! अर्थातच बर्नॉल हाच ज्यांचा राष्ट्रीय-लेप आहे, अश्या विवेकपिसाटांना (हा शब्द ‘लिंगपिसाट’च्या चालीवर वाचावा!) आता औरंगज़ेबाच्या प्रेमाचे उमाळे फुटू लागतील, तो कसा महान वगैरे होता ह्याचे साक्षात्कार झडू लागतील. औरंगज़ेबाची प्रतिमा उंचावण्याची अहमहमिका सुरु होईल. होऊ द्या. काय वाट्टेल ते करु द्या. त्यांचे कामच आहे ते. परकीयांचे पाय चाटण्यावरच तर त्यांची दुकानदारी चालते ना! पण आपण सामान्य माणसं आहोत. दुकानदार नाही आणि तथाकथित फेक्युलर विचारजंत तर त्याहूनही नाही. त्यामुळे आपण तर्कशास्त्र वापरायचे. समर्थांनी औरंगज़ेबाला ‘औरंग्या पापी’ का संबोधले असावे, ह्याचा विचार करायचा. मोठमोठे ग्रंथ धुंडाळण्याचीही गरज नाही. सर्वांत पहिल्यांदा दृष्टीसमोर येईल, ते ह्या औरंगज़ेबाने आमच्या शिवछत्रपतींशी मांडलेले जन्माचे वैर!! असल्या वैऱ्याचे नाव इथल्या रस्त्याला द्यायचे? तेही शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने अवघ्या शंभर वर्षांतच मुघलांची (!) दिल्ली शब्दशः अंकीत केली होती, हा सिद्ध इतिहास असताना? जरा शोध घेतला तर लक्षात येईल की, ह्या औरंगज़ेबाने तख़्तासाठी आपल्या सख्ख्या बापाला कैदेत ठेवले आणि भावाचा हालहाल करुन खून केला. त्या औरंगज़ेबाचे आपल्या श्रीरामांच्या आणि लक्ष्मण-भरत-शत्रुघ्नांच्या देशात गुणगान चालवून घ्यायचे? कौरवांनी असाच राज्याच्या हव्यासापोटी पांडवांचा अतोनात छळ केला. त्यांना तर खलनायकच मानतो ना आपण? मग मुघलांचाच उदोउदो का म्हणून चालवून घ्यायचा? केवळ काही जणांचा जीव मतपेढीत अडकलाय म्हणून? आणि ह्या पार्श्वभूमीवर आठवा अवघ्या बत्तिशीच्या शंभूराजांचा ह्याच औरंगज़ेबाने आत्यंतिक पंथवेडातून केलेला खून!! ह्या आठवणीनंतरही जर कुणी औरंगज़ेबाची बाजू घेणार असेल, तर त्याच्या वंशशुद्धीवर शंका येणे अगदीच साहजिक ठरेल!!

    कुणाला वाटेल की, हे इतिहास-भुगोलाचे हिंदुकरण आहे. नाही. औरंगज़ेबाचा आम्ही मुसलमान म्हणून कधीच द्वेष करत नाही. तो मुसलमान नंतर होता, आधी एक पंथवेडा देशशत्रू होता ह्याची प्रत्येक न् प्रत्येक हिंदुत्ववाद्याला पूर्णतया जाणीव आहे. आणि म्हणूनच धर्माच्याच नावे बोलायला गेलो तर त्या रस्त्याला एका मुसलमानाचेच नाव दिले गेलेले असूनही सर्वच हिंदुत्ववादी मनापासून आनंदी आहेत. कारण, अब्दुल कलामही मुसलमान नंतर, परंतु आधी एक सच्चे देशभक्त होते हे त्याच हिंदुत्ववाद्यांना तितक्याच मनापासून ज्ञात आहे म्हणूनच!! काय करणार, हे हिंदुत्ववादी मेले असलेच असतात, जात-धर्म न बघता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतात. हिंदू बघून द्वेष आणि अहिंदू बघून त्याच्या देशघातकीपणाच्या प्रमाणात वाढतं प्रेम, ह्या तर सोयीस्कर फेक्युलरांच्या खोडी! त्या भोळ्या-भाबड्या हिंदुत्ववाद्यांना कुठल्या जमायला!!

    थोडक्यात सांगायचे झाले तर, आज ह्या नामांतराच्या निमित्ताने परकीय दास्यत्वाच्या गलिच्छ खुणा पुसणाऱ्या एका मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. शिवरायांनी ‘राज्यव्यवहारकोश’ लिहवून घेताना जो स्वकीयतेला वरीष्ठता देण्याचा देशहितकारी दृष्टीकोन ठेवला होता, तोच दृष्टीकोन ह्यापाठीदेखील आहे. मॉरिस्कोंना हाकलताना स्पॅनिश राष्ट्रभक्तांचा जो दृष्टीकोन होता, तोच अगदी तोच दृष्टीकोन आहे हा! त्यामुळेच एक ठरलेला वर्ग सोडला तर सबंध देश पक्षीय आणि पंथीय अभिनिवेश बाजूला ठेवून ह्या आरंभाचे स्वागतच करेल. हे पहिले पाऊल अशीच इतर अनेक पावले घेऊन येवो. महाराष्ट्रातही त्याच औरंगज़ेबाच्या नावाने ‘औरंगाबाद’ नांदतंय. महाराष्ट्राच्या भाळावरील ही मुघली अत्याचारांची खूणदेखील लवकरच पुसली जावो. जेथे-तेथे केवळ आणि केवळ खऱ्या देशभक्तांनाच स्थान व वरीयता मिळो. हीच आनंदवनभुवनी प्रार्थना!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (‘सामना’, दि. ६ सप्टेंबर दिनी ‘उत्सव’ पुरवणीत प्रकाशित झालेला लेख. गंमत अशी की, हा लेख सुमारे ८-९ दिवसांपूर्वी लिहिलेला आहे. तोपर्यंत ना कुणी मिशाळ तरस बरळलं होतं ना कुणी खुदानंदी कोल्हा. त्यामुळे ह्या लेखात मी व्यक्त केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं असंच म्हणायला हवं! माझे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • एका पेटंटची गोष्ट

    आज आपण अगदी सहजपणे मोबाईल, रेडिओ इ. साधने वापरतो. परंतु या सर्व ‘बिनतारी संदेशवहना’चा (Wireless Telecommunication) शोध कुणी लावलाय माहितीये का? हा शोध लावणारी व्यक्ती एक भारतीय आहे, नव्हे आपल्या सर्वांच्या परिचयाचीदेखील आहे! त्यांचं नाव आहे, आचार्य जगदिशचंद्र बसू (१८५८-१९३७)!! होय, ‘वनस्पतींनाही जीव असतो’ ही हिंदूधर्मातील संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे व त्या तत्त्वावर आधारित ‘क्रेसोग्राफ’ या यंत्राची निर्मिती करणारे प्रा. जगदिशचंद्र बसू!! ते नुसते वनस्पतीशास्त्रज्ञच नव्हते, तर भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वविद, आणि विज्ञानकथालेखकदेखील होते! एवढेच कश्याला, आज वापरात असलेल्या ‘रेडिओ’च्या निर्मितीचेही श्रेय प्रा. बसू यांनाच दिले जाते, हे सर्वच वैज्ञानिक प्रगतीसाठी पाश्चिमात्यांकडे आस लावून पाहाणाऱ्या भारतीयांच्या गावीही नसेल! मग चंद्रावरील एका खळग्याला सन्मानपूर्वक त्यांचे नाव देण्यात आले आहे, हे माहिती असायची शक्यता तर आणखीनच धूसर!

    image
    आचार्य जगदिशचंद्र बसू

    मुळात आचार्यांचा स्वभावच निरीच्छ, त्यामुळेच त्यांनी ना कधी आपल्या संशोधनाचा व्यवसाय केला ना कधी पेटंट घेण्याच्या फंदात पडले. किंबहूना संशोधनांचे स्वामित्त्वाधिकार घेऊन त्यांचे बाजारीकरण करण्याला त्यांचा कायमच विरोध होता. ३० नोव्हेंबर १९१७ दिनी ‘बोस इन्स्टिट्यूट’ या आपल्या जगप्रसिध्द संशोधनसंस्थेचे उद्घाटन करताना त्यांनी दिलेल्या ‘Voice of Life’ या प्रसिद्ध व्याख्यानातही त्यांनी याच तत्त्वाचा पुरस्कार केलेला आढळतो! परंतु याच संस्थेच्या वेबसाईटवर (www.boseinst.ernet.in) मात्र त्यांच्या ‘Galena Detector’ या संशोधनाचे पेटंट त्यांच्या नावावर असल्याचे सांगितले आहे. हे काय गौडबंगाल आहे बुवा? वास्तविक स्वत: आचार्य बसू यांनीच लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट या विख्यात संस्थेत व्याख्यान देताना आपले ‘Galena Detector’ हे संशोधन मांडले होते व स्पष्टपणे नमूद केले होते की, ‘सदरचे यंत्र व त्यापाठचे संशोधन सर्वांनाच व्यावसायिक व इतर सर्व वापरासाठी मोफत उपलब्ध असेल’ (संदर्भ : ‘विज्ञान प्रसार’या शासकीय उपक्रमाच्या वेबसाईटने प्रकाशित केलेले सुबोध महंतीलिखित आचार्य बसू यांचे चरित्र). एवढेच कश्याला, त्याकाळात या संशोधनाच्या व्यावसायिक उपयोजनासाठी आलेले लठ्ठ रकमेचे सारेच प्रस्ताव आचार्य बसू यांनी धुडकावून लावले होते. तरीही या संशोधनाचे पेटंट आचार्यांच्या नावे कसे काय आढळते?

    image
    स्वामी विवेकानंद

    याचे उत्तर आहेत स्वामी विवेकानंद!! बसूंचे Galena Detector हे जगातील पहिलेवहिले ‘अर्धवाहक’ (Semi-Conductor) होय. यालाच पहिल्या पिढीतला ‘प्रकाशयोगी घट’ही (Photovoltaic Cell) म्हणता येईल! असे म्हणतात की, स्वामी विवेकानंदांना आचार्यांच्या या संशोधनाचे भविष्यकालीन महत्त्व जाणवले होते. तसेच, आपल्या विरक्त वृत्तीमुळे आचार्य या संशोधनाचे पेटंट घेऊ इच्छित नाहीत, हेही स्वामीजींनी ठाऊक होते (संदर्भ : The Monk As Man – The Unknown Life Of Swami Vivekananda, पृ. १४-२५, लेखक : मणिशंकर मुखर्जी, पेंग्विन बुक्स प्रकाशन). त्यामुळेच शिकागो येथील धर्मसभेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी आचार्यांची भेट घेतली व त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नाहीसे लक्षात आल्यावर त्यांनी सदर यंत्राच्या प्रती तयार केल्या व आपल्यासोबत अमेरिकेला नेल्या. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात स्वामीजींनी नुसती व्याख्यानेच नाही दिली, तर आपली शिष्या व प्रख्यात लेखिका-समाजसेविका श्रीमती सारा बुल हिला सांगून सदरच्या यंत्राचे पेटंटदेखील आचार्य बसूंच्या नावे नोंदवले!!

    आज सदर संशोधनाचे पेटंट पाहू गेल्यास ते अमेरिकेत नोंदवले आहे, हे दिसते (पेटंट क्र. US755840). आवेदक या नात्याने आचार्यांच्या नावासोबत श्रीमती बुल यांचेही नाव दिसते. शिवाय स्वामीजींची वैज्ञानिक संशोधनाबाबतची दूरदृष्टी व त्यांचा आचार्यांशी असलेला स्नेहदेखील सुपरिचित आहे. तेव्हा सदरचे पेटंट हे स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदवण्यात आले हे उघड आहे. किंबहूना श्रीमती बुल व आचार्य यांचा परिचय स्वामी विवेकांनंदांमुळेच झाला. श्रीमती बुल यांनी आचार्यांना प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी ४००० डॉलर्सची मदत केल्याचेही उल्लेख आढळतात (संदर्भ : Swami Vivekananda – The Living Vedanta, पृ. २४०-२४२, लेखक : बद्रिनाथ चतुर्वेदी). परंतु स्वामीजी शिकागोसाठी मार्गस्थ झाले ३१ मे १८९३ दिनी आणि आचार्यांनी रेडिओलहरींवरील आपले संशोधन सुरु केले १८९४ साली. तेव्हा सदरचे पेटंट हे श्रीमती बुल यांनी स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदविले हे जरी खरे असले (संदर्भ : Swami Vivekananda & Scientists, पृ. १४, विद्यार्थी विज्ञान मंथन), तरी स्वामीजी स्वत: ते यंत्र घेऊन अमेरिकेला गेले होते ही कथा खोटी असावी, असे मला वाटते. कारण, सदर पेटंटचा आवेदन दिनांक (Filing Date) हा ३० सप्टेंबर १९०१ असा आढळतो, तर संमति व प्रकाशन दिनांक (Granting & Publication Date) हा २९ मार्च १९०४ असा (Application No. : US19010077028 19010930) म्हणजेच, स्वामीजींच्या महानिर्वाणानंतरचा आढळतो.

    image
    श्रीमती सारा बुल

    परंतु सदर पेटंटची नोंदणी ही स्वामीजींच्या सांगण्यावरूनच झाली, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. आज जेव्हा भारताने हळद, बासमती तांदूळ इ. अस्सल भारतीय संशोधनांचे पेटंट्स वेळीच न नोंदविल्यामुळे झालेला प्रचंड त्रास अनुभवलाय, त्या पार्श्वभूमीवर तर स्वामीजींची दूरदृष्टी अधिकच खुलून दिसते. एवढेच नव्हे, तर संशोधनकार्यास व्यापक स्वरूप येण्यासाठी संशोधनसंस्था असावी ही टाटा इन्स्टिट्यूटची आधारभूत कल्पनादेखील स्वामीजींनीच सर जमशेदजी टाटा यांना जपान ते शिकागो या प्रवासात सांगितली होती (संदर्भ : टाटांनी स्वामीजींना दि. २३ नोव्हेंबर १८९८ रोजी लिहिलेले पत्र). थोडक्यात, स्वामीजी केवळ अध्यात्मातच रममाण होणारे नव्हते, तर भौतिक जगात मानाने व ताठ मानेने जगण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचीदेखील जाण होती त्यांच्याठायी! एकप्रकारे अध्यात्म आणि विज्ञानाचा अपूर्व संगमच म्हणा ना! आजच्या भारताला याचीच सर्वाधिक आवश्यकता आहे. अध्यात्म व विज्ञान ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. कोणतेही एक चाक जर पंगू असेल, तरीही गाडी मुक्कामी पोहोचू शकत नाही. भौतिक जगात जगण्यासाठी विज्ञान अत्यावश्यक आहेच, परंतु माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी क्रियाशील अध्यात्मदेखील तितकेच आवश्यक आहे, हा संदेशच जणू स्वामीजींनी कृतीद्वारे दिला आहे!! स्वामीजींचा जन्म मकरसंक्रांतिचा! त्यानिमित्ताने तिळगुळ खाता-खाता आपण सर्वांनी स्वामीजींच्या चरित्रातून एवढा एक बोध घेतला तरी पुरे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच स्वामी विवेकानंद या विषयावर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com)

  • आत्मबोध

    ‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या.
    “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं!
    “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..”
    कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर एक फुटकी कवडीदेखील नव्हती. तो खट्टू झाला. त्याने अरुळसामीला विनवणी करून पाहिली, पण भाडं मिळाल्याशिवाय जायला नकार दिला अरुळसामीने! सन्याश्याने वाट पाहिली की कुणी भाविक आपला खर्च करेल का. पण तसं तिथे कुणीच दिसत नव्हतं. अखेरीस सन्याश्याने जरा विचार केला, काश्या आवळला आणि ‘जय माँ कालीऽ’ अशी आरोळी ठोकत समुद्रात उडी ठोकला व पोहत पोहत पुढे जाऊ लागला. हे दृश्य पाहून अरुळसामी घाबरला. पट्टीच्या पोहोणाऱ्यासाठीदेखील अंतर काही कमी नव्हते ते. शिवाय समुद्रात अनेकविध पाशवी जलचर भरलेले! पोहत पोहत श्रीपादशिलेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ शून्यवत् होती! आपला दोन पैश्यांचा व्यवसाय एखाद्याच्या जीवावर बेतणार या भीतीने घाबरून जाऊन अरुळसामीने बोंब ठोकली!

    “आरं पन तुला तरी काय येवढं नडलं होतं पैश्यांचं? नावेत येवढे लोक बसवून न्हेतोस, त्यांच्यात एकजण फुकट न्हेला अस्ता तर काय झिजली आस्ती तुझी व्हडी”, एकाने विचारले.
    अरुळसामी अजूनच खचला. म्हणाला,
    “माजी लई म्होटी चुकी झाली ह्ये तर खरंच, पन आता येळ दवडायला नगं! आधी त्या साधुबाबाला वाचिवलं पाह्यजे”!
    हे म्हणणं सगळ्यांना पटलं. ताबडतोब एक नाव काढण्यात आली आणि तिच्यात बसून ८-१० कोळी श्रीपादशिलेच्या दिशेने निघाले. रस्त्यात ना कुठे सन्यासी दिसला ना काही झटापट झाल्याचं लक्षण! कुणा मगरीने वा माश्याने फाडलं तरी या समुद्रात काय समजणार म्हणा! अखेरची आशा म्हणून सारे श्रीपादशिलेवर पोहोचले. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही – चिंब भिजलेला तो पंचविशीचा बलदंड सन्यासी शिलेवर ध्यानस्थ बसला होता. या मंडळींची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. एवढं दिव्य करीत श्रीपादशिलेवर पोहोचणे ही केवढीतरी मोठी गोष्ट होती. सन्यासी साधासुधा तर खचितच नव्हता. या दिव्यतेने दिपलेल्या सर्वांनी वाकून नमस्कार केला सन्याश्याला.

    काही क्षण शांततेत गेले. पहिला शब्द अरुळसामीच्याच तोंडून बाहेर पडला,
    “म्हाराज मला क्षमा करा. म्या चुकलो. पैश्यापायी खुळावलो हुतो म्या. तुमचं मोठंपण वळखू शकलो न्हाई मी. जो मानूस इथवर यायला सोत्ताच्या जीवाची बी पर्वा करत न्हाई, त्याचा हितं येन्यामागं नक्कीच कायतरी हेतू आसनार. कायतरी दैवी काम आसनार. मी मूर्ख तुमच्या या कानामध्ये येत होतो. नरकात बी जागा मिळनार न्हाई मला”!
    अरुळसामी स्वत:च्याच थोबाडीत मारून घेऊ लागला. ते पाहून सन्यासी झटकन पुढे झाला. अरुळसामीचे हात धरले आणि आसपासच्या समुद्राहूनही अधिक शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाला,
    ‘वेडे की खुळे नावाडीबाबा तुम्ही? का स्वत:ला प्रताडित करताहात? अहो आईची इच्छा होती लेकराने पोहत पोहत तिच्यापाशी यावं, ती तिने पूर्ण करून घेतली. तुमचा कुणाचाही काहीही दोष नाही यात. खरंच”!
    सन्याश्याचा तो दृष्टीकोन आणि आभाळभर मोठेपण सर्वांना एका क्षणात वश करून गेले! एकाने धीर करून विचारले,
    “म्हाराज हितं तुमची जेवनाची काही सोय..”?
    “सोय अशी काहीच नाही. इथे ध्यान करण्यासाठी आलोय मी. मातेने जेवू घातलं तर जेवेन, अन्यथा ध्यान संपेपर्यंत उपवेशन!”, सन्यासी सहजपणे म्हणाला!
    “त्ये काही न्हाई, माझ्यामुळं तुमास्नी तरास झालाय, तुमी हितं आसेपत्तुर रोज म्याच जेवन आनून द्येनार तुमाला. तुमी आरामात ऱ्हावा, ध्यान करा. म्या घेईन सारी काळजी. येवढं तरी प्रायश्चित्त घेऊंद्याच मला”, अरुळसामीने जाहीर करून टाकलं!
    “जशी आईची इच्छा”, सन्याश्याने हसून मान डोलावली!
    “पन म्हाराज, तुमचं नाव काय? कुठनं आलात? तमिळ तर वाटत न्हाईत तुमी?”, अरुळसामीने विचारले.
    “होय, इथला नाही मी. बंगालहून आलोय. तीर्थयात्रा करतोय मी सध्या. अवघा देश फिरलो. अंती देशाच्या शेवटच्या टोकावर ध्यान करायचं म्हणून या कन्याकुमारीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिलेवर आलो! आणि नावाचं म्हणाल, तर बरीच नावे आहेत मला. कुणी विविदिशानंद म्हणतं, तर कुणी सच्चिदानंद म्हणतं! गेले काही दिवस लोक एका वेगळ्याच नावाने हाक मारतात मला. मलाही ते नाव आवडलंय – उच्चारायला सोपं, सुटसुटीत तरीही अर्थपूर्ण – विवेकानंद! तुम्हीही हवं तर याच नावाने हाक मारा मला!”, सन्याश्याचे निरागस उत्तर!
    “स्वामी विवेकानंद”, अरुळसामीने एकवार हे नाव मनात घोळवले व सारे परत फिरले!
    त्यानंतर तीन दिवस रोज दिवसातून दोनदा अरुळसामी जेवण घेऊन यायचा व खरकटं घेऊन जायचा. या तीन दिवसांत स्वामी एक शब्दही बोलले नाहीत. सातत्याने ध्यानमग्न असायचे ते. भोजनादी विधींसाठी उठत तेवढेच!

    तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला. आजवरचे सारे आयुष्य स्वामीजींच्या नजरेसमोरून सरकू लागले. प्रेमळ वडील विश्वनाथबाबू आठवले – त्यांनी शिकवलेल्या एकेक गोष्टी, बाळपणीचा रम्य, श्रीमंती काळ आठवला! दाट केसांतून मायेने हात फिरवणारी आई भुवनेश्वरी देवी आठवली! आपला झालेला नास्तिकतेकडून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास नजरेसमोर उभा राहिला त्यांच्या! वडील गेल्यानंतर नशिबी आलेलं पराकोटीचं दारिद्र्य आणि त्या जीवघेण्या काळात सुखाचा झरा बनलेली श्रीरामकृष्णांची साजरी छवि डोळ्यांपुढे उभी राहिली! ठाकूर म्हणत होते, “अरे नोरेन, तुझा देव हिमालयात नाही! या.. या.. दरिद्री लोकांमध्ये आहे! होय नोरेन, हा दरिद्रीनारायणच तुझा परमेश्वर आहे! यांची सेवा कर, तीच ईश्वराची सेवा ठरेल! ना जीवाची सेवा कर ना शिवाची, ‘शिवभावे जीवसेवा’ कर नोरेन ‘शिवभावे जीवसेवा’ कर! तोच तुझा मार्ग आहे! हिमालयात जाऊन या दु:ख-दैन्यापासून पळू नकोस. लोकांमध्ये जा! त्यांचं दु:ख अनुभव! ही अनुभूतीच तुला मार्ग दाखवेल! मार्ग – दु:खहरणाचा आणि मोक्षाचाही”!
    आणि आपणही कश्यातच, अगदी आश्रमातही न गुंतता तीर्थयात्रेला निघालो होतो! सारा भारत फिरलो आपण! पराकोटीची श्रीमंती पाहिली आणि तेवढंच दारिद्र्यही अनुभवलं! सोन्यारुप्यांत खेळणारे लोक पाहिले आणि एकवेळच्या जेवणाला मोताद माणसेही पाहिली! जनतेशी काहीही देणंघेणं नसलेले संस्थानिक जमिनदार पाहिले, जुलमी इंग्रज पाहिले; तर दुसरीकडे खेतडीच्या महाराजांसारखे जाणते शासकही पाहिले! अज्ञानात खितपत पडलेला समाज पाहिला, तसेच टिळकांसारखे ज्ञानीही पाहिले! हा देश शेकडो रंगांनी नटलेला तर खराच!
    पण एक आहे, या देशातला गरीब माणूस उपाशीपोटी झोपेल एकवेळ, पण त्याच्या मनात समाधान असेल! आस्थेचं, आस्तिकतेचं आणि अध्यात्माचं समाधान! याउलट इंग्रज शासकांकडे पैश्याने विकत घेण्याजोग्या साऱ्या काही सुखसुविधा आहेत, पण शांत झोप नाही, समाधान नाही!
    हे दोन्ही जोडलं पाहिजे! एकत्र केलं पाहिजे!! पाश्चात्यांची औद्योगिकता टिकवून त्यांना भारतीय अध्यात्म शिकवलं पाहिजे आणि भारतीयांचं समाधान टिकवून येथे पाश्चात्य सुखसोयी आणल्या पाहिजेत! कुणीतरी पूल बनून हे काम केलं पाहिजे!
    स्वामीजींच्या नजरेसमोर दिव्य प्रकाश पसरला होता! आत्मबोधाचा हा क्षण! त्या प्रकाशात जराशी हालचाल झाली आणि स्वामीजींच्या अत्यधिक संवेदनशील झालेल्या ग्रहणक्षम मनावर तरंग उमटले,
    ‘कुणीतरी? कुणीतरी का? तूच का नाही? तूच का बनत नाहीस या दोन परस्परपूरक जगांना जोडणारा पूल?’
    स्वामीजींच्या नजरेसमोर काही दिवसांपूर्वी वाचलेली ‘जागतिक धर्मपरिषदे’ची बातमी झळकू लागली! आज त्यांच्या प्रवासाची सांगता झाली होती. तीर्थयात्रेचं उद्यापन झालं होतं. आत्मबोधाची अनुभूती झाली होती. आणि आयुष्याला उद्देश मिळाला होता!

    यानंतर काही महिन्यांतच शिकागोची ‘जागतिक धर्मपरिषद’ टाळ्यांचा कडकडाट आणि भावनातिरेकाने मारलेल्या आरोळ्यांनी दुमदुमून गेली! याला कारणीभूत होते पाच शब्द! होय, केवळ पाचच शब्दांत स्वामीजींनी उपस्थित सर्व धर्ममार्तंडांना सर्वश्रेष्ठ धर्म कोणता, ते सप्रमाण दाखवून दिले! तलवार न उगारता, कुणालाही न फसवता, रक्ताचा एकही थेंब न सांडता एका हिंदू सन्याश्याने अवघी अमेरिका जिंकून घेतली! बघायला गेलं तर केवळ पाचच शब्द! पण त्यांच्यामागे स्वामीजींची सारी तीर्थयात्रा, सारा अनुभव, भावना आणि सारी सारी आध्यात्मिक अनुभूती सामावलेली होती! ते पाच विश्वविजयी शब्द होते,
    “सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका”!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही स्वरुपात पुनप्रकाशित करू नये. केल्यास गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आवडल्यास केवळ शेअर बटनावर क्लिक करून शेअर करावे, ही विनंती. लेखकाच्या अन्य कथा वाचण्यासाठी व ‘स्वामी विवेकानंद’ या विषयावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • व्यासांची विज्ञानकथा

    भगवान परशुरामांवर जाहीर व्याख्याने देणारा मी महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव वक्ता असेन. ही व्याख्यानेदेखील मी पारंपरिक भक्तिचरित्रात्मक ढंगाने देत नाही; उलट परशुरामांच्या चरित्राचे सामाजिक क्रांतिकारक, मुत्सद्दी राजकारणी इ. आजवर फारसे कुणाला माहिती नसलेले पैलू उलगडून विस्ताराने सांगत असतो. त्या ओघात खूप साऱ्या राजवंशांचे व ऋषिवंशांचे सविस्तर वर्णन येते. विशेषतः परशुरामांच्या भार्गववंशीय पूर्वजांच्या कथा येतात. त्यादेखील मी विस्ताराने सांगतो. हेतू हा की, लोकांना समजावे – ज्याकाळात इतर तथाकथित संस्कृतींना लज्जारक्षणासाठी वल्कले गुंडाळण्याचीदेखील अक्कल नव्हती आली, त्याकाळापासून भारत देश हा नुसता प्रगतच नव्हता तर आपल्याकडील थोर पुरुषांच्या व्यवस्थित वंशावळी राखण्याइतका काटेकोरदेखील होता. बायबलमध्येही अश्या वंशावळी येतात, मात्र काही अपवाद वगळता त्यांच्यामध्ये सर्वत्र परस्परविसंगतीच आढळून येते. हिंदू पुराणांमध्ये मात्र क्वचितच वंशावळी विसंगत आढळतात. याच व्याख्यानात मी ऋषि च्यवनांचीही कथा सांगतो. यांचा विवाह शर्याति राजाची कन्या सुकन्येशी झालेला होता.

    आज मी तुम्हाला याच संबंधीची एक विज्ञानकथा सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तर हा माणूस पुराणात होता, आता अचानक विज्ञानात कसा काय घुसला? पण मी चुकून असे बोललेलो नाहीये. मी विज्ञानकथाच सांगणार आहे. आणि तीदेखील साधीसुधी नव्हे, तर संस्कृत विज्ञानकथा! स्वत: महर्षी व्यासांनी लिहिलेली!! भागवत पुराणाच्या ९व्या स्कंधातील ३ऱ्या अध्यायात श्लोक क्र. २७ ते ३६ पर्यंत ही विज्ञानकथा येते. ती मी थोडक्यात सांगतो. इच्छुकांना ती मुळातूनच सविस्तर वाचावी!

    उपरोक्त राजा शर्यातिला सुकन्येखेरीज आणखी तीन मुले होती – उत्तानबर्हि, आनर्त आणि भूरिषेण! यांपैकी आनर्ताच्या वंशजांना ‘रेवत’ असे म्हणतात. त्यांची राजधानी होती कुशस्थली नावाची नगरी! या आनर्ताच्या मुलांमध्ये सर्वात मोठा होता ‘ककुद्मी’! त्याची मुलगी रेवती! खूप शोधूनही ककुद्मीला रेवतीलायक वर सापडत नव्हता. तेव्हा याबाबतीत मंत्रणा (सल्ला) घेण्यासाठी ककुद्मी रेवतीला घेऊन ब्रह्मलोकी ब्रह्मदेवांकडे गेला. तिथे पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवांची भेट मिळण्यासाठी या दोघांना काही ‘क्षण’ (श्लोक ३०) थांबावे लागले. ब्रह्मदेव भेटल्यानंतर ककुद्मीने त्यांना नमस्कार केला. आपला येण्यामागचा उद्देश सांगितला आणि आपल्याला मुलीसाठी स्थळ म्हणून आवडलेल्या राजपुत्रांची यादीदेखील सांगितली व विनंती केली की, यातून कोणता मुलगा माझ्या मुलीसाठी नवरा म्हणून योग्य आहे, ते सांगावे. हे ऐकून ब्रह्मदेव हसले. म्हणाले, “महाराज, तुम्ही ज्यांची ज्यांची नावे सांगताहात, ते तर सर्व केव्हाच कालवश झाले. काहीकाहींच्या तर वंशातदेखील कुणी शिल्लक नाहीये सध्या. तुम्ही इकडे काही क्षण थांबलात, परंतु तिकडे पृथ्वीवर मात्र २७ चतुर्युगे (किमान २७ × १२००० × ४ = १२९६००० वर्षे) लोटली आहेत. तेव्हा तुम्ही परत जा. तुम्ही जाईपर्यंत नारायणाचा अंशावतार बलराम नावाने झालेला असेल. त्याच्याशी तुमच्या मुलीचा विवाह करा”. याप्रमाणे ककुद्मी व रेवती परत आले. रेवती व बलरामाचा विवाह झाला आणि ककुद्मी तपश्चर्येसाठी बद्रिनाथधामला निघून गेला.

    तुम्ही म्हणाल, यात विज्ञान कुठे आहे? सांगतो. भौतिकशास्त्रात सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला जातो. याच सापेक्षतेच्या सिद्धांतातून एक विरोधाभास (पॅरॅडॉक्स) निर्माण होतो, ज्याला म्हणतात ‘जुळ्यांचा विरोधाभास’ (ट्विन्स पॅरॅडॉक्स). एकाच वेळी जन्माला आलेली एकसारखीच दिसणारी जुळी भावंडे. समजा वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्यापैकी एक जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने अवकाशप्रवासाला गेला व समजा वीस वर्षांनी परत आला, तर इकडे पृथ्वीवर त्याचा भाऊ चाळीस वर्षांचा झालेला असेल. परंतु अवकाशगामी भाऊ मात्र त्यावेळीही विशीचाच असेल! हे घडते कारण, भौतिकशास्त्राचा नियम सांगतो की प्रकाशाच्या वेगाने जर एखादा कण मार्गक्रमण करत असेल, तर त्याच्यासाठी काळ हा थांबल्यासारखाच असतो. त्यामुळेच त्या अवकाशगामी भावंडाचे वय वाढत नाही. इकडे पृथ्वीवर राहाणारा भाऊ मात्र म्हातारा होतो! यालाच म्हणतात जुळ्यांचा विरोधाभास. हाच सिद्धांत ख्रिस्तोफर नोलानने आपल्या ‘इंटरस्टेलर’ (२०१४) या चित्रपटातही वापरला आहे. किंबहुना सध्याची अवकाशयाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत नसूनही त्यांच्यातून प्रवास करणाऱ्यांना हा सिद्धांत सूक्ष्मप्रमाणात लागू पडतो, ज्याला ‘कालविस्तार’ (टाईम डायलेशन) असे म्हणतात. अर्थात, या विरोधाभासाची खूप सारी उदाहरणे व पर्याय आहेत, आपण समजण्यास सोपे व्हावे म्हणून सर्वात आदर्श पर्याय तेवढा पाहातो आहोत.

    उपरोक्त ‘जुळ्यांचा विरोधाभास’ सर्वप्रथम पॉल लँगेविन या शास्त्रज्ञाने १९११ साली मांडला. भागवताचा काळ हा इ. स. पू. ३५०० वर्षांपासून ते इ. स. ६०० पर्यंत वेगवेगळे संशोधक सांगतात. मात्र कुणीही संशोधक हा काळ १९११ नंतरचा असल्याचे सांगत नाही! परंतु तरीदेखील हाच जुळ्यांचा विरोधाभास व्यासांनी ककुद्मीच्या कथेत मांडल्याचे आढळत नाही का? ककुद्मी आणि रेवती प्रवास करत ‘ब्रह्मलोक’ नावाच्या ठिकाणी गेले, तिथे काही क्षण थांबले व परत आले. मात्र तेवढ्या काळात पृथ्वीवर लाखो वर्षे उलटून गेली होती. तरीदेखील परत आल्यानंतरही रेवती व ककुद्मीचे वय मात्र तेवढेच राहिले होते. ही ‘जुळ्यांचा विरोधाभास’ स्पष्ट करणारी कथाच नव्हे काय? व्यासांनी तर या कथेत ‘त्या लोकावर (ग्रहावर?) घालवलेला वेळ’ही विचारात घेतलाय!

    एक हिंदू म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, आपली पुराणे हा ललित अंगाने मांडलेला का होईना पण खरा इतिहास आहे. मात्र हल्ली काही आंग्लाळलेली मंडळी भारतीय संस्कृतीचे ऐतिहासिकत्व मुळापासून नाकारतात. तर ठिक आहे. वादात नको पडायला. सदर कथा भागवतपुराणात आहे? आहे! ती ‘जुळ्यांचा विरोधाभास’ मांडला जाण्याच्या खूप वर्षे आधी लिहिलेली आहे? आहे! त्यात आजच्या जगातले विज्ञान विचारात पाडण्याइतपत प्रमाणात आहे? आहे! तर मग व्यासांनी एक काल्पनिक का होईना परंतु विज्ञानकथा लिहिली, एवढे तरी आपल्याला मान्य करणे भागच आहे. शिवाय विज्ञानकथा लिहिण्यासाठीसुद्धा कुठेतरी त्या अचूक विचारांपर्यंत पोहोचण्याइतके प्रगत विज्ञान अस्तित्वात असावे लागते. भारतीय संस्कृती व्यासांच्या काळात तेवढी तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होती, हेही मान्यच करावे लागते. कारण कल्पनेलादेखील कुठे ना कुठे वास्तवजगतातील अनुभवाचा आधार असतो; इथे तर व्यासांनी एका अतिशय तात्त्विक व गणितीय बाबीचा आपल्या कथेत खुबीने वापर केल्याचे दिसतेय! तेव्हा कुणी नाकारो वा स्वीकारो, सदर कथा खरोखर घडलेली असो वा नसो; या कथेतील वैज्ञानिकता कदापिही दुर्लक्षिण्याजोगी नाही. धर्मग्रंथ म्हणून सोडून दिलेल्या संस्कृत ग्रंथांतरी या कथेसारखीच सहस्रावधी विज्ञानरत्ने पडून आहेत. अवकाश आहे तो केवळ कुणीतरी डोळसपणे शोधण्याचा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com]

    image